पोलिस दलाचे सांगलीत संचलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

संभाजीराव भिडे व मिलिंद एकबोटेंना अटक करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) व संबंधित विविध संघटनांतर्फे आज (ता. ८) मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, तसेच शहरात गेल्या काही दिवसांत असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने रविवारी शहरात संचलन करण्यात आले.

सांगली - कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा निषेध व तिला जबाबदार असल्याचा संशय असलेल्या संभाजीराव भिडे व मिलिंद एकबोटेंना अटक करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) व संबंधित विविध संघटनांतर्फे आज (ता. ८) मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, तसेच शहरात गेल्या काही दिवसांत असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने रविवारी शहरात संचलन करण्यात आले. एक हजारहून अधिक पोलिस संचलनात सहभागी झाले. कायदा-सुव्यवस्था हातात घेऊ पाहणाऱ्यांना संचलनाद्वारे पोलिसांनी इशाराच दिला आहे.

शहरातील सिव्हील चौक, डॉ. आंबेडकर रोडवरून सुरू झालेले हे संचलन झुलेलाल चौक, शास्त्री चौकातील डॉ. आंबेडकर पुतळा, गावभागातून मारुती रोडवर, तेथून हरभट रोडवरून टिळक चौक आणि गणपती मंदिरापर्यंत संचलन केले. त्यानंतर गणपती पेठेतून पटेल चौकमार्गे पोलिस दल मिरजेकडे मार्गस्थ झाले.
अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संचलनात उपअधीक्षक धीरज पाटील, किशोर काळे यांच्यासह सर्व उपअधीक्षक, तसेच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र शेळके, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल निकम आदी सहभागी झाले.

दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोधक पथक, राज्य राखीव दलाची तुकडी, शीघ्र कृती दल आदी पथकेही सहभागी झाली. शहरातील विश्रामबाग चौकातून उद्या (ता. ८) निघणाऱ्या मोर्चासोबत पाचशे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणाऱ्या या मोर्चावेळी कडेकोट बंदोबस्त असणार आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक बोराटे यांनी दिली.

Web Title: Sangli News The movement of the police force in city