काँग्रेस चालते कशी, पतंगराव म्हणतात तशी!

सांगली - मदनभाऊ पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या खासदार संजय पाटील, ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसजनांमध्ये व्यासपीठावरच गप्पांचा फड रंगला.
सांगली - मदनभाऊ पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या खासदार संजय पाटील, ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसजनांमध्ये व्यासपीठावरच गप्पांचा फड रंगला.

सांगली - गेल्या चाळीस वर्षांच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा उभा आडवा पट ज्ञात असलेल्या माजी मंत्री पतंगराव कदम यांनी आज सांगलीत ‘काँग्रेस चालते कशी’ याचे अनेक दाखले देत सभा जिंकली. निमित्त होते माजी मंत्री मदन पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित पुतळा अनावरण समारंभाचे. व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण होते. त्यांच्यासमोर त्यांनी मदन पाटील यांच्या अनेक आठवणींना उजाळा देतानाच जिल्ह्याच्या इतिहासातील पडद्याआडच्या काही राजकीय लढायांचाही इतिहास जागवला. 

वसंतदादांनंतर त्यांच्या घराण्यातील सर्वाधिक कर्तृत्ववान आणि रगेल नेता, असा उल्लेख करीत मदनभाऊंच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. ते म्हणाले, ‘‘अनेक स्थित्यंतरे मी पाहिली. मदनभाऊ खासदार झाला, त्या वेळी आनंदराव मोहिते यांना खासदारकीचे तिकीट मिळालेच होते. यादीत ऐनवेळी बदल झाला. मदनला तिकीट मिळाले. चौकशी केली तर ते तिकीट प्रकाशबापूंनी बदलले होते. काँग्रेसमध्ये असं ‘का?’ विचारायचं नसतं. अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्या वेळी नारायण राणे बंड करणार होते.

माझ्याकडेही लोक आले. मी सांगितले आम्ही काँग्रेसच्या बाजूने राहू. काँग्रेसमध्ये दमाने मिळते. तुम्ही (अशोकरावांकडे पहात) मदनला मंत्रिपद दिले. त्याला दिलेल्या पणन मंत्रिपदावर एका काँग्रेसवाल्याचा डोळा होता. मदनचा मला फोन आला. मी म्हटले, ‘अजिबात सोडू नको. तुझ्या आवडीचं खातं हाय.’ काँग्रेसमध्ये कधी काय बदलेल हे सांगता यायचं नाही. इथं बसलेल्या हाफिज धत्तुरेचंही तसंच. इतका नशिबवान आमदार मी कधीच पाहिला नाही. रेल्वे स्टेशनवर आलो आणि मला सांगितलं गेलं, मिरजेला धत्तुरेला तिकीट दिलेय. मी ह्याला काळा की गोरा पाहिला कधी पाहिला नव्हता. स्टेशनवरच ह्यो भेटायला आला. अभिनंदनाचा पुष्पगुच्छ आणि दोन लाख तिथेच दिले. ते दोन लाखही शिल्लक ठेवून ह्यो आमदार झाला.

पुढच्या खेपेलाही यादीतले नाव वगळले होते. मात्र ऐनवेळी अहमद पटेल यांनी नाव घातले. आमच्या नेत्यांचे ते पोलिटिकल सेक्रटरी. त्यांच्यामुळे काँग्रेस कशी चालते हे तुम्हाला वेगळं सांगायला नको.’’

बदललेल्या राजकीय वर्तन आणि व्यवहारावर भाष्य करताना पतंगराव म्हणाले, ‘‘मदनने माणसं सांभाळली. त्यासाठी संस्थांचीही त्याने पर्वा केली नाही. आता निष्ठा शोधायच्या कुठे? इथे बसलेला संजय सकाळपर्यंत आमच्यात होता. सायंकाळी भाजपचा उमेदवार झाला. असो. जनता जनार्दन ज्याला त्याला संधी देतो. विजयानंतर कुणाचा द्वेष मत्सर करू नका. माझ्यासारखा फाटका माणूस ३५ वर्षे आमदार झाला. पंधरा वर्षे मंत्री झाला.

हा जनतेच्या ताकदीचा विजय आहे. निवडणुकीपुरताच जय पराजय. त्यापलीकडे जायला हवे. लोकांची कामे झाली पाहिजेत. त्यासाठी आपण  काम केले पाहिजे. कामे रेटून करावी लागतात. शैलजाभाभींना त्यांच्या वाढदिवासाला नऊ कोटींचा धनादेश दिला. सोनी कारखान्यासाठी. तो कारखाना आणि धनादेश कुठे गेला हे काही मला सजमले नाही. मदन दिलेला शब्द पाळायचा. त्याच्या पश्‍चातही जयश्रीताई म्हणतात, ‘‘त्यांनी हारुणला महापौर करायचा शब्द दिलाय. आम्ही त्याला महापौर केला.’’ गेल्या निवडणुकीला आम्ही एकत्र येऊन जिंकणाऱ्याला संधी द्यायचा निर्णय घेतला. पूर्ण बहुमताने महापालिका जिंकली. त्यानंतर प्रत्येक निवडीवेळी मदनच प्रत्येकाला संधी द्यायचा. फक्त गव्हर्नरच्या आदेशाला ‘जी.आर.’ जातो तसा मी फक्त सहीचा धनी होतो. या किशोरला गटनेता केला आणि विचारायला माझ्याकडे पाठवले. मी काय नाही म्हणणार?’’

जयश्री पाटील यांनी केलेल्या लिखित भाषणाची प्रत आवर्जुन मागून घेत पतंगरावांनी त्यावर होमवर्क केला. त्यानंतर ते बोलायला उभे राहिले होते. त्याचा संदर्भ देत ते म्हणाले, ‘‘जयश्रीताईंनी भाषणात कार्यकर्ते सांभाळायचा शब्द दिलाय. त्यांचा सात्विक स्वभाव पाहता त्या पालिका कशा सांभाळणार हे आव्हानच. कारण मी कधीच पालिकेच्या राजकारणात लक्ष घातले नाही. इथे मोठी टोळी आहे. सारखा गोंधळ असतो. किशोर...आता काय गोंधळ नाही नं? असो, अशोकराव इकडे लक्ष द्या. जयश्रीताईंनी लढायचा निर्धार केला आहे. आपल्या सर्वांची ताकद त्यांना हवी. त्या आता नातेवाईक झाल्या म्हणून हे मी सांगत नाही हेही लक्षात घ्या. आम्ही तुमच्या सोबत राहू. त्यांच्या कुटुंबाला मदत करू. सरकार कुणाचेही असो आमचे अडत नाही. कारण आम्ही आयुष्यभर गहूच पेरत आलो आहोत. कुठेही आमचा शब्द चालतो. पुढची लढाई मोठी आहे. सारे मिळून लढूया.’’

घोटाळा अन्‌ कळ 
अशोक चव्हाणांना चिमटा काढताना पतंगराव म्हणाले, ‘‘अशोकराव लई चांगली कामे करतो; पण कधी कधी ‘घोटाळा’ करतो.’’ त्यांना मदन पाटील यांची आठवण सांगताना पतंगराव म्हणाले, ‘‘एकदा तर मदनने सारी काँग्रेसच पाडली.’’ युती सरकारच्या पहिल्या टर्मच्या विधानसभेवेळच्या राजकारणाला पतंगरावांनी उजाळा दिला.’’ ते म्हणाले, ‘‘मदन असं का केलंस म्हणून विचारलं तर म्हणाला, ‘‘माझी कळ काढत होते. म्हटलं आपुनबी थोडी त्यांची कळ काढावी. मदन असा होता. रगेल. कर्तृत्ववान जबरदस्त नेता.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com