निवडणूक वादातून तासगाव तालुक्यात सरपंचांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

तासगाव - आरवडे (ता. तासगाव) येथे निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीत नवनिर्वाचित सरपंच युवराज पाटील यांच्यासह चौघेजण जखमी झाले. जखमींना पुन्हा तासगाव ग्रामीण रुग्णालयात घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याने आरवडे येथे प्रचंड तणाव निर्माण झाला. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसांकडून कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

तासगाव - आरवडे (ता. तासगाव) येथे निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीत नवनिर्वाचित सरपंच युवराज पाटील यांच्यासह चौघेजण जखमी झाले. जखमींना पुन्हा तासगाव ग्रामीण रुग्णालयात घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याने आरवडे येथे प्रचंड तणाव निर्माण झाला. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसांकडून कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

आरवडे ग्रामपंचायतीची सत्ता पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर गावात तणाव निर्माण झाला आहे. सरपंच युवराज ऊर्फ सुनील भानुदास पाटील यांच्या पॅनेलमधील निवडून आलेल्या लतिका किसन कुंभार यांचे पती किसन रंगराव कुंभार आणि त्यांचा मुलगा राहुल किसन कुंभार हे त्यांच्या दुकानामध्ये बसले असताना भाजपचे कार्यकर्ते संभाजी जयसिंग मस्के यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोटार दुरुस्तीच्या दुकानात घुसून त्या दोघांना काठ्या व दगडांनी मारहाण केली. मारहाण सोडविण्यास गेलेल्यांनाही मारहाण करण्यात आली. 

बंदोबस्तांसाठी असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांनाही धक्‍काबुक्‍की करण्यात आली. मारहाणीमध्ये जखमी झालेल्या किसन कुंभार आणि राहुल कुंभार व रामचंद्र दामोदर कुंभार यांना तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर संभाजी मस्के यांच्यासह कार्यकर्त्यांकडून ग्रामीण रुग्णालयात जाऊन पोलिसांत का गेला? म्हणून पुन्हा त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान सरंपच युवराज पाटील आणि बाजार समितीचे माजी सभापती अविनाश पाटील हे ग्रामीण रुग्णालयात काय झाले? याची चौकशी करण्यासाठी आले असता, तेथेच असलेल्या संभाजी मस्के आणि त्यांच्याबरोबर असलेल्या पाचसात जणांनी हल्ला केला. यामध्ये सरंपच पाटील यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागून ते जखमी झाले.

यानंतर ग्रामीण रुग्णालयात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. जमलेल्या जमावाने संभाजी मस्के यांची गाडी (क्र.एमएच १० बीआर २८) या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ग्रामीण रुग्णालयात पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सकाळी अकरा वाजता घडलेल्या या घटनेनंतर रात्री उशिरापर्यत पोलिसांनी याप्रकरणी कोणताही गुन्हा अथवा त्याची नोंदही केलेली नव्हती. 

आमदारांची कारवाईची मागणी 
आमदार सुमनताई पाटील यांनी यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्‍त करून राजकीय गुंडांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी बाजार समिती निवडणुकीतही अशाच प्रकारची गुंडगिरी केली होती. तासगावात राजकीय गुंडांकडून वारंवार असे दहशतीचे प्रकार होत आहेत. पोलिसांनी यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Sangli News Newly elected Sarpanch bitten by Bjp Activists