पतंगराव लढणारच...पण कुठे?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

सांगलीः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी पुन्हा निवडणूक लढणारच असा खडा टाकून सांगलीच्या राजकीय वर्तुळात अनेक तरंग उमटवले आहेत. त्याचवेळी त्यांनी निवडणूक विधानसभेची की लोकसभेची हे त्या-त्या वेळी ठरेल असे सांगून स्वतःच्या विधानसभा आणि सांगली लोकसभा मतदारसंघातील नव्या समीकरण मांडणीलाही वाव करुन दिला आहे.

सांगलीः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी पुन्हा निवडणूक लढणारच असा खडा टाकून सांगलीच्या राजकीय वर्तुळात अनेक तरंग उमटवले आहेत. त्याचवेळी त्यांनी निवडणूक विधानसभेची की लोकसभेची हे त्या-त्या वेळी ठरेल असे सांगून स्वतःच्या विधानसभा आणि सांगली लोकसभा मतदारसंघातील नव्या समीकरण मांडणीलाही वाव करुन दिला आहे.

पतंगरावांची महाराष्ट्राच्या राजकारणात बिंधास्त व्यक्तीमत्व अशी ओळख आहे. "कायम भावी मुख्यमंत्री' असे बिरुद त्यांच्यामागे लागले होते. अगदी परवा माजी आमदार संभाजी पवार यांच्या सत्कार समारंभातही ते बोलून दाखवले. शेजारी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीतून भाजपवासी होऊन जिल्ह्याचे पक्षाध्यक्षपद सांभाळणारे पृथ्वीराज देशमुख होते. त्यांना डिवचताना त्यांनी "आमची कामे कधीच थांबत नाहीत...कारण इतकी वर्षे आम्ही भरपूर पेरले आहे. अंबाड्या पेरल्या नाहीत.' असे सांगून भाजप सरकारमध्येही आमचे वजन आहे हे जाहीरपणे सांगितले. गेल्यावेळी त्यांनी त्यांच्या पलूस विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज यांचा बक्कळ मताने पराभव केला होता. त्यावेळी त्यांनी लोकांना सहानभूती मिळवण्यासाठी ही माझी शेवटचीच निवडणूक असाही प्रचार केला होता. पतंगराव विजयी झाले मात्र राज्यातून सत्ता गेली. गेली पंधरा वर्षे राज्यमंत्रीमंडळात असलेले पतंगरावांसाठी हा सत्ता दुष्काळाच काळ आहे. त्यांच्या "अस्मिता' बंगल्यावरच शासकीय बैठका व्हायच्या. सतत आगेमागे कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांचा राबता असे. भारती विद्यापीठाचे कुलपती म्हणून त्यांच्या गाडीवर कायम लाल दिवाही आता अडचणीत आला आहे.

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर पतंगराव निवडणूक लढवणार नसले तरी ते राजकारणातून बाजूला पडतील असे कुणालाच वाटत नव्हते. कदाचित केंद्रात राज्यात काँग्रेसची सत्ता असतील तर राज्यपाल किंवा राज्यसभा अशा वाटेवरही ते दिसले असते. मात्र आता त्यांनी या सर्वच शंकाना बगल देत आपण थेट निवडणूक लढवून सक्रीय राजकारणात राहणार असे जाहीर केले आहे. राज्यात मध्यावधी निवडणुकांची चर्चा सुरु असतानाचे त्यांचे वक्तव्य सूचक स्वरुपाचे आहे. पतंगराव लढतील म्हणजे कोणती निवडणूक लढवतील हा पुढचा प्रश्‍न ओघानेच येतो.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला आहे. विद्यमान खासदाराला डावलून काँग्रेसमध्ये नवा उमेदवार शोधला जात नाही याची चांगली प्रचिती पतंगरावांना वेळोवेळी आली आहे. वसंतदादा घराण्याचे दिल्ली दरबारातील वजन पाहता पतंगरावांना आत्ताही काँग्रेसचे माजी खासदार प्रतिक पाटील यांचे तिकीट कापणे अवघड असेल. कारण पराभव एकट्या प्रतिक यांचाच झालेला नसून काँग्रेसच्या देशातील दिडशे खासदारांचा झाला आहे. त्यामुळे या निकषावर काँग्रेसमधील अनेक दिग्गजांची उमेदवारी कापली जाऊ शकते. पतंगराव लोकसभेची निवडणूक लढवू शकतात. किंबहुना ती त्यांच्या मनातील सुप्त इच्छा आहे. तशी एकदा संधी त्यांना प्रकाशबापू पाटील यांच्या आजारपणाच्या काळात चालून आल्याची चर्चा होती. मात्र आता पतंगरावांना या वयात लोकसभेची उमेदवारी काँग्रेस देईल का हा प्रश्‍न आहे. वयाच्या निकषावर मला उमेदवारी देणार नसाल तर माझ्या मुलाला विश्‍वजीतला संधी द्या अशी मागणी ते पक्षश्रेष्ठींकडे करु शकतात. सांगलीचा लोकसभेचा बालेकिल्ला पुन्हा जिंकायचा असेल तर प्रतिक योग्य उमेदवार नाहीत हे बिंबवण्यासाठी त्यांना दिल्ली दरबारी खुप कष्ट सोसावे लागतील. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडणुकीतून विजयी झालेल्या विश्‍वजीत यांनी गेल्यावेळी पुणे लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद लावून निवडणूक लढवली होती. परक्‍या मतदारसंघातही त्यांनी सर्व बळ वापरून दिलेली लढत श्रेष्ठींच्या लक्षात आली आहे. आता तेच बळ ते सांगलीत वापरतील तर गणित जमू शकते असा दावा पतंगरावांचा असेल.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाचवेळी झाल्या तर मात्र पतंगरावांसमोर काही नवे प्रश्‍न असतील. त्याऐवजी या निवडणुका स्वतंत्रपणे झाल्या तर आधी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते पुर्ण ताकद लावू शकतील. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी आणि भाजपमधील अनेक मित्रांचे सहकार्य मिळू शकते. ज्येष्ठत्वाच्या नात्याने ते अनेकांकडे हक्काने शब्द टाकू शकतात. त्यांचे पक्षांतर्गत विरोधक असलेल्या वसंतदादांचे नातू विशाल आणि प्रतिक पाटील यांना त्यांनी वेळोवेळी त्यांच्या घसरलेल्या राजकीय वजनाची जाणिव करून दिली आहे. वसंतदादा घराण्याच्यावतीने सांगली महापालिकेची सत्ता सांभाळणाऱ्या मदन पाटील यांच्या निधनामुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळातही पोकळी निर्माण झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकांपासून ते बाजूला राहण्याची शक्‍यता आहे. एकदा का सांगली महापालिका क्षेत्रातून वसंतदादा घराण्याचे पुरते उच्चाटन झाले तर लोकसभेच्या जागेवरील त्यांचा दावा अधिक घट्ट होऊ शकतो. लोकसभेच्या आधीही महापालिका निवडणुका असतील. त्यामुळे ते या निवडणुकांमध्ये कितपत सक्रीय राहतील हे पहावे लागेल.
अर्थात ही सारी जर तरची गणिते आहेत. खुद्द होमग्राऊंड पलूस विधानसभा मतदारसंघातही त्यांच्यासमोर नवी आव्हाने उभी राहू शकतील अशी चिन्हे आहेत. पतंगरावांना आस्मान दाखवणारे माजी आमदार संपतराव देशमुख यांचे चिरंजीव संग्राम आता भाजपकडून जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद भुषवत आहेत. त्यांचा मतदारसंघातील वावर हेतूपुर्वक वाढला आहे. त्यामुळे पतंगराव लढणार म्हणाले असले तरी ते कोठे हा प्रश्‍न कायम आहे. त्याचा निर्णय परिस्थितीनुरुप होईल. एक निश्‍चित की त्यांनी आता पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरच्या विरोधकांना जागे केले आहे. ते आता त्यांच्या वाटेत काटे पसरण्यासाठी तयारीला लागतील हे नक्की.

■ ई सकाळवरील महत्वाच्या बातम्या

"भारत-सिंगापूर' मैत्रीमुळे चीन अस्वस्थ!
पवार 'समृद्धी' प्रकल्पाच्या विरोधात कसे?
#स्पर्धापरीक्षा - भारत-अमेरिका संरक्षण करार
'मुदतपूर्व'च्या फुक्‍या जोर-बैठका
पतधोरणाची पावले योग्य दिशेने
रविवारी भारत - पाकचा लंडनला डबल धमाका
भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल
कराल "नायगरा'ने गिळले विक्रमवीरास..
पुरूष नाटकामागे घडलेले नाट्य प्रथमच रंगमंचावर
लंडन : अग्नितांडवात किमान 65 मृत्युमुखी?
'SCO'त मतभेदांना स्थान नाही
ध्वनिक्षेपकावरून एकाच वेळी 'अजान'
लोकवर्गणीतून 7 कि.मी.पर्यंत नदीचे खोलीकरण व रुंदीकरण

Web Title: sangli news patangrao kadam and election