‘वारणे’बाबत खासदार गप्प का? - प्रतिक पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

सांगली -  वारणा नदीतून इचलकरंजीसाठी पाणी नेण्याची योजना वारणाकाठासह म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी धोकादायक आहे. वारणेचे पाणी पळविण्याचा घाट घातला जात असताना खासदारांनी दुर्लक्ष का केले आहे, असा सवाल काँग्रेस नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता केला.  

त्यांनी पत्रकात म्हटले आहे, की इचलकरंजीला पंचगंगा, कृष्णेतून पाणीपुरवठा होतो. त्यांना पाणी अपुरे पडत असल्याने वारणेतून पाणी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. वारणा धरणातील सुमारे १.६ टीएमसी पाणी हे इचलकरंजीसाठी देण्याचा प्रस्ताव आहे. त्याचा परिणाम शिराळा, वाळवा व मिरज पश्‍चिम भागातील वारणाकाठच्या गावांवर होईल. वारणाकाठी अनेक गावांसाठी नळपाणी, सहकारी, खासगी पाणीवापर संस्था आहेत. उन्हाळ्यात वारणाकाठच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याला फटका बसू शकतो. अवर्षण काळात झळा असह्य होतील. 

‘म्हैसाळ’साठी वारणेतून पाणी घेतले जाते. त्यावर मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत, तासगाव असे दुष्काळी तालुके अवलंबून आहेत. इचलकरंजीला १.६ टीएमसी पाणी दिल्यास व ‘म्हैसाळ’ला पाणी कमी पडेल. त्याची जबाबदारी कुणाची? खासदार यावर काहीच का बोलत नाहीत?

पाणी शुद्ध करा
श्री. पाटील यांनी म्हटले आहे, की इचलकरंजीला कृष्णेबरोबरच पंचगंगेतून पाणी दिले जाते. ते शुद्ध करून वापरावे. ते पाणी कर्नाटकला फुकटच जातेय. हक्‍काचे पाणी सोडून वारणाकाठी प्रश्‍न निर्माण करणे योग्य होणार नाही. राज्य व केंद्रानेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अन्यथा वारणाकाठी व म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातून संताप सहन करावा लागेल. त्याचे गंभीर परिणाम खासदारांना भोगावे लागतील.

Web Title: Sangli News Pratik Patil comment