...आता नवीन वोटिंग मशिन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

मी अमूक पक्षाला मतदान दिलं अन्‌ चुकून दुसऱ्याच पक्षाला मत मिळालंय का, अशी शंका घ्यायला महापालिका निवडणुकीत वाव राहणार नाही. या निवडणुकीसाठी नवे तंत्रज्ञान असलेल्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स वोटिंग मशिन येणार आहेत. त्याची सुरुवात पलूस-कडेगाव विधानसभेच्या पोटनिवडणुकीपासून झाली आहे. त्यामुळे तुमचे मत कुणाला दिले, याची पावतीच समोर दिसणार आहे. 

शेजारील कर्नाटक राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नव्या मतदान यंत्रांचा वापर केला गेला. तेथील मतदारांनी अतिशय चांगला अनुभव आल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही अशाच यंत्रांचा वापर केला जाईल. तेथे २८२ बूथ असून त्याकामी ४९३ नवीन यंत्रे आली आहेत. जिल्ह्यात नव्या यंत्रांवर मतदानाचा तेथे पहिलाच प्रयोग असेल. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्रपणे नव्याने प्रशिक्षणाचा कार्यक्रम होणार आहे. 

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची निवडणूक जुलैमध्ये अपेक्षित आहे. येथे २० प्रभाग असून ७८ जागा असणार आहेत. येथे एका प्रभागात चार उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे या ठिकाणी विधानसभेसाठीच्या यंत्रांचा उपयोग होणार नाही. येथे स्वतंत्र यंत्रांची आवश्‍यकता असणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर त्याबाबतच्या सूचना आणि यंत्रे येतील, अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे ‘ईव्हीएम घोटाळा’ नावाचा प्रकार या निवडणुकीत चर्चेला येण्याची शक्‍यता कमीच राहील.

मतदानाची शहानिशा
नव्या ईव्हीएम यंत्रावर मतदानाची शहानिशा करण्याची सोय आहे. मतदाराने चिन्हासमोरील बटण दाबले की आवाज येईल. लगोलग एक चिठ्ठी समोर येईल. जशी ‘एटीएम’वर पैसे काढल्यानंतर येते तशी... ती काचेच्या आत असेल. पुढील सात सेकंदासाठी ती दिसेल. त्यावर मतदाराचे नाव आणि त्यांनी कुठल्या चिन्हासमोरील बटण दाबले आहे, ते चिन्ह दिसेल. सात सेकंदानंतर ती चिठ्ठी कट होऊन खालील बॉक्‍समध्ये पडेल. तो बॉक्स सीलबंद असेल. त्यामुळे मतदान गोपनीयच राहील. 

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी ४९३ अत्याधुनिक यंत्रे आली आहेत. त्याचे प्रात्यक्षिक या आठवड्यात होईल. महापालिकेची निवडणूक जाहीर झाली की त्यासाठीच्या नव्या यंत्रांबाबतची माहिती येईल.
- मिनाज मुल्ला,
उपजिल्हाधिकारी

 

Web Title: Sangli News New voting machine