विधानसभेच्या रंगीत तालमीसाठी मोर्चेबांधणी

प्रताप मेटकरी
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

खानापूर तालुक्‍यातील ४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक असलेल्या गावांबरोबर तालुक्‍याच्या राजकीय आखाड्यातील हालचाली गतिमान झाल्यात. ४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. 

विटा- खानापूर तालुक्‍यातील ४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक असलेल्या गावांबरोबर तालुक्‍याच्या राजकीय आखाड्यातील हालचाली गतिमान झाल्यात. ४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. 

निवडणूक होत असलेल्या तालुक्‍यातील बहुतांशी ग्रामपंचायतीवर आमदार अनिल बाबर, तर बोटावर मोजता येतील एवढ्या ग्रामपंचायतीवर माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. ग्रामीण भागातील सत्ता स्थानावरच विधानसभा निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असते. ग्रामपंचायतींची सत्ता अबाधित राखण्यासाठी आमदार बाबर, तर सत्ता मिळवण्यासाठी माजी आमदार ॲड. पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचे नेतृत्व मानणारे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रविअण्णा देशमुख यांच्या माध्यमातून एक गट सक्रिय आहे. कदम गटाचे तालुक्‍यात नेतृत्व करणाऱ्या देशमुख यांच्या भूमिकेकडे लोकांच्या नजरा आहेत. त्याबरोबर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक आणि खानापूर तालुक्‍याच्या राजकीय आखाड्यात प्रथमच ताकदीने  उतरू पाहणारे भाजपचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीप्रमाणे ग्रामपंचायतीतही बाबर गटाविरुद्ध परिवर्तन आघाडीचा पॅटर्न राबवला जाणार का? याबद्दल उत्सुकता आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावोगावी आपल्या गटाची सत्ता आणण्यासाठी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या बाबर आणि पाटील गटाच्या खंदे समर्थकांत चढाओढ सुरू आहे. पडद्यामागील हालचाली गतिमान आहेत. दोन्ही गटातील पहिल्या-दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’ आलेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे गावपातळीवरील सत्ताधारी, विरोधकांच्या गटांच्या बैठकांना सुरवात झाली. आजी-माजी आमदारांबरोबर जि. प. उपाध्यक्ष सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी  राजकीय आखाड्यात उडी घेत बैठकांना उपस्थित राहून पडद्यामागील मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. गाव, प्रभागनिहाय राजकीय स्थितीचा अंदाज घेत संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. गटाच्या वर्चस्वासाठी बाबर, पाटील अशा दोन्ही गटातील कार्यकर्त्यांत ईर्षा निर्माण झाली आहे. निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. 

यंदा प्रथमच सरपंच  थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत कमालीची उत्सुकता आहे. सरपंचपदाचा उमेदवार ठरवताना नेत्यांचा कस लागणार आहे, असे सध्या तरी चित्र आहे. ‘इलेक्‍शन फिव्हर’मुळे इच्छुकांची मांदियाळी आहे. थेट सरपंचपदामुळे आतापासूनच निवडणुकीत रंग भरण्यास सुरवात झाली आहे. दोन्ही गटांकडे इच्छुक आहेत. उमेदवार निश्‍चित करताना नेत्याबरोबर गावनेत्यांची कसोटी आहे. उमेदवारीवरून बंडखोरी होऊ नये, यासाठी सरपंचपदाचा उमेदवार हा संबंधित गटातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच ठरवावा लागणार आहे. उमेदवाराचे स्वतःचे राजकीय वलय, प्रभाव, स्थानिक पातळीवरील गटा-तटाचे, भावकीचे राजकारण यावरच उमेदवारीचे भवितव्य आहे. 

‘मिशन - २०१९’
खानापूर तालुक्‍यात एकूण ६५ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ४६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. आगामी २०१९ ची विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून तयारीचा भाग म्हणून ग्रामपंचायतीच्या राजकीय आखाड्यात बाबर आणि पाटील हे दोन्ही गट आपापली ताकद अजमावणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे दोन्ही गटांसाठी राजकीय वर्चस्वाची लढाई आणि विधानसभेची रंगीत तालीम असेल.

Web Title: sangli news preparation for assembly election