सातबारा कोरा न केल्यास पुन्हा आंदोलन - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

कोकरूड - शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याबाबत आम्ही राज्य सरकारला 26 जुलैची डेडलाईन दिली आहे, तोपर्यंत आम्ही काही बोलणार नाही. त्यानंतर विना अटी शर्तीचा सातबारा कोरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला नाही तर पुन्हा शेतकऱ्यांना घेऊन राज्यभर तीव्र आंदोलन करू, मुंबई व नागपूर या राजधानी शहरांचा दूध व भाजीपाला पुरवठा पूर्ण बंद करू असा गंभीर इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. 

बिळाशी (ता. शिराळा) येथील बिरोबा मंदिराच्या 10 लाख रुपये खर्चुन उभारण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत खासदार शेट्टी यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. स्वागत देवेंद्र धस यांनी केले. 

शेट्टी म्हणाले,""या आंदोलनात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळविण्यासाठी जे घटक येथील त्या सर्वांना बरोबर घेऊन शासनाच्या विरोधात लढणार आहे.'' यावेळी स्वाभीमानीचे जिल्हा अध्यक्ष विकासराव देशमुख, ऍड. संदे यांचे मनोगत झाले. सूत्रसंचालन श्रीकांत पाटील यांनी केले. प्रास्ताविक आनंदराव पाटील यांनी केले. कार्यक्रमास बाजीराव पाटील, उपसरपंच संभाजीराव पाटील, विकास पाटील, बापूराव पाटील, संतोष सातपुते, प्रविण पाटील, संतोष पाटील, सुदाम मगदूम, अमर यमगर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

स्मारक दुरुस्तीला निधी द्या... 
बिळाशी गावाला ऐतिहासिक परंपरा आहे. देशाला स्वातंऱ्य मिळवून देण्यासाठी गावातील अनेक थोर स्वातंऱ्यसैनिक हुतात्मा झाले आहेत. हुतात्मा स्मारकाच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा अशी एकमुखी मागणी गावातील युवक व शेतकरी आणि ग्रामस्थांनी राजू शेट्टी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Web Title: sangli news raju shetty farmer