मुख्यमंत्र्यांची मानसिकता कर्जमाफी विरोधी - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

सांगली - शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असताना केवळ चर्चेचे गुऱ्हाळ लावून, समित्या नेमून वेळ काढूपणा सरकार करत आहे. शेतकरी संपाची टर उडवून त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मानसिकता कर्जमाफी विरोधात आहे, असा आरोप आज माजी मुख्यमंत्री कॉंग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

सांगली - शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असताना केवळ चर्चेचे गुऱ्हाळ लावून, समित्या नेमून वेळ काढूपणा सरकार करत आहे. शेतकरी संपाची टर उडवून त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मानसिकता कर्जमाफी विरोधात आहे, असा आरोप आज माजी मुख्यमंत्री कॉंग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

सांगलीत एका कार्यक्रमासाठी ते आले होते. ते म्हणाले, ""गेले दोन वर्षे आम्ही कर्जमाफीची मागणी करत आहे; मात्र मुख्यमंत्र्यांनी नाहीचा पाढा लावला. परंतु उत्तर प्रदेश निवडणुकीत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफीची घोषणा केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यात तत्त्वत: मान्यता दिली; परंतु वेळ आल्यावर कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली. अधिवेशनात आवाज उठवल्यावर आमच्या आमदारांवर बंदी घातली. त्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी संघर्ष यात्रा काढली. गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना भेटलो. त्यामुळे वातावरण तयार झाले. अखेर पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केली.'' 

ते म्हणाले,""शेतकऱ्यांनी संप पुकारल्यावर त्याची सरकारने टर उडवली. मात्र संप सुरू होताच मंत्री सदाभाऊ खोत यांना हाताशी धरून मुख्यमंत्र्यांनी संप फोडण्याचा प्रयत्न केला. ते जनतेला कळले. त्यामुळे संतापाची लाट उसळली. त्यानंतर या संपात शेतकरी संघटना उतरल्या. सरकारचा घटक पक्ष असल्यामुळे त्यांनी सरकारविरोधी भूमिका लवकर घेतली नव्हती.'' 

सरकारने कृषीमूल्य आयोगाची घोषणा केली. पण हा आयोग याच सरकारने 2015 मध्ये स्थापन केला आहे. त्याचे काय झाले? या आयोगाला विधानसभेत घटनात्मक मंजुरी मिळाल्याशिवाय त्याला अर्थ नाही. तो कागदाचा तुकडा आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीसांनी तुरीमध्ये चारशे कोटींचा घोटाळा झाल्याचे स्वत:च सांगितले आहे. त्याच्या चौकशीसाठी समिती नेमली. महिना उलटला. काय झाले चौकशीचे? व्यापाऱ्यांची चौकशी केली का? ते स्पष्ट करावे, असे आमदार चव्हाण म्हणाले. तुरीचे खोटे उत्पन्न राज्य सरकारने दाखवले आहे. त्यांना नेमके उत्पादन माहिती नाही. 20 लाख 35 हजार टन सांगितले. त्यातील दहा ते बारा लाख टनांचा हिशेब लागत नाही ती कुठे गेली? 

मुख्यमंत्र्यांकडून ब्लॅकमेलिंग 
विरोधकांच्या कुंडल्या आपल्याकडे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत. मात्र ते समोर का आणत नाहीत. त्यांनी फाईली दडवून ठेवल्या हा गुन्हाच आहे. केवळ आपल्याकडे फाईली आहेत असे सांगणे हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे, असा आरोप त्यांनी केला. शिवसेना आणि भाजप एकमेकाला धमकी देण्याचे नाटक करत आहेत. शिवसेनेला सत्तेत राहायचे आहे, जर बाहेर पडले तर त्यांना काही किंमत मिळणार नाही, त्यामुळे ते सत्तेतून बाहेर पडत नाहीत. मध्यवर्ती निवडणुका होतील का नाही ते पाहावे लागणार. विधान सभेच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणुका लढवतील असे संकेत चव्हाण यांनी दिले. 

शेट्टींना मंत्री पदाची अपेक्षा 
स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारचा घटक पक्ष आहे. त्यांची सरकारविरोधी भूमिका असली तरी ते सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस करत नाहीत. केंद्रात तीन मंत्रिपदे रिकामी आहेत. त्यामुळ खासदार राजू शेट्टींना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची आशा आहे. त्यामुळे ते सरकारशी चर्चा करतो असे सांगतात, असा टोमणा चव्हाण यांनी मारला. 

Web Title: sangli news prithviraj chavan loan