पवार बंधू ‘शिवबंधना’तच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

सांगली - माजी आमदार संभाजी पवार यांच्या दोन्ही पुत्रांनी ‘शिवबंधना’तच राहायचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीराज आणि गौतम पवार शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसू लागले आहेत. आता त्यांचे शिवसेनेत नव्या-जुन्यांशी कसे सूर जुळतात, हे यथावकाश ठरेल.

सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची उमेदवारी घेतलेले पृथ्वीराज त्या निवडणूक निकालानंतर शिवसेनेपासून सुरक्षित अंतरावरच होते. त्यानंतरच्या काळात मात्र ते सेनेत रमले नाहीत. दुसरीकडे गौतम पवार यांनी महापालिकेत स्वाभिमानी आघाडी पुढे सुरू ठेवली. तेही सेनेत आहेत, एवढेच सांगायचे. ते भाजपमध्ये जातील, अशी चर्चाही मध्यंतरी रंगली होती. गौतम पवार हे नेहमीच भाजपमधील जुन्या आठवणींना हेतूपूर्वक प्रसंगपरत्वे उजाळा देत असतात.

मध्यंतरी त्यांनी शिवसेना-भाजप युतीची चर्चा सुरू असल्याचे सांगून बॉम्ब टाकला होता. मात्र, तो काही फुटला नाही. आता या साऱ्या चर्चेवर त्यांनी पडदा टाकायचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यत्व पृथ्वीराज पवार यांनी स्वीकारले. नुकतेच नगरसेवक गौतम पवार यांनी मुंबईत सर्व सेना पदाधिकाऱ्यांबरोबर पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आता पवार बंधू ‘शिवबंधना’तच राहणार असले, तरी त्यांचे सेनेत सूर जुळणार का, हा पुढचा प्रश्‍न असेल. एक निश्‍चित की, पवार बंधूंच्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या पालिका क्षेत्रात जुळवाजुळवीला चांगलीच गती येणार आहे.

Web Title: Sangli News Pawar brothers in ShivSena