मोदींच्या दौऱ्यांच्या खर्चात सॅटेलाईट सोडता आले असते: राजू शेट्टी

वृत्तसंस्था
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

34 हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली होती, वास्तविक ती 6 ते 7 हजार कोटीवर जाणार नाही, असे निकष लावलेले आहेत. सरकार केवळ खेळ करत आहे. शेतकऱ्यांना बोगस ठरवू नका

सांगली  - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन वर्षांत विदेश दौऱ्यावर जेवढा पैसा खर्च केला आहे, त्याच्या निम्म्या पैशांत एक सॅटेलाईट आकाशात सोडता आले असते. त्याचा उपयोग करून गारपीट कधी होणार आहे, पाऊस कधी पडणार आहे, वादळ कधी होणार आहे, याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली असती. पण, सरकारला मतपेटी भक्कम करण्यासाठी शेतकऱ्यांचाच बळी द्यायचा असल्याने ते असला विचार करणार नाहीत, अशा घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी केली. 

येथे सांगली सुधार समितीतर्फे आयोजित "शेतकरी कर्जमाफी' या विषयावर चर्चासत्रात ते बोलेत होते. ते म्हणाले, ""देशातील शेतीविषयीचे धोरण खुलेही नाही आणि बंदिस्तही नाही. जर ते खुले असते तर कर्नाटकात ऊस पाठवू नका, अशी बंदी राज्य सरकारने घेतली नसती. शेतमालाचे दर वाढू लागले की पाकिस्तानातून कांदा आयात केला नसता. डाळीचे उत्पन्न वाढवा असे आवाहन करणारे पंतप्रधान विदेशातून डाळ आयात करून दर पाडण्यात पुढे आले नसते. त्याउलट विदेशात कापसाचे दर चांगले असताना निर्यातबंदीचे जोखंड घातले नसते. हा सारा खेळ शेतकऱ्यांच्या जीवावर बेतणारा आहे. ही व्यवस्था बंदिस्त आहे, असे मानावे तर सरकार त्याचा परिणामांची जबाबदारी घ्यायला तयार नाही. शेती हा हवामानावर आधारित व्यवसाय आहे, खरेतर ही संस्कृती आहे. परंतु, हवामानाचा अंदाज आम्हाला येत नाही. कधी पाऊस पडणार कळत नाही, गीरपीटीने शेतकरी कोलमडून पडतो आणि गळ्याला फास लावण्याची त्याच्यावर वेळ येते. तुम्ही मंगळावर निघालात, चंद्रावर पाऊल टाकलेत. तेथे माणसाला राहता येईल, असे हवा-पाणी आहे की नाही हे पहाताय, एक कृपा करा , असे एक सॅटेलाईट पाठवा जे गारपीट, पाऊस, वादळाची माहिती देईल. त्यासाठी फार गुंतवणूक गरजेची नाही, मोदींच्या विदेश दौऱ्याच्या निम्म्या पैशांत हे शक्‍य होईल.'

शेतकरी कर्जमाफीवर त्यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, ""34 हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली होती, वास्तविक ती 6 ते 7 हजार कोटीवर जाणार नाही, असे निकष लावलेले आहेत. सरकार केवळ खेळ करत आहे. शेतकऱ्यांना बोगस ठरवू नका, तो स्वाभिमानी आहे. 66 कॉलमचे माहितीपत्रक भरून घेतले आहे, तो काय चोर आहे का? त्याचा अपमान करू नका.''

Web Title: sangli news: narendra modi raju shetti