सरकारी दवाखान्यांतील प्रयोगशाळांचे खासगीकरण

संतोष भिसे
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

मिरज - राज्यभरातील सरकारी दवाखान्यांत आता खासगी प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत. शासनाने फेब्रुवारीत घेतलेल्या निर्णयानुसार रुग्णाच्या १०९ चाचण्या खासगी संस्थेमार्फत केल्या जातील. यामध्ये रक्त-लघवीसह कर्करोगाच्या चाचण्यांचाही समावेश आहे. ऑगस्ट-सप्टेंबरपासून राज्यभर याची अंमलबजावणी सुरू झाली. 

मिरज - राज्यभरातील सरकारी दवाखान्यांत आता खासगी प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत. शासनाने फेब्रुवारीत घेतलेल्या निर्णयानुसार रुग्णाच्या १०९ चाचण्या खासगी संस्थेमार्फत केल्या जातील. यामध्ये रक्त-लघवीसह कर्करोगाच्या चाचण्यांचाही समावेश आहे. ऑगस्ट-सप्टेंबरपासून राज्यभर याची अंमलबजावणी सुरू झाली. 

या कामासाठी आरोग्य विभागाने एचएलएल लाईफकेअर लिमिटेड या संस्थेशी पाच वर्षांचा करार केला आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महिला रुग्णालये, सामान्य रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, मानसोपचार रुग्णालये आणि प्रादेशिक रुग्णालयांत या संस्थेच्या प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत. संबंधित रुग्णालयात संस्थेला फक्त जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उर्वरित मनुष्यबळ, तंत्रज्ञ, यंत्रसामग्री, साधनसामग्री आदींची व्यवस्था संस्थेने करायची आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने केलेल्या शिफारशीनुसार रुग्णाच्या रक्त, लघवीसह अन्य चाचण्या या संस्थेचा तंत्रज्ञ करेल. त्याचा अहवाल रुग्णाला दुसऱ्या दिवशी दिला जाईल. अत्यावश्‍यक व तातडीच्या चाचणीचा अहवाल तीन  तासांत मेल आणि एसएमएसद्वारे द्यावा लागणार आहे. 

सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत तंत्रज्ञ आणि  प्रयोगशाळांची सोय आहे. ग्रामीण भागात रक्त,  लघवीसह अन्य प्राथमिक तपासण्या होतात. पुढील महत्त्वाच्या तपासण्यांसाठी रुग्णाला तालुका किंवा जिल्हा रुग्णालयात पाठवले जाते. नव्या यंत्रणेमुळे हा हेलपाटा मारावा लागणार नाही. गावातच नमुने दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी लेखी अहवाल हातात मिळेल.

या चाचण्या होतील
रक्तातील प्लेटलेट, सीबीसी, रक्तातील युरीया, प्रोटीन, कॅल्शीयम, सोडीयम, लघवी व मलचाचणी, मलेरीयाविषयक, शुक्राणू चाचणी, थॉयरॉईड, कर्करोग आणि ट्युमर मार्कर टेस्ट, अस्थिमज्जाविषयक आदी.

मधुमेहाचा समावेश नाही
रक्तातील साखरेच्या तपासणीचे प्रमाण सध्या खूपच मोठे आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत सध्या लघवीतील साखर तपासण्याची सोय आहे; रक्तातील साखर तपासणीसाठी तालुक्‍याला जावे लागते किंवा खासगी प्रयोगशाळेचा आधार घ्यावा लागतो. खासगी प्रयोगशाळा किमान शंभर रुपये आकारतात. शासनाने खासगीकरण करताना चाचण्यांच्या यादीत रक्तातील  साखर तपासणीचा समावेश केलेला नाही.  

Web Title: Sangli News Privatization of Government hospital lab