रांजणीत ड्राय-पोर्ट उभारणीला हिरवा कंदील?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

सांगली - रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथे ड्राय-पोर्ट उभारण्याच्या संकल्पाची पूर्ती होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्र सरकारच्या वाहतूक मंत्रालय समितीकडून त्याला हिरवा कंदील मिळेल, असे सांगितले जात आहे.

सांगली - रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथे ड्राय-पोर्ट उभारण्याच्या संकल्पाची पूर्ती होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्र सरकारच्या वाहतूक मंत्रालय समितीकडून त्याला हिरवा कंदील मिळेल, असे सांगितले जात आहे.

काल (ता. १९) रांजणीत जागेच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर आज जिल्ह्यातील काही मोठ्या व्यापारी, अडत्यांबरोबर त्यांनी चर्चा केली. या साऱ्यांनीच हे केंद्र सांगलीच्या विकासात भर घालेल, असा विश्‍वास या समितीला दिला.

केंद्रीय वाहतूक मंत्रालयाचे मुख्य अभियंता मदभावी, व्यवस्थापक श्री. देशपांडे यांच्यासह अधिकारी दौऱ्यावर आले आहेत. खासदार संजय पाटील, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी या विषयावर काम करताहेत. आजच्या बैठकीला हळद, बेदाणा, द्राक्ष, डाळिंब व्यापाऱ्यांची हजेरी होती. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला.

रांजणी येथील ड्राय-पोर्टचा येथील व्यापारास कसा फायदा होईल आणि त्याचे नियोजन कसे असेल, याविषयी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. पुढील दहा वर्षांत या केंद्रातून किमान एक लाख कंटेनरची उलाढाल व्हावी, असे नियोजन करून त्याची आखणी होणार असल्याचे सांगण्यात आले. या चर्चेला अधिकाऱ्यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने घेतले असून, त्याचा अहवाल केंद्राकडे सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, रांजणी येथील नेमक्‍या कोणत्या जागेवर ड्राय-पोर्टला मान्यता मिळणार, हा विषय सध्या चर्चेत आहे. या दोन्ही जागा राज्य शासनाच्या ताब्यात आहेत. एका जागेवर शेळी-मेंढी विकास महामंडळ असून, दुसरी जागा ही गायरान आहे. ड्राय-पोर्ट हे जिल्ह्याच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र ठरणार 
असल्याने यापैकी कोणतीही जागा निश्‍चित झाली तरी फायद्याचे असेल, अशी भूमिका या समितीसमोर मांडण्यात आली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला दोन्हीही जागा 
पूरक आहेत. त्यामुळे या समितीचा निर्णय काय होतो, याकडे लक्ष असणार आहे.

Web Title: Sangli News Ranjani Dry port Issue