राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन 24, 25 ला 

राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन 24, 25 ला 

इस्लामपूर - राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान, पुणे या संस्थांतर्फे 24 व 25 डिसेंबरला येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात 19 वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वागताध्यक्ष महेंद्र भारती, संघटक शहाजी पाटील, मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे, समन्वयक एकनाथ पाटील, सुनील यादव उपस्थित होते. 

श्री. रोकडे म्हणाले,""रविवारी (ता.24) सकाळी नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांपासून संमेलनस्थळापर्यंत राष्ट्रीय एकात्मता संदेश यात्रा निघेल. साहित्यिक, कलावंत, कार्यकर्ते, महाविद्यालयीन शिक्षक, विद्यार्थी त्यात सहभागी होतील. दहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक कवी उद्धव कानडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ साहित्यिक आणि घटनातज्ज्ञ अॅड. भास्करराव आव्हाड यांच्या हस्ते होईल.

महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सचिव सरोज पाटील, नगराध्यक्ष निशिकांत पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मनोहर जाधव यांना प्रा. रा. ग. जाधव साहित्य साधना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. बंधुता परिसस्पर्श अध्यक्षीय भाषण पुस्तिकेचे, हाजी अफजलभाई शेख यांनी संपादित केलेल्या सत्यार्थी या स्मरणिकेचे आणि शिवाजीराव शिर्के यांच्या पवनेचा प्रवाह या विशेषांकाचे प्रकाशन होईल.

दुपारी दोन वाजता डॉ. रझिया पटेल यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आहे. संमेलनांची गरज आणि बंधुता संमेलनाचे वेगळेपण हा विषय आहे. यात डॉ. अरुण आंधळे, डॉ. अशोककुमार पगारिया, ऍड. अमित गोरखे सहभागी होतील. माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, अनुजा कल्याणकर यांना डॉ. विजय ताम्हणे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देण्यात येईल. त्यानंतर "मूल्यशिक्षणाचे पहिले मुक्त विद्यापीठ - संत गाडगेबाबा' या विषयावर प्रा. तेज निवळीकर यांचे व्याख्यान होईल. विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आमदार जयंत पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते भूमिपुत्र पुरस्काराचे वितरण होईल.'' 

ते म्हणाले,""सोमवारी (ता.25) ज्येष्ठ कवी चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली काव्यपंढरी कविसंमेलन होईल. सुमारे 50 कवींचा सहभाग असेल. त्यामधून दोघांची लोककवी वामनदादा कर्डक आणि लोकगायक प्रल्हाद शिंदे पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल. "मुलींना वाचवा, मुलींना शिकवा' या विषयावर वैशाली जौंजाळ या "पाझर' हा एकपात्री प्रयोग सादर करतील.

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची प्रकट मुलाखत होईल. डॉ. देखणे यांच्या हस्ते एम. डी. पवार पीपल्स को-ऑपरेटीव्ह बॅंकेला राजर्षी शाहू सामाजिक न्याय हक्क पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. प्रा. जे. पी. देसाई यांचे "स्वामी विवेकानंद यांचे बंधुतामय तत्त्वज्ञान' या विषयावर व्याख्यान होईल.

पुरस्कार वितरणाने संमेलनाचा समारोप होईल. ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. एन. डी. पाटील आणि ज्येष्ठ स्त्रीवादी साहित्यिका डॉ. अश्‍विनी धोंगडे यांना ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते राष्ट्रीय बंधुता पुरस्कार प्रदान करण्यात येईल. कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी पतसंस्था हडपसर (पुणे) या संस्थेचा स्वामी विवेकानंद पुरस्काराने गौरव करण्यात येईल. निवडक शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सत्कार होईल. पेरते व्हा, विचार पेरा म्हणजे कृती उगवेल बे ब्रीद घेऊन गेली वीस वर्षे संमेलन भरवत आहोत.'' 

वाळव्यात दुसऱ्यांदा 
आतापर्यंत वेगवेगळ्या शहरात राष्ट्रीय बंधुता संमेलन झाले आहे. यंदा होणारे वाळवा तालुक्‍यातील दुसरे संमेलन आहे. यापूर्वी वाळव्यात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी व नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झाले होते. इस्लामपूरचे संमेलन पाली मराठी शब्दकोषाचे जनक व इस्लामपूरचे साहित्यिक बाबा भारती यांना समर्पित आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com