रिमझिमचा दिलासा; प्रतीक्षा दमदार पावसाची

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

तयारी खरिपाची - बियाणे खरेदीत ‘कहीं खुशी, कहीं गम’चा अनुभव

तयारी खरिपाची - बियाणे खरेदीत ‘कहीं खुशी, कहीं गम’चा अनुभव
सांगली - गेले दोन दिवस पावसाची रिमझिम सुरू असली तरी पेरणीसाठी हा पाऊस पुरेसा नाही. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांना केवळ आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.  यंदा चांगला पाऊस पडेल, या हवामान खात्याच्या अंदाजानंतरही शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे लागली आहे. विविध कंपन्यांचे बियाणे बाजारात दाखल झाले आहे. बहुतांश बियाणे दरात सरासरी १० टक्के वाढ  झाली आहे. महाबीजने तर यंदा शेतकऱ्यांना दिलासाच दिला आहे. अवघ्या तीन-चार जातीच्या बियाणांचेच दर किरकोळ वाढले. यंदा बियाणे खरेदीत ‘कहीं खुशी, कहीं गम’चा अनुभव येतो आहे.

कृषी विभागातर्फे बी-बियाणे, खते आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी ‘झेडपी’च्या कृषी विभागाने सर्व तयारी केली आहे. शिराळा भागात धूळवाफेवर भात पेरणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात अन्यत्र मान्सूनपूर्व पाऊस पुरेसा झाला नसल्याने मशागती अपूर्ण आहेत.

खरीप हंगामाची चाहूल लागताच शेतकरी पेरणी-टोकणीच्या तयारीत आहेत. खरीपपूर्व मशागतीला वेग आला आहे. यंदा एकही वळीव समाधानकारक न झाल्याने शेतकरी हवालदिल आहे. सर्व कंपन्यांची खते, बियाणांनी शेती सेवा केंद्रे सज्ज झाली आहेत. शासनाच्या कृषी विभागाचीही यंत्रणा सज्ज आहे. परंतु, अद्याप वळीव पाऊस नसल्याने बियाणे खरेदीला अपेक्षित गर्दी नाही. पावसाचा अंदाज चांगला आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील शिराळा तालुक्‍यात धूळवाफेवर पेरणी सुरू आहे. वारणा, कृष्णा नदीच्या काठावर बागायती शेतीत भात, मका, सोयाबीनची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. पावसाला सुरवात झाल्यानंतरच शेतकरी बियाणे खरेदीकडे वळतील, अशी चिन्हे आहेत.

कृषी सेवा केंद्रचालक सध्या ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात नऊशेहून अधिक शेतीसेवा केंद्रे आहेत. खासगी व महाबीजचे सर्व जातींची बियाणे व खते उपलब्ध आहेत. खासगी कंपन्यांच्या दप्तरी जातीचे भात बियाणे किलोला दहा रुपयांनी कमी झाले आहेत तर भाताचेच सोनम, कोमल दरात किलोमागे पाच रुपये वाढलेत. महाबीजने बहुतांशी जातीच्या बियाणांचे दर जैसे थे ठेवल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगाम ‘अच्छे’ जाणार आहे. काही ठरावीक बियाणांचे दर वाढले आहेत.

महाबीजतर्फे भात, सोयाबीनला अनुदान जाहीर केले  जाते. गत वर्षीपासून भात बियाणाला अनुदान मिळाले नाही. यंदाही तीच परिस्थिती आहे. सोयाबीनच्या जेएस ९३०५ या जातीच्या बियाणाला अनुदान देण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. परंतु अद्यापि त्याची घोषणा नसल्याने शेतकऱ्यांना यंदाही अनुदानाविना बियाणे खरेदी करावे लागणार आहेत. 

पॉईंटर....
मागणीच्या ५० टक्केच बियाणे उपलब्ध 
खरीप क्षेत्र ३ लाख ९१ हजार ५०० हेक्‍टर 
रासायनिक खतांची भरपूर उपलब्धता
जिल्ह्यासाठी बियाणांची गरज ४१ हजार ५०४ क्‍विंटल
महाबीजसह खासगी कंपन्यांकडे २४ हजार ४२७ क्‍विंटल मागणी 
गतवर्षीचा ३ हजार ३२५ क्विंटलसाठा  

शेतकऱ्यांची बियाणे, खते आणि कीटकनाशकातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी जिल्हास्तरीय एक आणि प्रत्येक तालुक्‍याला एक याप्रमाणे ११ पथके तैनात केली आहेत. कृषी सेवा केंद्रात खते-बियाणांचे लिंकिंग होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. गैरसोय, काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- धनाजी पाटील, मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद सांगली

Web Title: sangli news rain waiting