राज्य सहकारी संघावर सांगलीला चाळीस वर्षानंतर मिळाली संधी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

सांगली - राज्यातील सहकारी संस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रताप पाटील यांची निवड झाली. सहकारपंढरी सांगलीला तब्बल चाळीस वर्षानंतर हा मान सांगलीला मिळाला आहे.

सांगली - राज्यातील सहकारी संस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रताप पाटील यांची निवड झाली. सहकारपंढरी सांगलीला तब्बल चाळीस वर्षानंतर हा मान सांगलीला मिळाला आहे.

याआधी सहकार महर्षी गुलाबराव पाटील हे अध्यक्षपदावर होते. डॉ. पाटील यांना संघाच्या संकटकाळात ही संधी मिळाली असून सर्वपक्षिय समन्वयाने हे आव्हान त्यांना पेलवावे लागणार आहे. राज्य सहकारी संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. शंभराव्या वर्षात अध्यक्षपदाचा मान सांगलीला मिळाला आहे. डॉ. पाटील हे सांगली सहकार बोर्डाचे अध्यक्ष आहेत. कोल्हापूर विभागातून त्यांची निवड झाली असून या विभागातून सर्वात पहिले अध्यक्ष भास्करराव जाधव होते. 

मी राष्ट्रवादीचा असलो तरी सर्व पक्षिय नेत्यांच्या सहकार्याने ही संस्था संकटातून बाहेर काढण्याचे आव्हान मी स्विकारले आहे. यशदासह अन्य पाच संस्थांना वेतन व वेतनेतर अनुदान मिळते, मात्र सहकारी संघाला ते मिळत नाही. आर्थिक अडचणी खूप आहेत, त्यातून मार्ग काढत ही चळवळ अधिक भक्कम करायची आहे. या संस्थेवर अनेक धुरीणांना काम केले आहे, त्यामुळे माझ्यासाठी हा मोठा सन्मान आहे.

- डॉ. प्रताप पाटील

राज्य सहकारी संघाचा व्याप 33 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. राज्यातील सव्वादोन लाख सहकारी संस्थांचे कर्मचारी, संचालक आणि पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम ही संस्था करते. केंद्र व राज्य स्तरावरची मान्यता असलेल्या अशा सहा संस्था महाराष्ट्रात कार्यरत असून त्यात राज्य सहकारी संघ सर्वात जुना आहे. या संघाची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे. सुमारे 12 कोटी रुपयांची तूट आहे. संस्थेला मिळणारा प्रतिवर्षाचे सात कोटी रुपयांचे शिक्षण निधी सहा वर्षांपूर्वी बंद करण्यात आला. या काळात सुमारे 42 कोटी रुपयांचे नुकसान झाले. गेल्या 23 वर्षांपासून प्रतिवर्षी मिळणारे 23 लाख रुपयांचे अनुदानही मिळालेले नाही. त्यामुळे ही संस्था आर्थिक अडचणींचा सामना करते आहे. मध्यंतरी आलेल्या सहकारी संस्थाविरोधी लाटेतून बाहेर पडताना संस्थाचालक, कर्मचाऱ्यांना वादळात दिवा तेवट ठेवण्यासाठी या संस्थेनेच प्रोत्साहन दिले. 

 

Web Title: Sangli News Pratap Patil selected on State cooperative organisation