‘खलनायक प्रतिमे’चा सदाभाऊंपुढे पहाड

अजित झळके
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

‘स्वाभिमानी’ असेल पहिले लक्ष्य; मुंडे गटाकडेही डोळा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल नव्या शेतकरी संघटनेची घोषणा केली. भाजप सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री असल्याचा नवी संघटना बांधताना त्यांना फायदा होईल. मात्र, ‘खलनायक प्रतिमा’ हेच पहाडासारखे आव्हान आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या संघटनेतून सदाभाऊ कार्यकर्ते कसे फोडणार आणि माजी मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर दुर्लक्षित झालेले राज्यभरातील मुंडे समर्थक सदाभाऊंचा ‘बिल्ला’ लावणार का, याकडे लक्ष असेल.    
 

‘स्वाभिमानी’ असेल पहिले लक्ष्य; मुंडे गटाकडेही डोळा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल नव्या शेतकरी संघटनेची घोषणा केली. भाजप सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री असल्याचा नवी संघटना बांधताना त्यांना फायदा होईल. मात्र, ‘खलनायक प्रतिमा’ हेच पहाडासारखे आव्हान आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या संघटनेतून सदाभाऊ कार्यकर्ते कसे फोडणार आणि माजी मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर दुर्लक्षित झालेले राज्यभरातील मुंडे समर्थक सदाभाऊंचा ‘बिल्ला’ लावणार का, याकडे लक्ष असेल.    
 

खासदार राजू शेट्टी यांच्याशी संघर्ष टोकाला पोचल्यानंतर आणि संघटनेतून हकालपट्टी होण्याच्या आधी सदाभाऊ भाजपमध्ये जायला इच्छुक होते. पहिल्या टप्प्यात चिरंजीव सागर आणि नंतर स्वतः हातात ‘कमळ’ घ्यायचा इरादा त्यांनी स्वतः बोलून दाखवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली होती; पण कुठे तरी माशी शिंकली. ते मागे पडले.

संघटनेतून हकालपट्टीनंतर सदाभाऊ अस्वस्थ होते. भाजपमध्ये जाण्याचा पर्याय होता; मात्र जोवर फडणवीस मुख्यमंत्री आहेत तोवर ठीक... खांदेपालट झाल्यावर काय? गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांच्या समर्थकांची जी अवस्था झाली ती भाऊंनी उघड्या डोळ्यांनी पाहिलीय. त्यामुळे अडगळीत पडण्यापेक्षा स्वतःचे वेगळे व्यासपीठ बांधणे कधीही चांगले, हे त्यांनी ताडले.

भाजपला शेतकरी बेस असलेला वेगळा फोरम हवाच होता. राजू शेट्टी डोईजड होत असताना त्यांचा प्रभाव कमी करायचा होता. अशावेळी सदाभाऊंनी स्वतःची वेगळी संघटना स्थापन करावी, असा पर्याय पुढे आला. अर्थातच, तो मुख्यमंत्र्यांसोबत विचारविनिमयातून झालेला निर्णय  आहे, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळेही सत्तेच्या उबीला बसून शेतकरी संघटना कशी बांधली जाते आणि त्याचा अजेंडा काय असेल, याकडे लक्ष असणार आहे. 

सदाभाऊ सत्तेत आहेत. कृषी, पणन, स्वच्छता आणि पाणीपुरवठा अशा चार खात्यांचे राज्यमंत्री आहेत. कदाचित, त्यांना प्रमोशन मिळेल, ते कॅबिनेट मंत्री होतील. भविष्यात राजकारणाचा काटा बदलेल. या घडीला सत्तेचा फायदा ते घेणार, यात तीळमात्र शंका नाही. इस्लामपूर नगरपालिकेत भाजपचाच नगराध्यक्ष आहे, निम्मे नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेत सदस्य आहेत. भाजपमध्ये खूपच गर्दी झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नाराजांची कोंडी झाली आहे. या साऱ्यांसाठी सदाभाऊंनी आधीच गळ टाकला आहे. काही बडी नावे या नव्या संघटनेत सहभागी व्हायची शक्‍यता असल्यास महामंडळ अध्यक्षपदाचे दरवाजे उघडले जाऊ शकतील.

रिकामी पडलेली ही खाती सदाभाऊंच्या  संघटना बांधणीला बळ देऊ शकतील. खुद्द मुख्यमंत्र्यांचे पाठबळ असल्याने भाजपकडूनही फार कुरबूर व्हायची शक्‍यता नाही. या ‘जाल द ट्रॅप’मध्ये शेट्टींचे समर्थक सापडतील का, यावर त्यांचे फोकस राहील. कारण, संघटनेची बांधणी हा मुख्य भाग आहेच, मात्र शेट्टींना शक्‍य तितके अस्वस्थ करणे, हाही कार्यक्रम राबवला जाईल. सोबत राज्यभर गोपीनाथ मुंडे यांचे काही  समर्थक विस्कळित झाले आहेत. ते धड भाजपमध्ये नाही अन्‌ धड विरोधातही नाहीत. मुंडे यांच्यासोबत  सदाभाऊंचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्याचा फायदा घेत ते मुंडे गटापासून दूर गेलेल्या अस्वस्थ मंडळींना सोबत घेऊ शकतील, असे सांगितले जात आहे.

या प्रवासात सर्वांत मोठा पहाड आहे तो सदाभाऊंच्या गेल्या चारएक महिन्यांत झालेल्या ‘खलनायक’ प्रतिमेचा. पुणतांब्यातील शेतकरी संपापासून ते राजू शेट्टींसोबत संघर्षापर्यंत सदाभाऊ वेळोवेळी टीकेची धनी झाले  आहेत. ‘स्वाभिमानी’ने आमदार म्हणून सदाभाऊंचे नाव सुचवले, मात्र ते भाजपच्या कोट्यातून आमदार आणि राज्यमंत्री झाले. इथंपर्यंत ठीक होते, मात्र अनेक प्रश्‍नांत त्यांनी भाजप प्रवक्‍त्याची भूमिका पार पाडली, असा आरोप केला जातो. शेट्टी सरकारवर आसूड ओढत असताना सदाभाऊ पाठराखण करायचे. पुणतांब्यातील शेतकरी संपात भाजपचे नेते बाजूला राहिले आणि सदाभाऊंनी रात्र जागवली. संपात फूट पाडल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. ‘सूर्याजी पिसाळ’ची उपमा दिली गेली. राज्यातील शेतकरी कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगासाठी रान उठलेले असताना त्यावर पाणी फवारण्याचे काम सदाभाऊ करत असल्याचीही  ओरड सुरू आहे. सहाजिक, त्यांची प्रतिमा ‘खलनायक’ करण्याचा सपाटा सुरू आहे.

‘स्वाभिमानी’ त्यात आघाडीवर आहे... पण त्यांचा हल्ला परतावून लावण्यासारखा मुद्दा सदाभाऊंकडे आहे का? आता नवी संघटना बांधताना ‘मुद्दा’ काय, हाही प्रश्‍न आहे. सदाभाऊंनी या साऱ्यावर मात करून संघटना बांधतील... अडचणींचे डोंगर पार करतील... पण, ही संघटना शेतकऱ्यांना नवा सूर्योदय दाखवणारी असेल की सत्तेभोवती पिंगा घालणारी, हे काळच सांगेल.

Web Title: sangli news politics in sadabhau khot & raju shetty