इस्लामपूर नगरपालिका सभापतींच्या दवाखान्यात पालिकेचे साहित्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

इस्लामपूर - नगरपालिकेचे आरोग्य सभापती डॉ. संग्राम पाटील यांच्या खासगी दवाखान्यात नगरपालिकेचे इलेक्ट्रिक साहित्य सापडले. नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांना जागेवर पाठवून खात्री करीत पंचनामा करायला लावला.

इस्लामपूर - नगरपालिकेचे आरोग्य सभापती डॉ. संग्राम पाटील यांच्या खासगी दवाखान्यात नगरपालिकेचे इलेक्ट्रिक साहित्य सापडले. नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांना जागेवर पाठवून खात्री करीत पंचनामा करायला लावला. आज दिवसभर या घटनेवरून सत्ताधारी व विरोधकांत खल झाला. रात्री उशिरापर्यंत या बाबतची रितसर फिर्याद प्रशासनाकडून दाखल झाली नव्हती. 

आरोग्य सभापती डॉ. पाटील यांचा बहे रोडला खासगी दवाखाना आहे. दवाखान्यात पालिकेचे इलेक्ट्रिक साहित्य असल्याची माहिती नगराध्यक्षांना नागरिकांनीच दिली. नगराध्यक्षांनी संबंधित विभागाचे विभागप्रमुख अनिकेत हेंद्रे व पालिकेच्या कर्मचाऱ्यांना खात्री करण्यासाठी दवाखान्यात पाठवले. कर्मचाऱ्यांनी तेथे जुने दहा एलईडी बल्ब, दोन सोडियम बल्ब, सहा सीएफएल बल्ब, ५० मीटर सर्व्हीस वायर, क्‍लॅम्प, ब्रॅकेट व एक टु पीएल सेट असल्याचे पाहिले. त्यांनी तसे नगराध्यक्षांना सांगितले.

कर्मचाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर नगराध्यक्ष श्री. भोसले-पाटील यांनी नगरसेवकांसह घटनास्थळी भेट दिली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सर्वांच्या समक्ष पंचनामा करायला लावला. याची माहिती पोलिसांना दूरध्वनीवरून दिली. दोन्ही बाजूचे नगरसेवक व समर्थकांनी डॉ. पाटील यांच्या दवाखान्यासमोर गर्दी केली होती. 

या दरम्यान सत्ताधारी व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत शाब्दिक खडाखडी, आरोप-प्रत्यारोप झाले. प्रकरण पोलिसांत गेले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चोरीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. पालिका प्रशासनाने वस्तू चोरी झाल्या आहेत याबाबत फिर्याद द्यावी, अशी भूमिका पोलिसांनी घेतली.  प्रशासनाने कायदेशीर सल्ला घेऊन फिर्याद देतो, असे सांगत पोलिस ठाण्यातून काढता पाय घेतला. नंतर पालिकेत बराचवेळ याविषयी खल सुरू होता. रात्री उशिरापर्यंत रिसतर फिर्याद दाखल झाली नव्हती. 

पालिकेकडून सर्व कायदेशीर बाबी तपासून रीतसर कारवाई केली जाईल. प्रशासनाकडून कायदेशीर बाबींची तपासणी सुरू आहे. त्यानंतर कारवाई करू.
निशिकांत भोसले-पाटील, नगराध्यक्ष

डॉ. संग्राम पाटील यांच्या प्रभागात इलेक्‍ट्रीक कामे सुरू होती. त्यामुळे गेलेले बल्ब व काही साहित्य दवाखान्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ठेवले होते. काही गैरसमजातून कारवाई झाली आहे.
- दादासाहेब पाटील, उपनगराध्यक्ष

Web Title: Sangli News municipal goods found in Dr. patils house