सांगलीत गुंडांच्या टोळ्यांवर वचक बसवणार

सांगलीत गुंडांच्या टोळ्यांवर वचक बसवणार

सांगली - नूतन पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी जिल्हा पोलिस दलाची झालेली बदनामी पुन्हा सावरण्यासाठी कंबर कसली असून, शहरात पुन्हा डोके वर काढू पाहणाऱ्या टोळ्यांना वचक बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस हल्ले करणाऱ्या बाबर टोळीसह सावंत टोळी, भोकरे टोळी यांच्या कारनाम्यांच्या फायली पुन्हा उघडण्यात आल्या आहेत. त्यांना जरब बसवण्यासाठी मोका लावण्यापर्यंतची तयारी पोलिस करत आहेत.

शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत अनिकेत कोथळे याला अमानुष मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह आंबोलीच्या जंगलात जाळण्याचा प्रयत्न या प्रकरणातील संशयित आरोपी युवराज कामटे आणि त्याच्या पाच साथीदारांनी केला. या खळबळजनक घटनेमुळे जिल्हा पोलिस दलाची राज्यात नाचक्की झाली. या प्रकरणात संशयित पाच आरोपी पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले, तर पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि शहर उपअधीक्षक दीपाली काळे यांची तातडीने बदली करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून तरुण आयपीएस अधिकारी सुहेल शर्मा दाखल झाले.

जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत आठ ते दहा खून झाले आहेत. 
खुनी हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दाद्या सावंत टोळीतून फुटलेल्या बाळू भोकरेने स्वत:ची टोळी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचा सहकारी शकील मकानदार याचा खून सावंत टोळीने केला होता, तर त्याच्याआधी इम्रान मुल्लाच्या टोळीने फिरोजखान पठाणचा खून केला होता. दोन्ही खून भर दिवसा झाले होते. त्यामुळे शहरात दहशत निर्माण झाली होती. कसबे डिग्रजचा खून २० ते २२ वयोगटातील युवकांनी सुपारी घेऊन केला होता. यातच काही दिवसांपूर्वी छोट्या बाबर टोळीने दोन दिवसांत दोघांवर खुनी हल्ले केले.

या परिस्थितीत प्रथमच पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारलेल्या सुहेल शर्मा यांनी सांगलीकरांना विश्‍वास दिला आहे. त्यांनी मटकेवाल्यांवर, जुगारअड्डयांवर छापे टाकले. गांजावरही त्यांनी कारवाई केली, पण सर्वात महत्त्वाचे आहे, ते गुंड टोळ्यांचा बंदोबस्त करणे. मटकेवाल्यांच्या टोळ्या जून महिन्यात तडीपार करण्यात आल्या होत्या, मात्र त्यातील अनेक मटकेवाले शहरातच सापडले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना केवळ तडीपार करून भागणार नाही. त्यांना वचक बसेल, अशी कारवाई होणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने जिल्हा पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. बाबर टोळीने सलग दोन दिवस खुनी हल्ले केल्यानंतर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी गुंड टोळ्यांच्या फायली तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. या टोळ्यांवर एमपीडीए किंवा मोकासारखी कारवाई करण्याची तयारी त्यांनी केली आहे. त्यामुळे या टोळ्यांवर खाकी वर्दीचा पुन्हा वचक निर्माण होईल.

पाच महिन्यांत घरफोड्यांचे शतक 
खून आणि खुनी हल्ल्यांनी शहरात या गुंड टोळ्यांबद्दल दहशतीचे वातावरण आहे. यामध्ये भरदिवसा होत असलेल्या घरफोड्यांनी भर टाकली आहे. शहरात दिवसा घरफोडी झाली नाही, असा दिवस कदाचित विरळ असावा, अशी स्थिती आहे; मात्र घरफोड्यांच्या शोध लागत नाही, हे पोलिसांचे अपयश आहे. याबाबत स्वत: विशेष महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. गेल्या पाच महिन्यांत घरफोड्यांनी शतक पार केले आहे. चेनस्नॅचिंगच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेबाबतीत काही आलबेल नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com