"मॉन्सून'ची शुभवार्ता नव्हे, सांगलीकरांना धडकी 

"मॉन्सून'ची शुभवार्ता नव्हे, सांगलीकरांना धडकी 

सांगली -  मॉन्सून यंदा लवकर धडकणार, ही शेतकऱ्यांसाठी शुभवार्ता असली तरी सांगलीकरांच्या उरात मात्र धडकी भरवणारी आहे. कारण जून महिना सुरू झाला तरी पावसाळ्याच्या नियोजनात महापालिकेने यंदाही सालाबादप्रमाणे कच खाल्ली आहे. महापौर हारुण शिकलगार आणि आयुक्त रवींद्र खेबुडकर या दोन "खुर्ची बहाद्दरां'च्या भांडणात नालेसफाईपासून ते रस्त्यांच्या मुरुमीकरणापर्यंत सारे नियोजन कोलमडले आहे. अन्य पदाधिकारी, नगरसेवकांचा सध्या शेवटच्या वर्षातील "नफा-तोटा' ताळेबंद मांडण्याचा उद्योग सुरू आहे. 

महापौर-आयुक्तांतील संघर्ष टोकाचा होत निघाला आहे. महापौरांनी आयुक्तांच्या कारभाराची "डॉक्‍युमेंटरी' तयार करण्याचा नवा कार्यक्रम आखलाय. आयुक्त आजारी असल्याचे सांगत पालिकेत फिरकत नाहीत. "बंगल्यावरून कारभार' ही नवी बाबूशाही सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी मुरुमीकरण, नालेसफाई, धोकादायक झाडे तोडणे, अत्यंत जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा सर्व्हे करून सूचना देणे अशा आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांना हात कोण घालणार? आयुक्त चार जिल्ह्यांचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आहेत. पाणी शहरात घुसल्यावरच ते बोट घेऊन नियोजनाला उतरणार का? 

गेल्या पावसाळ्यात शहराचे तळे झाले होते. दलदलीने लोकांना जगणे नको करून टाकले. आजारांनी थैमान घातले. रस्त्यावरील दलदलीने अपघात वाढले. शाळकरी मुले, महिलांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले. 

यंदा यात काही बदल होईल का? महापालिकेने काही केलेच नाही तर सुधारणा कशी व्हायची? स्टेशन चौक, मारुती चौकाचा सालाबादाप्रमाणे "रंकाळा' होणार. नालेसफाई किती गांभीर्याने झाली, हे सर्वज्ञात आहे. वळवाच्या पहिल्या दणक्‍याने शामरावनगरसह गुंठेवारीची दैना उडाली. त्यानंतर लोकांनी शिमगा करत महापालिका गाठली. कानठळ्या बसवणारा आवाज उठला; पण कारभाऱ्यांपर्यंत तो पोचलाच नाही. त्यांच्या कानात दारूसाठी रस्ते हस्तांतराचाच भुंगा घुमत राहिला. 

आयुक्तांनी सुरवातीस महापालिकेचा अभ्यास करायला थोडा वेळ द्या, असे म्हटले होते. आता त्यांच्या सांगलीतील कारभाराला एक वर्ष पूर्ण होत आले तरी अभ्यासाला अजून किती वेळ हवाय? महापौरांनी काही काळ त्यांच्या कारभारावर पांघरूण घातले होते; पण तेही आता आक्रमक झाले आहेत. त्यांचे कशात फाटले, हा विषय गौण आहे; पण पावसाळ्यात शहर पाण्यात जाणार याची कल्पना असताना यांची आरोपांची "कॉमेडी एक्‍स्प्रेस' सुरू आहे. आयुक्तांनी बंगल्यावर बैठका बंद कराव्यात, अशी ताकीद महापौरांनी दिली हे बरंच झालं; पण आपण किती खोल पाण्यात आहोत, हेही महापौरांनी पाहायला नको का? 

गेल्यावर्षी आयुक्तांनी पावसाळ्यात मुरूम देण्याऐवजी पक्के रस्ते करू, अशी ग्वाही दिली होती. कुठे आहे रस्ता? साधे खड्डे भरले नाहीत. शामरावनगरसह विस्तारित भागात ड्रेनेजसाठी खोदाई झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर 24 कोटींच्या रस्त्यांचे व गटारांचे काम मंजूर करण्यात आले. त्यातील हातसफाई उघड झाल्यावर काम थांबले. निवडणुकीआधी कदाचित शेवटचा पावसाळा आहे, तरीही इतका गाफिलपणा राजकीयदृष्ट्या परवडणार नाही. कुणाला कशाची फिकीरच नाही. त्यामुळे यंदा पावसाळ्यात शहराची काय अवस्था होईल अन्‌ त्यानंतर कारभारी कसे तोंड दाखवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

सुधार समिती घुटमळतेय 
सांगली शहर सुधार समिती सध्या तरी केवळ गैरव्यवहाराभोवती घुटमळतेय. कारभाऱ्यांवर अंकुश ठेवायला ते हवेच; मात्र अतिशय महत्त्वाच्या पावसाळापूर्व नियोजनाच्या कामाची दयनीय स्थिती असताना समितीने त्याविरुद्ध ताकदीने आवाज का उठवला नाही, हे कोडेच आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com