साहेबांच्या रूपाने बाप भेटला, रखवालदाराची आठवण

साहेबांच्या रूपाने बाप भेटला, रखवालदाराची आठवण

सांगली - साहेब येणार म्हटलं की साऱ्यांचीच धावपळ सुरू व्हायची. साहेबांची गाडी आली की आम्ही पुढे जायचो. त्यावेळी ते कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच आमची विचारपूस करायचे. त्याच्या या स्वभावामुळेच माझ्या वडिलांवर तातडीने उपचार झाले, ही मदत मी आयुष्यभर विसरणार नाही, अशी भावना भारती विद्यापीठातील रखवालदार सूर्यकांत चव्हाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. 

पतंगराव कदम यांनी सामान्यांची नाळ आयुष्यभर सोडली नाही. शेकडो नव्हे, तर असंख्य कार्यकर्त्यांना त्यांचा आधार वाटायचा. इतकंच नव्हे, तर त्याच्या भारती विद्यापीठातील प्रत्येक कर्मचाऱ्याची ते वैयक्तिक विचारपूस करायचे. ‘काय बाबा, बरं चाललंय काय? काय म्हणतात घरचे? आई-बाबांना विचारतोस ना?’ असे प्रश्‍न ते नेहमी विचारायचे.

पतंगराव सांगलीतील भारती विद्यापीठात आले, त्या वेळी रखवालदार चव्हाण त्यांच्याजवळ गेले. ‘साहेब, माझ्या वडिलांची तब्येत बरी नाही. आपल्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. काय तर बघा.’ एवढंच बोलले होते. साहेब सहाव्या मजल्यावर पोचेपर्यंत हॉस्पिटलच्या अधिष्ठातांना त्यांनी स्वतः फोन केला. ‘आरे त्या चव्हाणच्या वडिलांचे काय आहे, ते नीट पाहा.’ एवढं त्यांनी सांगितलं. त्यानंतर एकही रुपया न घेता उपचार करण्यात आले. अशा हजारो आठवणी सांगता येतील. मात्र, त्यांच्या जाण्याने वटवृक्षासारखा सावली देणारा आधारस्तंभ नाहीसा झाला. समाजातील दुबळे नेहमी त्यांच्याकडे मोठ्या आशेने यायचे. त्या साऱ्यांना ‘साहेबां’नी कधीच रिकाम्या हाताने परत पाठविले नाही, ही त्यांच्यातील माणसाची खऱ्या नेत्याची ओळख होती.

सांगलीतील सर्व संस्थांतील कर्मचारी आज शोकसागरात बुडाले होते. जणू काही आपल्या घरचाच माणूस गेल्याच्या भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. नेहमी वर्दळ असणाऱ्या विजयनगर येथे उभारलेल्या भारती हॉस्पिटलमध्येही आज सुने-सुने होते. साहेबांची आठवण सांगताना तेथील कर्मचाऱ्याचे मन भरून येत होते.

ते म्हणाले, ‘‘साहेब ज्या वेळी भारती हॉस्पिटलमध्ये यायचे, त्या वेळी स्वच्छतेविषयी त्यांचा आग्रह असायचा.’’ ‘‘गरिबाकडे पैसे नसले तरी त्यांच्यावर पहिल्यांदा उपचार झाले पाहिजे,’’ असेच ते नेहमी सांगायचे. त्यामुळे ते ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये यायचे, त्यावेळी साऱ्यांमध्ये आदरयुक्त भीती होती.’’ सांगलीवाडीतील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय व भारती इन्स्टिट्यूटमध्येही त्यांचा नेहमी वावर असायचा. 

सामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यात पुढाकार 
डॉ. पतंगराव कदम सांगलीचे पालकमंत्री असताना अख्खा जिल्हा ढवळायचे. सामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यात त्यांचा पुढाकार असायचा. प्रत्येक अधिकाऱ्याला ‘अस्मिता’ बंगल्यावर बोलावून थेट सामान्य माणसाच्या अडचणी सोडविल्या जायच्या. कोणालाही आश्‍वासन देताना काम होणार असेल तर केले जायचे. अन्यथा तुझे काम होणार नाही बाबा, असे ते सांगायचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com