पोलिस दलाचा उत्कृष्ट खेळाडू अनिल ऐनापुरे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

पोलिस दलातून ऍथलेटिक्‍समध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणारा पहिला खेळाडू... 400 मीटर अडथळा शर्यतीमध्ये दोन नवीन राज्य विक्रम प्रस्थापित करणारा.. राज्य पोलिस दलाचा उत्कृष्ट खेळाडू.. पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह सर्वांत कमी वयात पटकावणारा खेळाडू असा बहुमान पटकावणाऱ्या हवालदार अनिल ऐनापुरे याने अनेक अडथळे पार करत वर्चस्व सिद्ध केले. महिनाकाठी 20 ते 22 हजारांचा "डाएट' चा खर्च, पोलिस दलाची नोकरी आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी तो कसून सराव करत आहे.

पोलिस दलातून ऍथलेटिक्‍समध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणारा पहिला खेळाडू... 400 मीटर अडथळा शर्यतीमध्ये दोन नवीन राज्य विक्रम प्रस्थापित करणारा.. राज्य पोलिस दलाचा उत्कृष्ट खेळाडू.. पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह सर्वांत कमी वयात पटकावणारा खेळाडू असा बहुमान पटकावणाऱ्या हवालदार अनिल ऐनापुरे याने अनेक अडथळे पार करत वर्चस्व सिद्ध केले. महिनाकाठी 20 ते 22 हजारांचा "डाएट' चा खर्च, पोलिस दलाची नोकरी आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी तो कसून सराव करत आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीमुळे दोनवेळा वनस्टेप प्रमोशन मिळवून अनिल हवालदार म्हणून पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. 

तो म्हणाला, आमचे ऐनापुरे कुटुंब मूळचे जतचे. वडील कृषी विभागात नोकरीस, तर आई गृहिणी. 2004 मध्ये सांगली हायस्कूलमध्ये शिकताना अडथळा शर्यतीने माझे लक्ष वेधले. त्यात कौशल्य प्राप्त करत शालेय राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत बक्षिसे पटकावली. प्रशिक्षक राजेंद्र कदम यांचे मार्गदर्शन लाभले. 2008 मध्ये सांगली पोलिस दलात खेळाडू म्हणून भरती झालो. पोलिसांच्या 400 आणि 110 मीटर अडथळा शर्यतीत वर्चस्व सिद्ध केले. 2009 मध्ये केरळला आणि 2011 मध्ये नवी दिल्लीत अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला. 2014 पर्यंत या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली. 

23 व्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत 400 मीटर अडथळामध्ये 54.85 सेकंदाची नोंद करत पूर्वीचा विक्रम मोडला. 27 व्या स्पर्धेत स्वत:चाच विक्रम मोडून 53.84 सेकंदाची नोंद केली. झारखंड, केरळ येथील राष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभाग नोंदवला. 2012 ते 2015 पर्यंत सलग चार वर्षे राज्य पोलिस स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा विक्रम रचला. 

या सगळ्या कामगिरीच्या जोरावर गोवा येथे 2014 मध्ये झालेल्या चौथ्या लुसूफोनिया आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत माझी निवड झाली. पोलिस दलातर्फे ऍथलेटिक्‍समध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड होणारा मी पहिलाच खेळाडू ठरलो. 28 देशांतील खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले. त्यामुळे चुरस होती. तेथे मी पाचवा क्रमांक मिळवला. 

सर्वांत कमी वयात पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह मिळवले. अनेक अडथळे पार करत कामगिरीची नोंद करताना काका नानासाहेब ऐनापुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे माझ्या उजव्या हातावर "काका' नावाने टॅटू कोरला आहे. स्पर्धेसाठी सराव करताना खाण्यापिण्याकडेही लक्ष द्यावे लागते. प्रती महिना 20 ते 22 हजारांचा डाएटचा खर्च आहे. नोकरी आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळत सराव सुरू आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची धडपड आणि जिद्द कायम आहे. 

(शब्दांकन - घन:शाम नवाथे )

Web Title: sangli news police Anil Anapure