संजयनगरला भरदिवसा खून

संजयनगरला भरदिवसा खून

सांगली - कुख्यात गुंड इम्रान मुल्ला याच्या खूनप्रकरणातील मुख्य संशयित फिरोजखान जमालखान पठाण (वय ३५, मगरमच्छ कॉलनी, गवळी गल्ली) याचा आज सकाळी दहाच्या सुमारास तलवारीने वार करून खून करण्यात आला. त्याच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी डोक्‍यावर, हातावर, पाठीवर, मांडीवर, पायावर निर्घृणपणे अनेक वार करून खून केला. संजयनगर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. खूनप्रकरणी चौघांची नावे निष्पन्न झाली आहेत. या प्रकाराने शिंदेमळा परिसर हादरला.

गुफरान जमादार पठाण (वय २६, प्रकाशनगर, कुपवाड रोड) याने फिर्याद दिली. याप्रकरणी फारुक मुल्ला, इरफान मुल्ला, बारक्‍या उर्फ उमऱ्या आणि चिव्या (सर्व १०० फुटी रोड, पाकिजा मशिदीमागे, सांगली) या चौघांची नावे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाली.

खूनप्रकरणातील आरोपींची नावे निष्पन्न झाल्याने त्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - फिरोजखान पठाण याचे शिंदेमळा परिसरात अजिंक्‍य नागरी पतसंस्थेशेजारी हार्डवेअर, सेंट्रिंग साहित्याचे दुकान आहे. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याने दुकान उघडले. तो एकटाच दुकानात बसला असताना अचानक चौघे हल्लेखोर त्याच्या दुकानात घुसले. त्यांनी त्याच्यावर तलवारीने सपासप वार केले. यात त्याच्या डोक्‍यावर पाच वार झाले. हल्लेखोरांनी फिरोजखानला प्रतिकाराची संधीच दिली नाही. त्यानंतर त्याला दुकानातून बाहेर ओढून आणत पुन्हा मारले.

दुकानात भिंतीवर रक्ताचे शिंतोडे उडाले होते. डोक्‍यावर वर्मी वार झाल्याने त्याची कवटी फुटून मेंदूचे तुकडे पडले होते. घटनास्थळी रक्ताचे थारोळे होते. फिरोजखानचा नातलग शाहिद पठाण त्याचवेळी तेथून चालला होता. त्याने प्रकार तत्काळ फिरोजखानचा भाऊ गुफरान याला सांगितला. तो तातडीने घटनास्थळी आला.

खुनाची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदेवे पथकासह घटनास्थळी आले. शहर विभागाच्या उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे याही आल्या. घटनास्थळाजवळ दोन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलिसांनी त्याचे फुटेज तपासले; मात्र कॅमेरा विरुध्द दिशेला असल्याने काही सुगावा मिळू शकला नाही.  

पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. इम्रान मुल्लाच्या खुनाच्या रागातूनच हल्लेखोरांनी फिरोजखानचा काटा काढल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. प्राथमिक चौकशीत चौघांची नावे निष्पन्न झालेली असली तरी यात आणखी काहींचा समावेश असण्याची शक्‍यता आहे.

इम्रानच्या खुनाचा बदला?
तीन वर्षांपूर्वी पैशाच्या वादातून १०० फुटी रस्त्यावर गुंड इम्रान मुल्ला याचा खून झाला होता. या प्रकरणी फिरोजखान पठाण, युसूफ पठाण, मोबीन पठाण संशयित आहेत. फिरोजखान वर्षापूर्वी जामिनावर सुटून बाहेर आला होता. त्याचा भाऊ कारागृहात आहे. भावाच्या खुनाचा बदला घेण्याच्या हेतूने हल्लेखोरांनी फिरोजखानवर तीन वेळा हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तिन्ही वेळा तो त्यातून वाचला होता. रेल्वेपुलाजवळ त्याच्यावर हल्ला झाला होता. त्यावेळी गाडी वेगाने नेल्यामुळे तो बचावला होता. त्यानंतर आकाशवाणीजवळही त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर न्यायालयात सुनावणी दरम्यान त्याच्यावर हल्ला झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com