पेट्रोल-डिझेल दरवाढीचा जूनपासूनच भडका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

सांगली -  ‘डायनॅमिक प्राईस’ पद्धत सुरू झाल्यानंतर पेट्रोलचे दर दोन महिन्यात सात रुपयाने, तर डिझेल साडे तीन रुपयाने वाढले. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या दरावर पेट्रोल-डिझेलचे दर ठरवले जातात असे सांगितले जाते. परंतु कच्च्या तेलाचे दर कमी झाले तरी पेट्रोल-डिझेलचे दर मात्र वाढतच आहेत. तसेच राज्य व राष्ट्रीय महामार्गावर दारूबंदी केल्यानंतर महसूल वाढवण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील अधिभार ८ रुपयांवरून ११ रुपये केला. परंतु दारू दुकाने पुन्हा जोमाने सुरू झाली तरी अधिभार कमी केला नाही. पैशापैशाने दरवाढ सुरू असताना ग्राहकांच्या संतापाचा भडका उडाला आहे.

देशात १६ जून पासून पेट्रोल आणि डिझेल दरवाढीसाठी ‘डायनॅमिक प्राईस’ पद्धत अवलंबली गेली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या  तेलाचे दर दररोज बदलत असल्यामुळे त्याच धर्तीवर पेट्रोल-डिझेलचे दर ठरवणारी ही पद्धत आहे. ती लागू करताना पेट्रोल आणि डिझेल सव्वा रुपयाने स्वस्त केले. तसेच दोन आठवडे पैशा-पैशाने दर कमी केले. त्यानंतर जी दरवाढ सुरू  झाली ती थांबलीच नाही. गेले दोन महिने पेट्रोल- डिझेल पैशापैशाने वाढतच चालले आहे.

दररोज पैशाने वाढणारे दर ग्राहकांच्या लक्षातच आले नाहीत. दोन महिन्यात पेट्रोल सात रुपयाने तर डिझेल साडे तीन रुपयाने वाढले. पेट्रोल ८० रुपयांपर्यंत तर डिझेल ६१ रुपयांपर्यंत गेले आहे. दरवाढीचे ‘स्लो-पॉयझनिंग’ आता कुठे ग्राहकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे सर्वत्र संतापाचा भडका उडाला  आहे. कच्च्या तेलावर पेट्रोल-डिझेलचे दर ठरतात असा युक्तिवाद एकीकडे केला जातो. परंतु गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाचे दर घसरले तरी पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच आहे. ग्राहकांची विनाकारण केली जाणारी लूट समोर आली आहे. 

कच्चे तेल २१ रुपये लिटर-
कच्च्या तेलासाठी ऑईल कंपन्या सध्या २१.३६ रुपये लिटरमागे देतात. एंट्री टॅक्‍स, रिफायनरी, लॅंडिंग कॉस्ट आणि इतर खर्च ६.०३ रुपये येतो. ट्रान्स्पोर्टसाठी ३.३१ रुपये धरून हा खर्च ३०.७० रुपये इतका आहे. त्यानंतर एक्‍साईज, व्हॅट आणि इतर कर, पंपचालकांचे कमिशन मिळून सध्या ८० रुपये लिटर  दराने पेट्रोलची विक्री होते. विविध करापोटी ग्राहकांना सध्या ४९ रुपये मोजावे लागतात.

ग्राहकांना १३-१५ रुपये भुर्दंड-
कच्च्या तेलाचे कमी झालेले दर आणि विविध कर याचा विचार केला तर सध्या ६५ ते ६७ रुपये लिटर दराने पेट्रोलची विक्री ठीक राहील. परंतु ग्राहकांना १३ ते १५ रुपयांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया पेट्रोल पंपचालकांनी नाव न छापण्याच्या  अटीवर दिली.

महामार्गावर पाचशे मीटर अंतरात दारूबंदीनंतर महसूलवाढीसाठी सरकारने पेट्रोल-डिझेलवर अधिभार ८ रुपयावरून ११ रुपये केला. आता महापालिका क्षेत्रात दारूची दुकाने पुन्हा सुरू करायची परवानगी दिली. त्यामुळे महसूल वाढलाच आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलवरील वाढवलेला अधिभार कमी केला पाहिजे. यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
- सतीश साखळकर   स्वाभिमानी विकास आघाडी

Web Title: sangli news Petrol-diesel