अनैतिक संबंधातून पतीचा काढला काटा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

विटा - अनैतिक संबंधात अडथळा ठरू नये, यासाठी पत्नीने मेहुण्याच्या व अन्य एकाच्या मदतीने डोक्‍यात फरशी घालून व दोरीने गळा आवळून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार घाडगेवाडी (ता. खानापूर) येथे घडला.

विटा - अनैतिक संबंधात अडथळा ठरू नये, यासाठी पत्नीने मेहुण्याच्या व अन्य एकाच्या मदतीने डोक्‍यात फरशी घालून व दोरीने गळा आवळून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार घाडगेवाडी (ता. खानापूर) येथे घडला.

घाडगेवाडी येथे मंगळवारी (ता. १) मध्यरात्रीच्या सुमारास खून झाला. अरुण प्रल्हाद घाडगे (वय ३१) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी रूपाली घाडगे (वय २३) व तिचा मेहुणा सुहास तुकाराम शिंदे (वय २६, विटा) आणि मेहुण्याचा मामेभाऊ अक्षय रघुनाथ पिसाळ (वय २०, रा. येळावी, ता. तासगाव) यांना अटक केली.  

अरुण घाडगे हे दिल्ली येथे गलाई व्यावसायिक म्हणून काम करत होते. डिसेंबर २०१७ मध्ये सूर्यनगर येथील रूपाली सूर्यवंशी हिच्याशी त्यांचा विवाह झाला होता; परंतु लग्नाआधीच रूपालीचे तिच्या सख्ख्या बहिणीचा नवरा सुहास शिंदे याच्याशी अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंधाला अरुण अडसर ठरू नये, यासाठी  रूपाली व सुहासने त्याला संपवायचे ठरवले होते. 

दरम्यान, चुलत भावाच्या लग्नासाठी अरुण रूपालीला घेऊन दोनच दिवसांपूर्वी दिल्लीहून घाडगेवाडी येथे आले होते. बुधवारी (ता. २) लग्न होते. मंगळवारी दुपारी  पोटात दुखत आहे, असा बहाणा करून रूपाली पती अरुणला घेऊन विट्यातील एका खासगी रुग्णालयात आली. तिथे तिचा प्रियकर सुहास व त्याचा मामेभाऊ अक्षय पिसाळ हे आधीच आले होते. त्यानंतर अरुण व रूपाली घाडगेवाडी येथे गेले. 

सायंकाळी सात वाजता गावदेवचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर अरुण तेथून गायब झाला. त्याने गाडी व मोबाईलही नेला नव्हता. बराचवेळ अरुण घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. परंतु मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास भाऊसाहेब घाडगे यांच्या गोठ्यासमोरील गवताच्या शेतात रक्ताने माखलेला अरुणचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताचा विटा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.  

पोलिसांनी कसून तपास केला असता अरुणची पत्नी रूपाली व साडू सुहास यांनी संगनमताने अरुणचा खून केल्याचे तर या कटात सुहासचा मामेभाऊ अक्षय याचा ही सहभाग असल्याचे त्यांनी कबूल केल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र पिसाळ यांनी सांगितले.

पोलिसांची कार्यतत्परता
खुनाच्या घटनेमुळे खानापूर तालुका परिसरात खळबळ उडाली होती. डोक्‍यात फरशी घालून व दोरीने गळा आवळून निर्घृण खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यामुळे कार्यतत्परता दाखवत अवघ्या २४ तासांत संशयितांना ताब्यात घेण्यात विटा व सांगली पोलिसांना यश आले.

Web Title: Sangli News murder of husband