रेल्वे तिकिटांचा ऑनलाईन काळाबाजार

रेल्वे तिकिटांचा ऑनलाईन काळाबाजार

मिरज - दिवाळी सुट्यांमुळे रेल्वेला तुफान गर्दी आहे. गेल्या आठवड्यात एस.टी.च्या संपाने त्यात भर घातली. गर्दीमुळे तिकीट काळाबाजाराने जोर धरला आहे. तिकीट खिडक्‍यांवरील काळाबाजारावर रेल्वे सुरक्षा  दलाने बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. एजंटांनी वैयक्तिक आयडी वापरून तिकिटे मिळवण्याची शक्कल लढवली आहे. कोल्हापुरात गेल्या आठवड्यात दक्षता पथकाने एका कर्मचाऱ्यालाच पकडल्याने तिकिटांच्या तस्करीत कर्मचारीही सामील असल्याचे उघडकीस आले आहे.  

रेल्वे सुरक्षा दलाच्या क्राईम ब्रँचकडे मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी येथील तिकीट तस्करांची माहिती आहे. त्यांच्यावर लक्षही ठेवले जात आहे. तरीही काळाबाजार बंद झालेला नाही. दिवाळीच्या हंगामात तिकिटांचा अक्षरशः दुष्काळ निर्माण झाला होता. गेल्या तीन-चार वर्षांत सुरक्षा दलाने एजंटांचे जाळे उद्‌ध्वस्त केल्याने छुपा काळाबाजार सुरू झाला. त्यासाठी वैयक्तिक आयडी वापरून ऑनलाईन तिकिटे मिळवली जात आहेत.

स्थानकातील खिडकीवर सकाळी दहा वाजता वातानुकूलित श्रेणीच्या आणि अकरा वाजता स्लिपर श्रेणीच्या तिकिटांची विक्री सुरू होते. त्याचवेळी इंटरनेटवरही आरक्षण खुले होते. गेल्या काही महिन्यांत रेल्वेने इंटरनेट बुकिंगची गती वाढवली आहे; त्यामुळे वैयक्तिक नेटवरून गतीने बुकिंग होत आहे. रेल्वे काऊंटरपेक्षा जास्त वेगाने खासगी संगणकावर तिकिटे निघत आहेत. त्याचा फायदा एजंटांनी उचलला आहे. प्रवाशांना गाठून त्यांची तिकिटे वैयक्तिक आयडीवर काढली जातात. खिडकी उघडल्यानंतर अवघ्या पाच-दहा मिनिटांत तेथील तिकिटे संपतात. तासन्‌ तास रांगेत थांबलेल्या प्रवाशांना तिकिटे मिळत नाहीत. 

दिवाळीच्या सहलीची स्वप्ने रंगवणाऱ्या प्रवाशांची तिकिटाविना  निराशा होत आहे. सांगली-कोल्हापूर मार्गावरील स्थानकांत काळाबाजार फोफावला असताना त्याची लागण मिरज-पंढरपूर मार्गावरही झाली आहे. सलगरे, ढालगाव, कवठेमहांकाळ व सांगोला ही स्थानके त्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. 
दक्षता पथक या मार्गावर फारसे येत नसल्याने एजंटांचे फावले आहे. ग्रामीण स्थानके असल्याने फारशी गर्दीही नसते. तेथे एजंट गर्दी करू लागले आहेत. दिल्ली,  मुंबई, जोधपूर, अहमदाबाद आणि बंगळुरू अशी लांब पल्ल्याची तिकिटे तेथे आरक्षित होत आहेत.

कर्मचारीच सामील
कोल्हापुरात गेल्या आठवड्यात दक्षता पथकाने धाड टाकून आरक्षण कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. एजंटांना हाताशी धरून तिकिटांचा काळाबाजार करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे अतिरिक्त रक्कमही सापडली. काळाबाजार करण्यात कर्मचारीही सामील असल्याचे यामुळे निष्पन्न झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com