ऊस, दूधप्रश्‍नी स्वाभिमानी रस्त्यावर - राजू शेट्टी 

अजित झळके
शुक्रवार, 22 जून 2018

सांगली - उसाला प्रतिटन एफआरपी अधिक दोनशे रुपये आणि दूधाला सरकारने प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरची लढाई करणार आहे. 29 जूनला पुण्यात साखर आयुक्त कार्यालयावरील धडक मोर्चा होईल. त्यानंतरही सरकारला जाग आली नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

ते म्हणाले, ""देशातील साखर उत्पादनाविषयी खासगी साखर कारखान्यांच्या "इस्मा' संघटनेने सरकारला खोटी माहिती दिली. 260 लाख टन साखरनिर्मितीचा अंदाज सांगितला, प्रत्यक्षात 320 लाख टन उत्पन्न झाल्याचे आता सांगितले जातेय. खोट्या आकडेवारीमुळे विदेशातून कच्ची साखर आयात करून डाव साधला गेला. एका हंगामात 20 टक्‍क्‍यांनी अंदाज चुकतोच कसा? साखर दर घसरले हे मान्य, मात्र सरकारला उशीरा जाग आल्याने आता ते 2900 रुपयांवर स्थिर झाले आहेत. ऊस बिले भागवण्याची कारखानदारांची जबाबदारी आहे. त्यांनी हातपाय हलवावेत. अन्यथा साखर आयुक्तांनी साखर जप्त करून ती विकावी. येत्या 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत तर बिनव्याजी पीक कर्ज सवलतीला मुकावे लागेल.'' 

ते म्हणाले, ""गायीच्या दुधाचा प्रश्‍न जटिल आहे.  3.5 स्निग्धांशच्या दुधाला 17 रुपये मिळताहेत. पावडर निर्मितीला 3 रुपये अनुदान निरुपयोगी ठरलेय. केंद्रीय कृषीमंत्र्यांना अनेकदा सावध करूनही सरकारला गांभिर्य कळले नाही. विदेशात 28 टक्के गायींना कत्तलखान्यात पाठवण्याची वेळ आली. भारतात गोहत्या बंदी आहे. हे संकट शेतकऱ्यांवर आहे. सरकारने दूध पावडरचा साठा करावा, आफ्रिकन देशांना पैशांऐवजी दूध भूकटीची मदत द्यावी. किमान सहा महिने दूधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे. एकूण 900 कोटीचा निधी पुरेसा आहे. जीएसटीतून प्रचंड कर जमतोय. शेतकऱ्यांवर नवे कर लादले आहेत. त्यामुळे संकटकाळात मदत करताना पाय मागे घेण्याची गरज नाही.''

कुमार पाटील, सयाजी मोरे, महेश खराडे, संदीप राजोबा, महावीर पाटील, बी. आर. पाटील आदी उपस्थित होते. 

Web Title: Sangli News Raju Shetty comment