सांगली पोलिस अडचणीत; पळालेल्या आरोपीच्या घातपाताचा संशय 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. दोन्ही आरोपींना काल (सोमवारी) रात्री अकराच्या सुमारास चौकशीसाठी कोठडीतून बाहेर काढले होते. या प्रकरणाचे तपास अधिकारी उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्यांच्या पथकाने त्यांना बाहेर काढले. त्यावेळी त्यांनी पोलिसांना हिसडा देवून ते पळून गेले, अशी नोंद स्टेशन डायरीत करण्यात आली आहे

सांगली - कवलापूर येथील अभियंता संतोष गायकवाड यांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या संशयित आरोपींनी काल (सोमवारी) रात्री चौकशीसाठी कोठडीतून बाहेर काढले असताना पोलिसांना हिसडा देवून पलायन केले. मात्र यातील अनिकेत अशोक कोथळे याचा घातपात झाल्याच्या चर्चेने त्याच्या नातेवाईकांनी शहर पोलिस ठाण्याच्या आवारात ठाण मांडले. पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे तणाव निर्माण झाला. आमदार सुधीर गाडगीळ आणि युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम यांनी शहर पोलिस ठाण्यात भेट दिली. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करुन संशयितांना हजर करावे अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू शकतो, असा इशारा दोघांनी दिला.

याबाबत अधिक माहिती अशी, श्री. गायकवाड यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून दोन हजारांची रोकड आणि मोबाईल पळवून नेण्याचा प्रकार कोल्हापूर रोडवर रविवारी घडला होता. यातील संशयित आरोपी अनिकेत कोथळे आणि अमोल सुनील भंडारे (दोघेही रा. भारतनगर, कोल्हापूर रोड, सांगली) यांना शहर पोलिसांनी अटक केली होती. त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. दोन्ही आरोपींना काल (सोमवारी) रात्री अकराच्या सुमारास चौकशीसाठी कोठडीतून बाहेर काढले होते. या प्रकरणाचे तपास अधिकारी उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्यांच्या पथकाने त्यांना बाहेर काढले. त्यावेळी त्यांनी पोलिसांना हिसडा देवून ते पळून गेले, अशी नोंद स्टेशन डायरीत करण्यात आली आहे. 

आज सकाळी आरोपी पळून गेल्याचे वृत्त सगळीकडे पसरले. त्यानंतर दुपारपर्यंत त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती होती.

Web Title: sangli news: police