हॉटेल आवारातील मृतदेह गेटबाहेर कुणी आणला?

हॉटेल आवारातील मृतदेह गेटबाहेर कुणी आणला?

सांगली - पोलिस कर्मचारी समाधान मांटे यांच्या खूनप्रकरणी हॉटेल रत्ना डिलक्‍सचे मालक कुमार कुमसगे यांच्यासह सहाजणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

मांटे यांचा खून हॉटेलच्या आवारात झाल्याचे सीसीटीव्हीत दिसत असताना त्यांचा मृतदेह गेटच्या बाहेर काढून ठेवला होता. तेथेच पंचनामा करण्यात आला. त्यामध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. समाधान मांटे यांचा गेल्या मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेल रत्ना डिलक्‍स येथे काउंटरवर झालेल्या वादातून झाकीर जमादार याने धारदार हत्याराने सपासप वार करून खून केला होता. हा प्रकार हॉटेलच्या गेटच्या आत घडला होता. तो हॉटेलच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी झाकीर जमादारसह त्याचा मेहुणा वसीम शेख आणि दोन मित्र अतहर नदाफ व अन्सार पठाण यांना यापूर्वीच अटक केली आहे.

हल्ल्यानंतर मांटेंचा मृतदेह हॉटेलच्या गेटच्या आत असताना तो गेटबाहेर फुटपाथवर काढून ठेवला होता. आतील बाजूस पडलेले रक्त पाण्याने धुवून टाकले होते. पोलिसांनीही फुटपाथवरच्या मृतदेहाचा पंचनामा केल्याची नोंद आहे. मृतदेह हॉटेलच्या बाहेर काढून पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. सीसीटीव्हीमध्ये मृतदेह गेटच्या आत दिसत असताना तो बाहेर कसा गेला, कुणी नेला, जागेवरच पंचनामा न करता त्याची जागा कशी बदलली, असे प्रश्‍न उभे राहिले आहेत. 

या प्रकरणी पोलिस कुटुंबीय आणि निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी संघटनेनेही पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी हॉटेल मालक कुमार कुमसगेसह व्यवस्थापक आणि इतर चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शहर विभागाचे उपअधीक्षक अशोक वीरकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, मुख्य संशयित झाकीर जमादार आणि त्याचा मेहुणा वसीम शेख यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. जमादार सांगलीतून आष्ट्याला शेखकडे गेला होता. त्यानंतर तो कोल्हापूरला गेला होता. या दरम्यान काय काय घडले याचा तपास करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com