शेट्टी मुख्यमंत्र्यांना सामील - रघुनाथदादा पाटील

शेट्टी मुख्यमंत्र्यांना सामील - रघुनाथदादा पाटील

सांगली - शेतकऱ्यांचा संप मोडीत  काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून राजू शेट्टी यांनी आत्मक्‍लेश यात्रा काढली. राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे नाव स्वाभिमानी आणि धंदा बेईमानी, असा घणाघात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला. शिवाय शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे उद्यापर्यंत सरकार हतबल झालेले दिसेल, असेही ते म्हणाले.

आत्मक्‍लेश करायचाच होता, तर संपात सहभागी होऊन राजू शेट्टींनी करायला हवा होता, असे म्हणत रघुनाथदादांनी शेट्टी आणि सदाभाऊंवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘‘सरकारची शेतकऱ्यांबद्दलची भूमिका पाहता शेतकऱ्यांच्या भावनांचा कडेलोट होणारच होता. मात्र पहिल्याच दिवशी या आंदोलनाला राज्यभरातून इतका मोठा प्रतिसाद मिळतो ही मोठी गोष्ट आहे.’’

ते म्हणाले, ‘‘सरकार विरुद्ध शेतकऱ्यांची लढाई सुरू झाली आहे. देशात ४ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता शेतकरी गप्प बसणार नाहीत. फ्रेंच राज्यक्रांतीची देशात पुनरावृत्ती शक्‍य आहे. शेतमालाला भाव नसल्याने उद्याही मरायचं अन्‌ आजही मरायचे ही भूमिका शेतकऱ्यांची आहे. सरकारने पोलिसांच्या  बळावर आंदोलन मोडीत काढण्याचे ठरवले तर शेतकऱ्यांना अटक केल्यास तुरुंग अपूर्ण पडतील. सरकारविरोधात आता संघटना नव्हे शेतकरी स्वतःहून एकत्र आलेत. शरद जोशींच्या पश्‍च्यात त्यांचे विचार पटू लागले आहेत.’’ 

ते म्हणाले,‘‘जनतेची तिजोरी आपल्याच बापाची आहे, असे समजून फायदे घेतले जातात. राज्यकर्ते खासदार, आमदारांची मनमानी, भत्ते, कर्मचाऱ्यांसाठी आयोग लागू केले जात आहेत. धोरणांच्या नावाखाली न्यायालयेही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करतात. सरकारचीही भूमिका घमेंडखोरीची आहे. शेतीच्या प्रश्‍नांवर लढणारे नेते मोठे झाले. राज्य सरकारने तर अनेक प्रश्‍न सोडवण्यासाठी पर्याय शोधले, प्रश्‍न तिथेच राहिले. मराठा आरक्षण आंदोलनाकडे दुर्लक्ष करताना कोल्हापूरचे संभाजीराजे यांना खासदार केले. धनगर आरक्षणाकडे दुर्लक्ष करण्यासाठी महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्री केले. तर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्षासाठी सदाभाऊ खोत यांचा वापर सुरू झाला आहे. खासदार राजू शेट्टी यांना सरकारमध्ये घेऊन इतर शेतकरी संघटना  संपवण्याचा प्रयत्न केला. राज्यातील अन्‌ देशातील संघटना संपल्यात का?, राजकीय नेत्यांनीही मूळ प्रश्‍नांना बगल दिली. मुख्यमंत्रीही तेच करताहेत. नेते मोठे झाले. जनतेच्या भावनांची त्यांना कदर करावी, असे वाटतच नाही.’’

ते म्हणाले,‘‘भाजपचे माधव भंडारी म्हणतात,‘‘सरकार शेतीमाल आयात करेल. त्यांनी खुशाल करावे. देशातील कांद्याला ५० पैसे किलो भाव अन्‌ आयात ५० रुपये किलोने करावी लागते. तूरडाळीची आयात १३५  रुपयांनी करावी लागते. भारत जेव्हा आयात करेल तेव्हा हे भाव गगनाला भिडतील. शेतकऱ्यांनी पिकवला नाही  तर खाणार काय? पण शेतकऱ्यांच्या पोटाशिवाय अन्य गरजांसाठी जादा पिकवावे लागते.

दोन मेणबत्त्या जाळल्या का हो?
रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘‘कसाबने गोळ्या झाडल्याने अडीचशे लोक मारले गेले, हे दुर्दैवी. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ३ लाख मेणबत्त्या जाळल्या. देशात ४ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कधी त्यांच्यासाठी दोन मेणबत्त्या जाळल्या का हो? आम्ही या संपाचे समर्थन करतो; मग काहीही करण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com