घोडा गेला अन्‌ गाडी खुंटली

शैलेश पेटकर
मंगळवार, 27 जून 2017

सांगली - मनात स्वाभिमान असला की मनगटात जगण्याचं बळ येतं. कासीम करीम लवंगे (वय ८०) आणि बेगम कासीम लवंगे (७५) या दाम्पत्याचं आयुष्य रक्ताच्या नात्यांनी लाथाडल्यानंतरही स्वाभिमानानं सुरू होतं. घोडागाडी धावत होती, चार पैसे मिळत होते. पण नियतीच्या खेळानं खिळा लावला. घोडा आजारानं मेला अन्‌ ह्यांची गाडी थांबली. आयुष्याच्या उत्तरार्धात संघर्षाची तयारी आहे, मात्र त्याला बळ द्यायला आता दात्यांनी हात पुढे करण्याची गरज आहे. त्यांना बाकी काही नकोय, फक्त एक घोडा हवाय.

मिरजेतील संगम सोसायटीतील झोपडीत हे दाम्पत्य राहतं. रक्ताची नाती पोरकी झाल्यानंतर ते इथं आले. भाकरीच्या शोधात टांग्यानं वेग घेतला. रोज मिरज मार्केट परिसरात टांगा चालू लागला. जेमतेम जगण्यापुरतं का असेना, पण हक्कानं मिळू लागलं. अचानक घोड्याला रोग झाला. रेबीज म्हणजे प्राण्यांसाठी तसा भयंकरच. अनेक उपचार केले, पण घोडा पिसाळला. पर्याय नसल्याने त्याला दयामरण द्यावे लागले. आता काय करायचे? जगण्याची ‘अश्‍वशक्ती’च निघून गेली... निर्जीव झाल्यासारखं वाटू लागलं. त्यामुळे त्यांचं जगणच जणू थांबलं आहे. 

रोजची भाकरी मिळवून देणारा घोडाच गेल्याने दाम्पत्याची जगण्याची परवड सुरू आहे. काही प्राणीमित्रांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना उभे करण्याची धडपड सुरु केली आहे. रोज सकाळी टांगा घेवून जायला आजही कासीम चाचा तयार आहेत, बेगम मोलमजुरी करून थोडाफार हातभार लावू शकतात. या दांपत्याचा संघर्षमय प्रवास अनेकांनी पाहिला होता. आता आधारसाठी काही हात पुढे सरकावले आहेत. वीस हजार रुपयांत घोडा मिळू शकतो. त्यासाठी पैसे जमवण्याची सुरवात झाली आहे. दोनएक महिन्यांच्या किराणा भरून दिला आहे. या थकलेल्या दांपत्याला मदतीचा आणखी काही हात पुढे आले तर नक्कीच त्यांच्यासाठी ‘ईद मुबारक’ असेल. 

Web Title: sangli news positive news