सांगलीत दोघा मित्रांकडून युवकाचा निर्घृण खून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

सांगली - यशवंतनगरजवळील अयोध्यानगर येथे भरदिवसा प्रथमेश महेंद्र तावडे (वय 17, अयोध्यानगर, शिवगंगा चौक) याचा आज चाकूने गळ्यावर वार करून दोघा मित्रांनी खून केला. दुपारी दीडच्या सुमारास अयोध्यानगरमधील शिवगर्जना चौकात प्रकार घडला. हल्ल्यानंतर दोघेजण दुचाकीवरून पळाले. पोलिसांनी रात्री उशिरा संशयित सुमित सुखदेव कांबळे (वय 22, इनाम धामणी, ता. मिरज) याला अटक केली. 

सांगली - यशवंतनगरजवळील अयोध्यानगर येथे भरदिवसा प्रथमेश महेंद्र तावडे (वय 17, अयोध्यानगर, शिवगंगा चौक) याचा आज चाकूने गळ्यावर वार करून दोघा मित्रांनी खून केला. दुपारी दीडच्या सुमारास अयोध्यानगरमधील शिवगर्जना चौकात प्रकार घडला. हल्ल्यानंतर दोघेजण दुचाकीवरून पळाले. पोलिसांनी रात्री उशिरा संशयित सुमित सुखदेव कांबळे (वय 22, इनाम धामणी, ता. मिरज) याला अटक केली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः अयोध्यानगर येथील छोट्याशा घरात प्रथमेश आई आणि लहान बहिणीसह रहात होता. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. आई घर सांभाळत होती. प्रथमेश विलिंग्डन महाविद्यालयात शिकत होता. बारावीला (एमसीव्हीसी) त्याचा एक विषय राहिला होता. त्यामुळे सध्या तो घरीच होता. आज दुपारी प्रथमेशची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. बहीण शाळेला गेली होती. दुपारी दीडच्या सुमारास त्याचा मित्र सुमित कांबळे आणि अन्य एकजण दुचाकीवरून घराजवळ आले होते. घरापासून काही अंतरावर दोघांनी प्रथमेशला शिवीगाळ केली. त्यावरून वाद सुरू झाल्यानंतर दोघेजण दुचाकीवरून खाली उतरले. प्रथमेशला मारहाण सुरू केली. एकाने चाकू काढून प्रथमेशच्या थेट गळ्यात भोसकला. दुसरा वार खांद्यावर केला. प्रथमेशच्या गळ्यातून रक्ताची धार लागल्यानंतर तो खाली पडला; तेव्हा दुचाकी घेऊन दोघेजण पसार झाले. 

काही अंतरावरच प्रथमेशचा मित्र करण गजानन कदम (रा. अयोध्यानगर) थांबला होता. अवघ्या दोन-तीन मिनिटांतच हा प्रकार घडला. हल्लेखोर पळाल्यानंतर करण जखमी प्रथमेशजवळ आला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. शेजारील नागरिक देखील मदतीसाठी धावले. जखमेवर कापड धरून रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला तत्काळ सिव्हिलमध्ये आणले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. 

खुनाची माहिती मिळताच संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र भिंगारदेवे आणि पोलिस घटनास्थळी धावले. तेथून काही पोलिस सिव्हिलकडे गेले. हल्ला झालेल्या ठिकाणी काहीजणांची विचारपूस केली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे कोणालाच माहिती नव्हती. करणला हल्लेखोरापैकी एकाचे नाव माहीत होते. त्यानुसार हल्लेखोर सुमित कांबळे आणि साथीदाराचा शोध सुरू केला. 

खुनाची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. एलसीबी आणि गुंडाविरोधी पथकही आले. हल्लेखोरांच्या शोधासाठी तत्काळ पथके परिसरात रवाना झाली. काही ठिकाणी छापेही मारले. सायंकाळी उशिरा करण कदम याने संजयनगर पोलिस ठाण्यात खुनाची फिर्याद दिली. रात्री उशिरा संशयित सुमित कांबळेला अटक केली. 

खुनाचे कारण अस्पष्ट 
मृत प्रथमेश याचा हल्लेखोर सुमित कांबळे आणि साथीदाराशी नेमका काय वाद होता, याचा पोलिस शोध घेत आहेत. प्रथमेश पोलिसांना काही सांगण्यापूर्वी मृत झाला. त्यामुळे कोणत्या कारणातून खून झाला असावा, या बाबत तर्कवितर्क लढवले जात होते. कॉलेजमधील वाद किंवा अन्य कारणातून खून झाल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली. 

Web Title: sangli news murder crime

टॅग्स