पासपोर्ट कार्यालयास पसंत पडेना जागा 

बलराज पवार
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

पासपोर्ट सेवा केंद्र सांगलीत सुरू करण्यासाठी परराष्ट्र मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी मंजुरी दिली आहे. पोस्ट कार्यालयातील जागा अपुरी पडत असल्याचे मला समजले. सांगलीतील नागरिकांची पासपोर्टसाठी होणारी गैरसोय टाळण्यासाठी सेवा केंद्र सुरू करण्यात येईल. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जागा पासपोर्ट सेवा केंद्रासाठी मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. 
- खासदार संजय पाटील 

सांगली - सांगलीत मुख्य पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरू होणार ही खूषखबर येऊन सहा महिने होत आले पण कार्यालय सुरू होण्याच्या काही हालचाली अद्याप दिसेनात. टपाल कार्यालयातील जागेची पाहणी करूनही दोन महिन्यांचा कालावधी उलटला. पण, पासपोर्ट कार्यालयास जागाच पसंत नसल्याने सांगलीत कार्यालय सुरू करण्याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पुण्याचे हेलपाटे वाचणार असल्याच्या सांगलीकरांचा आनंदाचा हिरमोड झाला आहे. 

खासदार संजय पाटील आणि भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्ह्यासाठी पासपोर्ट कार्यालय मंजूर करून घेतले. तसे पत्र खासदार संजय पाटील यांना एप्रिल महिन्यात मिळाले. त्यानंतर राजवाडा चौकातील मुख्य टपाल कार्यालयात पासपोर्ट कार्यालयासाठी जागा देण्यात येणार होती. तेथे जागा ताब्यात घेतल्यानंतर पासपोर्ट कार्यालयाचे कर्मचारी नेमण्यात येऊन कार्यालय सुरू होणार आहे. एप्रिल महिन्यात पत्र मिळाल्यानंतर दोन-तीन महिन्यांत हे कार्यालय सुरू होण्याची शक्‍यता वाटत होती. पण जागा अपुरी असल्याने कार्यालय सुरू होण्यास अडचण निर्माण झाली आहे. 

जागा पसंत नाही 
पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी सांगलीत येऊन जागेची पाहणी केली. राजवाडा चौकातील पोस्ट कार्यालयातील पहिल्या मजल्यावरची जागा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र पासपोर्टसाठीची वर्दळ लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांना सतत वर-खाली करणे शक्‍य नाही. त्यांना अडचणी येणार यामुळे त्या जागेला नापसंती दर्शवली. त्यामुळे आपल्याकडे जागा उपलब्ध होत नसल्याचे पोस्ट कार्यालयाने त्यांना सांगितले. नंतर नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थलांतरणानंतर जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जागाही घेण्याबाबत विचार झाला, पण त्याचे भाडे कोण देणार हा प्रश्‍न आहे. पोस्ट आणि परराष्ट्र खाते दोन्ही केंद्र सरकारची असल्याने पोस्ट कार्यालयातच पासपोर्ट कार्यालय सुरू करणे उचित ठरणार आहे. 

तळमजलाही अपुरा 
पोस्ट कार्यालयाने नंतर तळमजल्यावरची काही जागा देण्याची तयारी दर्शवली. पोस्ट कार्यालयाला स्वत:ची यंत्रणा सुरळीत ठेवून पासपोर्ट कार्यालयाला जागा द्यायची आहे. सांगलीत दररोज 200 ते 230 नागरिक पासपोर्ट कार्यालयात येतील अशी शक्‍यता असल्याने तळमजल्यावरची जागाही पासपोर्ट विभागाला अपुरी वाटत आहे. त्यामुळे जागेची पाहणी करून गेल्यानंतर पुन्हा पासपोर्ट कार्यालयातून काहीच हालचाल झाली नाही. पासपोर्ट कार्यालयात सर्व यंत्रणा आणि कर्मचारी पासपोर्ट विभागाचे असणार आहेत. सध्या तरी पासपोर्ट कार्यालयाकडून सांगलीच्या जागेबाबत निर्णय झालेला नाही. याच ठिकाणी हे कार्यालय करावे लागणार आहे. पण त्याला किती कालावधी लागणार हे निश्‍चित नाही. 

कोल्हापुरातही अपुरी जागा 
परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांना पासपोर्ट मिळणे सोयीचे व्हावे यासाठी जिल्ह्याच्या पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य पोस्ट कार्यालयात हे केंद्र सुरू करण्यात येत आहे. सध्या कोल्हापुरात असे केंद्र सुरू झाले आहे. मात्र तेथेही अपुऱ्या जागेतच हे केंद्र सुरू आहे. सध्या कोल्हापुरात दररोज 225 ते 250 नागरिक या कार्यालयात येतात. जागा अपुरी असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागतो. 

त्रुटींसाठी पुणेच गाठावे लागणार 
पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी, अर्ज भरून घेणे यासाठी पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्राचा उपयोग होणार आहे. मात्र त्यानंतर अर्जात येणाऱ्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी पुण्यातील सेनापती बापट मार्गावरील कार्यालयातच जावे लागणार आहे. पण सेवा केंद्रामुळे नागरिकांचे पुण्याचे हेलपाटे वाचणार आहेत. 

Web Title: sangli news passport office