पोलिसाचा खून.. एवढेच उरले होते...

शेखर जोशी
गुरुवार, 19 जुलै 2018

गेल्या वर्षी सांगलीच्या पोलिसांचे अंकली टोल नाक्‍यावर टोळीयुद्ध झाले. नुकतेच पोलिसांनी कोठडीत हत्याकांड केले. कुरुंदकर नामक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आपल्या सहकारी महिला पोलिस अधिकाऱ्याचा बेपत्ता करून खून केला. आता चक्क एका गुंडाने वर्दीतील पोलिसाचा खून केला. आता काय उरले? पूर्वी पोलिसाची भीती दाखवून लहान मुलाला भीती घातली जायची. आता सारेच संपले. पोलिस गुन्हेगारांना रोखण्यासाठी पुढे जाण्याचे धाडस करतील काय? 

‘रत्ना’बारमध्ये पोलिसाचा खून’ या वॉटसॲपवरील एका धक्‍कादायक मेसेजने सांगलीकरांची बुधवारची सकाळ उजाडली... आता लोकांना खून ही गोष्ट फार सुन्न करत नाही. महिन्यात एक-दोन म्हणजे आता सवयीचे झाले आहे. टोळीयुद्धातले, भाऊबंदकीतले, आर्थिक आणि अनैतिक संबंधातून खून पडत राहतात... पण आता चक्‍क वर्दीत असताना पोलिसाचाच खून झाला आहे, तो देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साक्षीने. किती मोठे धाडस. वाईटांना (खलांना) वाटणारा धाकसुद्धा संपल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. ‘सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय’ असे पोलिसांचे घोषवाक्‍य आहे; पण खल म्हणजे गुन्हेगारच पोलिसांना संपवू लागल्याचा अत्यंत वाईट मेसेज समाजात जातो आहे. कायदा व सुव्यस्थेचा असा बोऱ्या कधीच वाजला नव्हता. 

वर्षभरापूर्वी सांगली पोलिसांच्या अब्रूची लक्‍तरे ज्या कोथळे प्रकरणाने राज्याच्या वेशीवर टांगली गेली, त्यातून काहीच धडा वर्दीने घेतलेला दिसत नाही. इथे बदली होऊन आलेल्या पोलिस अधीक्षकांनी काय दिवे लावले हे आता दिसून आले आहे. त्यावेळी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी कोथळे प्रकरणाने खाकीला शरम आणली, अशा शब्दांत दिलगिरी व्यक्त केली होती. त्यावेळी परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटलांनीही पोलिसांची ही चूक पोटात घ्या, असे आवाहन करीत जनतेची माफी मागितली. पण त्यातून काय घडले? पोलिसांचा कारभार ज्या पद्धतीने चालला आहे त्यानुसार ना काळे धंदे बंद आहेत, ना गुंडांच्या टोळ्यांना आळा बसला आहे. गुंड तडीपार केले किंवा मोका लावला तरीही फळकुट दादांपासून ते नामचीन गुंडांची दहशत कायम आहे. ती सामान्यांसाठी सोडा, आता पोलिसांनाही भीक घालत नाही. आता पोलिस रोज उठून कोणत्या तरी चौकात जी तपासणी करतात, त्यात आतापर्यंत किती गुन्हेगार सापडलेत? का सामान्यांनाच रोज वेठीस धरायचे आणि गुंडांना मोकाट सोडत चेक पोस्टची नुसती नौटंकी करायची, असा सवाल संतप्त जनतेतून व्यक्‍त होत आहे. 

गृहखात्याने आता सांगलीची सूत्रे तरुण तडफदार आणि थेट आयपीएस असलेल्या सुहैल शर्मांकडे सोपविली. शर्मा यांनी मध्यंतरी तासगाव येथील राजकीय हाणामारीच्या प्रकरणात कोणाचाही मुलाहिजा व दबाव न घेता काम केले. पण एकूणच बेसिक पोलिंसिंगबाबत आजही तीच रडकथा आहे. पोलिस आणि गुन्हेगार यांचे संबंध... हप्तेखोरीत सापडलेली खाकी वर्दी, काळ्या धंद्यांना दिले जाणारे आंदण यामुळे पोलिस आजही बदनामच होत चालले आहेत. मध्यंतरी दोन पोलिसांत सिनेमास्टाईल गॅंगवॉरसारखी मारामारी लोकांनी पाहिली. वारणानगर प्रकरणात तर एलसीबीचे अधिकारी तपासासाठी गेले आणि स्वत:च दरोडा टाकून रक्‍कम हडप करून बसले. कोथळे प्रकरणात तर पोलिसांनी खून केला, असे आरोप झाले आणि आता तर पोलिसाचा वर्दीत असतानाच खून झाला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पण यातून एक प्रक्रियाही घडते आहे ती म्हणजे एका दुष्टचक्राची आहे. 

सांगलीचा संजयनगर भाग आणि मिरजेतील काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत काही हॉटेल-बार हे कोणाच्या कृपेने चालू राहतात? काही बारचे मालक तर अनेक गुन्ह्यांत अडकलेलेच आहेत. अशांच्या बारमध्ये पोलिस अधिकारी व त्यांचे कनिष्ट यांची ऊठबस असल्याचीही चर्चा ऐकायला मिळत असते. गुन्हेगारांचे धाडस असे एका दिवसात वाढत नसते. बारवाल्यांचाही आता पोलिसांना धाक राहिलेला नाही. सध्या सांगलीत आचारसंहिता सुरू असताना साडेदहा वाजता बार बंद करायचा नियम असताना इथेच का सवलत? यातले सारे तपशिल महत्वाचे नाहीत. तर पोलिस यंत्रणा अशा प्रकारांबाबत किती हलगर्जी वागते हे महत्वाचे. पोलिस यंत्रणा आता यातून काय धडा घेते यावर समाजाच्या सुरक्षेचे भवितव्य अवलंबून असेल.
 

Web Title: Sangli News Police Murder special