कुठे नेऊन ठेवली आमची एस.टी.? - पतंगराव कदम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

ऐन दिवाळीत एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप झाला. तो मिटविण्यात शासन अपयशी ठरले. शेवटी कोर्टाला संप मिटवायची वेळ आली. तेव्हा ‘‘कुठे नेऊन ठेवली आमची एस. टी.’’ अशा शब्दांत आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी युती शासनाला फटकारले. 

कडेगाव - पूर्वी गावात एस.टी. बस आली की, लोकांना स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटायचे, अशी ही एस. टी. तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. परंतु, आज एस. टी. बाबत शासनाचे नेमके काय धोरण आहे हे कळत नाही. ऐन दिवाळीत एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप झाला. तो मिटविण्यात शासन अपयशी ठरले. शेवटी कोर्टाला संप मिटवायची वेळ आली. तेव्हा ‘‘कुठे नेऊन ठेवली आमची एस. टी.’’ अशा शब्दांत आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी युती शासनाला फटकारले. 

येथे गुणवंत नागरिकांच्या गौरव समारंभात डॉ. पतंगराव कदम बोलत होते. या वेळी आमदार जयंत पाटील, मोहनराव कदम, नगराध्यक्षा आकांक्षा जाधव, उपनगराध्यक्ष साजीद पाटील, कर्जतचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड आदी मान्यवर उपस्थित होते.

ते म्हणाले की, ‘माझ्या राजकारणाची सुरवात एस.टी.बोर्डाचा संचालक म्हणून झाली. गाव तिथे एस.टी. ही संकल्पना राबविली. परंतु, ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप केला. तो मिटविण्यात सरकार अपयशी ठरले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून गांभीर्याने दाखल घ्यावी.’

आमदार जयंत पाटील म्हणाले, ‘सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एसटी कर्मचाऱ्यांना संप करावा लागला. तेव्हा नागरिकांची सोय बघण्यापेक्षा सरकारने स्वत:चा अहंभाव सोडला नाही. त्यामुळे राज्यात ऐन दिवाळीत आठवडाभर लोकांना एसटीचे दर्शन झाले नाही. लोकांची मोठी गैरसोय झाली. तसेच त्यांना डबल पैसे मोजावे लागले.’

माजी सरपंच विजय शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी कर्जत आगाराचे (रायगड विभाग) व्यवस्थापक डी. एस. देशमुख, समाजसेवक डॉ. अभिजित हिंदुराव मोरे, संशोधक माधुरी मांडके-मोरे, मेजर सत्यजित मोरे, रमजान शेख यांचा सन्मानचिन्हे देऊन डॉ. पतंगराव कदम व जयंत पाटील, मोहनराव कदम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, एस. टी. कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हणमंत ताटे, विभागीय सचिव आर. बी. पाटील, एस. टी. कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष विलास खोपडे, एस. टी. कामगार संघटना सांगलीचे विभागीय सचिव विलासराव यादव, राजाराम गरुड, गुलाम पाटील, चंद्रसेन देशमुख, सुरेश थोरात, मोहनराव यादव, नगरसेवक दिनकर जाधव, उदयकुमार देशमुख, सागर सूर्यवंशी, राजू जाधव, सुनील पवार, नगरसेविका नीता देसाई, मालन मोहिते, राजेंद्र राऊत, नसीमा मुल्ला, हैदर मुल्ला, कर्जत नगरपरिषदेचे नगरसेवक उमेश गायकवाड, सोमनाथ ठोंबरे उपस्थित होते. अविनाश जाधव यांनी आभार मानले.

Web Title: Sangli News Patangrao Kadam comment