धो-धो कोसळून पावसाची ‘दांडी’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

गुरुवारचा पाऊस ३७ मिलिमीटर - तीन महिन्यांतील उच्चांक

गुरुवारचा पाऊस ३७ मिलिमीटर - तीन महिन्यांतील उच्चांक

सांगली - जिल्हाभर काल धो-धो कोसळलेल्या पावसाने आज दांडी मारली. सकाळपासून लख्ख सूर्यप्रकाश पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला. अपेक्षांवर पाणी पडणार की काय, अशी चिंता सतावू लागली. 
गुरुवारचा (ता. ७) पाऊस जिल्हाभर कोसळला. सरासरी ३७ मिलिमीटर इतका पाऊस  झाला. गेल्या तीन महिन्यांत  कुठे ३०० तर कुठे एकूण ४०० मिलिमीटर पाऊस  झाला आहे. तो अतिशय कमी आहे. जिल्हाभर दुष्काळाचे संकट पसरलेय. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने दीडशेवर टॅंकर सुरू होते. टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करून तलाव भरण्याचे काम सुरू करण्यात आले. थोडे टॅंकर कमी झाले; मात्र दाह कमी नाही. पाऊस नसल्याने सारे उपाय तोकडे आहेत. 

अशावेळी काल दमदार पाऊस झाला. धो-धो पावसाने शेतकरी हरखून गेले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांमध्ये  हा पाऊस कोसळला. तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस परतल्याचा आनंद व्यक्त केला गेला. द्राक्षाची छाटणी कधी घ्यायची याचे नियोजन सुरू झाले. ऊस उत्पादक सुखावले. डाळिंब उत्पादकांनी हुश्‍श केले. रब्बी पिकांसाठी तरी पाऊसकाळ चांगला असेल, अशी आशा निर्माण झाली. तोवर आज पुन्हा एकदा पावसाने दडी मारली. पावसाळी वातावरणही राहिले नाही. उलट उन्ह पडल्याने लोक धास्तावले आहेत. 

गुरुवारी झालेला पाऊस
मिरज तालुक्‍यात - ४३.६, जत - ४३.४, खानापूर - ४५.६, इस्लामपूर - २८.५, तासगाव - २५.७, शिराळा - १६.५, आटपाडी - ६८.७, कवठेमहांकाळ - ३३.३, पलूस - ३७.५, कडेगाव - २८ मिलिमीटर पाऊस झाला. सरासरी - ३७ मिलिमीटर पाऊस झाला.

Web Title: sangli news rain