सांगलीत नेत्यांच्या नामकरणाने खराब रस्त्यांचा निषेध 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जानेवारी 2018

सांगली - सर्व पक्षीय कृती समितीने प्रशासनाला रस्ते दुरुस्तीची दिलेली 31 डिसेंबरची डेडलाईन संपल्याने आज केंद्र, राज्य आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची नावे रस्त्यांना देऊन निषेध नोंदवण्यात आला.

सांगली - सर्व पक्षीय कृती समितीने प्रशासनाला रस्ते दुरुस्तीची दिलेली 31 डिसेंबरची डेडलाईन संपल्याने आज केंद्र, राज्य आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची नावे रस्त्यांना देऊन निषेध नोंदवण्यात आला.

सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये प्रमुख कार्यकर्ते, नागरिकांच्या उपस्थितीत शहरात अकरा रस्त्यांना नेत्यांची नावे देण्यात आली. मुख्य कार्यक्रम सांगली-कोल्हापूर रस्त्यावर केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचे नाव देऊन झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव पेठ रस्त्याला देण्यात येणार होते. या रस्त्यांच्या निविदा प्रसिद्ध करून प्रशासनाने ठोस कृती केल्याने नामकरण तूर्त स्थगित केल्याचे सांगण्यात आले. 

शामरावनगर चौक रस्त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॉलेज कॉर्नर ते गणपती पेठ रस्त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, विश्रामबागमधील स्फूर्ती चौक ते मिरज रस्त्याला आमदार सुधीर गाडगीळ, किसान चौक ते गेस्ट हाऊस रस्त्याला खासदार संजय पाटील, राजवाडा चौक ते कॉंग्रेस समितीपर्यंतच्या रस्त्याला उपमहापौर विजय घाडगे, मार्केट यार्ड ते शिवेच्छा रस्त्याला स्वाभिमानी आघाडीचे नेते जगन्नाथ ठोकळे, कुपवाडमध्यील महापालिका कार्यालयापर्यंतच्या रस्त्याला विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, मिरजेत दिंडीवेस रस्त्याला आमदार सुरेश खाडे, शिवाजी रोडला महापौर हारुण शिकलगार, टिळक चौक ते महापालिका इमारत रस्त्याला आमदार पतंगराव कदम अशी नावे देण्यात आली. 

गौतम पवार म्हणाले,""दोन महिने आम्ही रस्त्यांसाठी पाठपुरवा करीत आहे. दोन्ही शहरांतील आमदार, पालिकेतील सत्ताधारी निधींचे आकडे सांगताहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली तरी जाणीवपूर्वक कामे रेंगाळत ठेवली आहेत. त्याचा निषेध केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे कारवाई करावी.'' 

ज्येष्ठ नेते स्वांतंत्र्यसैनिक बापूसाहेब पाटील, स्वाभिमानी आघाडीचे सचिव सतीश साखळकर, वाहतूकदार संघटनेचे महेश पाटील, भारत बोथरा, प्रीतेश कोठारी, माकपचे उमेश देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमर पडळकर,आशिष कोरी, आश्रफ वांकर, प्रदीप कांबळे, शेरसिंग ढिल्लो, पंचायत समितीचे सदस्य अशोक मोहिते, नितीन चव्हाण, महेश खोत, श्रमण मगदूम, हेमंत खंडागळे, सतीश पाटील, अभय खाडिलकर, शिवाजी गुंडप, रोहन भोसले, रमेश माळी, संदीप आवळे, संदीप दळवी, महिंद्र शिंदे, रज्जाक नाईक, संतोष पाचुंदे, बाळासाहेब गोंधळे, आनंद देसाई, रमेश माळी, शेतकरी संघटनेचे महेश खराडे, राहुल पवार, प्रशांत पवार, जगदीश पाटील आदी उपस्थित होते. 

Web Title: Sangli News protest against damaged roads