शेतकरी संघटना फोडण्याचा भाजपचा डाव : रघुनाथदादा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सांगली - शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचा डाव भाजप खेळत आहे. शेतकरी नेत्यांमध्ये वैचारिक नव्हे, तर व्यक्तिगत काही मतभेद आहेत, त्याला खतपाणी घातले जात आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथराव पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

सांगली - शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचा डाव भाजप खेळत आहे. शेतकरी नेत्यांमध्ये वैचारिक नव्हे, तर व्यक्तिगत काही मतभेद आहेत, त्याला खतपाणी घातले जात आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथराव पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले,‘‘सत्ता आणि पक्षांच्या आधारावर नव्या संघटना वाढवल्या जात आहेत. संघटना वाढल्या म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठे कमी झाल्या आहेत का? पैशांच्या जोरावर संघटना उभा करून साध्य काय होणार आहे. आता होऊ घातलेल्या नव्या संघटनेला लेटरपॅडपासून सारे भाजप छापून देत आहे, हे कुणापासून लपून राहिलेले नाही. ज्या संघटनेत फूट पडली त्याच्या नेत्यांची भूमिकाही कळत नाही. पूर्वी ते काँग्रेससोबत होते, मग भाजपचा सत्ता येतेय म्हटल्यावर भाजपकडे गेले. आता पुन्हा काँग्रेसला चांगले दिवस येतील म्हणून भाजपला सोडले, काय सुरू आहे, कळतच नाही.’’

ते म्हणाले,‘‘कर्जमाफी योजनेत अर्ज भरणे हा मूर्खपणा आहे, असे मी पहिल्यापासून सांगतोय. याआधी कर्जमाफी झाल्या होत्या, तेव्हा गरज नव्हती. आता म्हणे,‘‘बॅंकांमध्ये घोटाळे आहेत. हे सरकार घोटाळेबाजांच्या आधारावर चालवले जात आहे. अदृश्‍य हात या सरकारमागे असल्याचे मुख्यमंत्री सांगताहेत, हे हात घोटाळ्यांनी बरबटलेले आहेत. त्यांना अभय देऊन शेतकऱ्यांची पिळवणूक केली जातेय.’’

पाशांना सत्तेची मस्ती
पाशा पटेल यांनी माध्यम प्रतिनिधीला केलेल्या शिवीगाळप्रकरणी रघुनाथराव पाटील म्हणाले, ‘‘ही सत्तेची मस्ती आहे. त्यांची पूर्वीपासूनच सत्ताधाऱ्यांसोबत ऊठबस असायची. वरच्यांना मुजरा आणि खालच्यांना लाथा, ही पद्धत आहे. शेतकरी चळवळीत असे स्वार्थी लोक जागोजागी दिसतील. हे सारे निंदनीय आहे.’’

Web Title: sangli news raghunathdada patil press conference