कदम-देशमुखांचा नवा ‘संग्राम’

कदम-देशमुखांचा नवा ‘संग्राम’

ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनानंतर होणाऱ्या कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विश्‍वजित कदम यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपकडून संग्रामसिंह देशमुखांना मैदानात पाठविल्याने येथे इतिहासाची पुनरावृत्तीच घडली आहे. भाजपच्या दबावतंत्राची ही रणनीती होती. पण आता काँग्रेसने पालघरच्या बदल्यात कडेगाव हा त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला असल्याने विश्‍वजित विरुद्ध भाजपला ‘संग्राम’ करावाच लागणार आहे. भविष्यातील मोठे मैदान पाहता ही निवडणूक चुरशीच असेल याचे संकेत पहिल्या दिवसापासून सूचित होत आहेत. 

पोटनिवडणूक केवळ औपचरिकता बाकी असल्याचे ठोकताळे मांडले जात असतना कडेगाव-पलूसचा सामना टोकाचा होणार आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सांभाळणाऱ्या विश्वजित कदम यांची ओळख  आधीपासूनच राज्यभर झाली आहे. शिवाय त्यांच्याबद्दल सहानुभूतीचेही मतदारसंघात वातावरण आहे. ज्या ताकदीने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर भाजप काय करणार याबद्दल मोठे कुतूहल निर्माण झाले होते.

संग्रामसिंह यांच्या उमेदवारीने या मतदारसंघात अनपेक्षितपणे चुरस निर्माण झाली आहे. कारण देशमुख विरुद्ध कदम या पारंपरिक सामन्यात खुद्द पतंगराव कदम या मतदारसंघात तीन वेळा हरले आहेत. १९८५ पासून पतंगराव कदम या मतदारसंघातून लढत होते. सहा टर्मपैकी सलग पंधरा वर्षे कॅबिनेट मंत्रिपदी राहिलेल्या पतंगरावांनी कडेगाव आणि पलूस या तालुक्‍यांचे सोने केले आहे. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून घरोघरी रोजगारही पुरवला आहे. 

सिंचन योजना, साखर कारखाने अशी विकासाची भलीमोठी यादी आहे. मात्र तरीही ऐन भरात असताना पतंगराव इथून दोनवेळा पराभूत झाले आहेत आणि ते कडेगावच्या देशमुखांकडूनच. १९९४ ला युती शासनाच्या रूपाने राज्यात सेना-भाजप सत्तेवर आली. तेव्हाच्या भिलवडी-वांगी मतदारसंघातून कै. संपतराव देशमुख यांनी कदम यांचा पराभव केला होता. त्यांच्या निधनामुळे १९९५ मध्ये पोटनिवडणूक झाली. त्यावेळी कै. देशमुख यांचे पुतणे पृथ्वीराज देशमुख  यांनी पुन्हा पतंगरावांचा पराभव केला. ती निवडणूक  पतंगरावानी पूर्ण ताकदीने लढवली होती.

आता संपतरावांचे पुतणे सध्याचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष  पृथ्वीराज देशमुख यांनी नंतर कधी पतंगरावांना बाय देत तर कधी लढत देत जिल्हास्तरीय नेते म्हणून मान्यता मिळवली आहे. पण आता भाजपने ज्येष्ठ म्हणून बाबांना थांबवून मेरीट पाहून त्यांचे चुलत बंधू संग्रमसिंह यांना मैदानात उतरवले आहे. तरुणाला तरुणानेच टक्‍कर द्यावी असाही भाजपचा होरा असावा. राजकीय पदार्पणातच संग्रामसिंह यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद मिळाले. जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादीच्या सोबतीने उपाध्यक्ष आहेत. संपतराव देशमुख यांच्यानंतरची पोटनिवडणूक कदम यांनी लढवली नसती तर आम्ही ही निवडणूक बिनविरोधी केली असती तसेच पतंगरावांच्या कन्या भारती लाड याच खऱ्या वारस असल्याने त्या उभ्या असत्या तर आम्ही पाठिंबा दिला असता असा नवा युक्‍तिवादही संग्राम यांनी केला आहे. 

संग्रामसिंह यांची ऐंट्री दीर्घपल्ल्याची असेल. माजी आमदार संपतराव देशमुख यांचे ते चिरंजीव ही त्यांची ओळख असली तरी एक यशस्वी साखर कारखानदार अशीही त्यांची प्रतिमा आहे. गोपूज हा त्यांनी निर्माण केलेला खासगी साखर कारखाना कौतुकास्पद कामगिरी करीत आहे. त्यांची अभ्यासू अशी प्रतिमा आहे. ते लांब पल्ल्याचे राजकारण करतील याबद्दल शंका नाही. 

पृथ्वीराजबाबांचे पुनर्वसन कोठे?
संग्रामसिंह यांना संधी दिल्याने त्यांचे चुलते व जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराजबाबा यांचे पुनर्वसन कोठे करणार, याबाबत चर्चा तर होणारच! या बदलामुळे जिल्ह्यातील भाजपची सगळी समीकरणे नव्याने मांडली जातील अशी शक्‍यता आहे. त्यात लोकसभेच्या उमेदवारीपासून ते तासगाव-कवठेमहांकाळसाठी कोण, इथेपर्यंतच्या नव्या रचनेचा समावेश असू शकतो. अर्थात पृथ्वीराज देशमुख यांचे काय, हा पुढचा प्रश्‍न असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com