राष्ट्रवादीच्या मेळाव्याने कार्यकर्ते पुन्हा रिचार्ज

संतोष कणसे
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

अरुणअण्णा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पलूस- कडेगाव मतदारसंघातील कुंडल या क्रांतिकारकांच्या भूमीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व बड्या नेत्यांसह राष्ट्रवादीने नाही म्हटले तरी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी त्यांनी केलेली चूक भविष्यात दुरुस्त करून यापुढे त्यांच्या  पाठीशी ताकद उभा करणार असल्याचे शरद पवार यांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे मतदारसंघातील राष्ट्रवादीचे ‘डिस्चार्ज’ झालेले कार्यकर्ते चांगलेच ‘रिचार्ज’ झाले आहेत

कडेगाव - पलूस-कडेगाव मतदारसंघात  राष्ट्रवादी पुन्हा एकदा मुख्य राजकीय स्पर्धकांच्या रूपाने पुढे येताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच राष्ट्रवादीचे नेते अरुणअण्णा लाड यांच्या पाठीशी ताकद उभी करणार असल्याचे जाहीर केले, तर काँग्रेस हा राष्ट्रवादीचा नैसर्गिक मित्र असला तरी अरुणआण्णांचा ‘दोस्ताना’ भाजपच्या पृथ्वीराज देशमुख यांच्याशी आहे. हा ‘दोस्ताना’ राष्ट्रवादीच्या वाटचालीत अडचणीचा ठरणार का? अरुणअण्णा नव्याने राष्ट्रवादीची ‘इनिंग’ सुरू करताना नेमकी काय भूमिका घेणार. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अरुणअण्णा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पलूस- कडेगाव मतदारसंघातील कुंडल या क्रांतिकारकांच्या भूमीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व बड्या नेत्यांसह राष्ट्रवादीने नाही म्हटले तरी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी त्यांनी केलेली चूक भविष्यात दुरुस्त करून यापुढे त्यांच्या  पाठीशी ताकद उभा करणार असल्याचे शरद पवार यांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे मतदारसंघातील राष्ट्रवादीचे ‘डिस्चार्ज’ झालेले कार्यकर्ते चांगलेच ‘रिचार्ज’ झाले आहेत. तर दस्तुर खुद्द शरद पवार यांनी जाहीर सभेत शब्द दिल्याने अरुणअण्णा यांनाही मोठी राजकीय ताकद मिळणार हे आता निश्‍चित झाले आहे. तर आता अरुणअण्णांना आमदारकीचे तिकीट फायनल झाल्याचे कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे. मात्र ते विधानसभा की विधानपरिषद एवढाच विषय बाकी राहिला आहे. तर  सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीचा सूर आळवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे अरुणअण्णा राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानपरिषदेच्या मैदानात उतरतील असेही संकेत मिळत आहेत.

अरुणअण्णांचा पूर्वीचे राष्ट्रवादीचे परंतु विद्यमान भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचा गेल्या अनेक वर्षांपासून ‘दोस्ताना’ आहे. गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत अरुणअण्णांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार यांना मदत न करता भाजपच्या व्यासपीठावर जाऊन पृथ्वीराज देशमुख यांना मदत करून आपला ‘दोस्ताना’ निभावला होता. मात्र आता राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. राष्ट्रवादीला येथे पुन्हा एकदा मुख्य स्पर्धकांच्या रूपाने पुढे यायचे आहे.

Web Title: Sangli News NCP rally recharge activist