भेसळ ओळखा, दिवाळी निर्धास्त साजरी करा!

भेसळ ओळखा,  दिवाळी निर्धास्त साजरी करा!

दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा सण. नवनवे कपडे घालून गोडधोड खाण्याच्या आणि धमाल उडविण्याच्या आनंदावर विरजण पडते ते अनपेक्षितपणे समोर आलेल्या भेसळीमुळे. ऐन दिवाळीत दवाखान्याची पायरी चढण्यासारखा दुःखदायक प्रसंग नाही. थोडीशी काळजी घेतली तर तो टाळता येतो. दिवाळीत बाजारातील तयार खाद्यपदार्थ आणि त्याच्या साहित्याची मागणी प्रचंड  वाढते. काही समाजकंटक त्याचा गैरफायदा घेतात. तेल, दूध व दुधाचे पदार्थ, पीठ, साखर, तूप अशा  खाद्यपदार्थांत भेसळ करतात. घरच्या घरी भेसळ ओळखून दिवाळीचा निर्भेळ आनंद मिळविण्यासाठी  अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या काही टिप्स.

दूध
भेसळीचा पदार्थ : पाणी, स्टार्च. 
भेसळ ओळखण्यासाठी : दुधाचा थेंब गुळगुळीत उतरत्या पृष्ठभागावर टाकल्यास पाणीमिश्रित थेंब लवकर खाली ओघळतो. शुद्ध दुधाचा थेंब मात्र सावकाश खाली येतो. तसेच दुधात आयोडीनचा थेंब टाकल्यावर निळा रंग आल्यास स्टार्चची भेसळ केल्याचे समजावे. लॅक्‍टोमीटरद्वारे तपासणी केल्यानंतर दुधाचे रीडिंग सव्वीसवर गेल्यास त्यातील स्निग्धांश काढून घेतल्याचे समजावे.

खवा आणि पनीर
भेसळीचा पदार्थ : स्टार्च. 
 भेसळ ओळखण्यासाठी :
खवा आणि पाणी एकत्र उकळावे. थंड झाल्यानंतर आयोडीनचे काही थेंब टाकावेत. निळा रंग आल्यास खव्यात पिष्टमय पदार्थांची भेसळ झाल्याचे समजावे. 

तूप, लोणी
भेसळीचा पदार्थ : वनस्पती डालडा, बटाटे, रताळी.  
भेसळ ओळखण्यासाठी :
पातळ तुपात चमचाभर तीव्र हायड्रोक्‍लोरिक ॲसिड आणि थोडी साखर टाकून काहीवेळ हलवावे. तांबडा रंग आल्यास तुपात वनस्पती तुपाची भेसळ असते. लोण्यात आयोडीनचे काही थेंब टाकल्यानंतर निळा रंग आल्यास बटाटे, रताळीसारख्या पिष्टमय पदार्थांची भेसळ असल्याचे समजावे.  

खाद्य तेल
भेसळीचा पदार्थ : धोतरा तेल, मिनरल ऑईल. 
भेसळ ओळखण्यासाठी :
चमचाभर खाद्यतेलात तीव्र स्वरूपाचे नायट्रीक ॲसिड टाकून हलवल्यास तळाला लालसर करडा रंग येतो. तसे झाल्यास धोतऱ्याच्या तेलाची भेसळ केल्याचे समजावे.  

पिठीसाखर
भेसळीचा पदार्थ : खडू पावडर, धुण्याचा सोडा. 
भेसळ ओळखण्यासाठी :
काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात पिठी साखर विरघळवल्यास तळाला खडूची भुकटी साचते. पिठी साखरेत हायड्रोक्‍लोरीक ॲसीडचे काही थेंब टाकल्यानंतर फेस व बुडबुडे आल्यास त्यात धुण्याचा सोडा मिसळल्याचे समजावे.

मध
भेसळीचा पदार्थ : साखरेचे पाणी 
भेसळ ओळखण्यासाठी :
शुद्ध मधात कापूस बुडवून जाळल्यास तो लगेच जळतो, मात्र मधात साखरेचे द्रावण मिसळलेले असल्यास त्यातील पाणी कापसाला जळू देत नाही. जळाल्यास तडतड आवाज येतो. 

मोहरी
भेसळीचा पदार्थ- पिवळ्या धोतऱ्याचे बी.
भेसळ ओळखण्यासाठी :
हे बी दिसायला मोहरीसारखेच असल्याने भेसळीनंतर सहजासहजी ओळखू येत नाही. बारकाईने पाहिल्यास धोतऱ्याच्या पिवळ्या बीचा पृष्ठभाग खडबडीत दिसतो. 

डाळी
भेसळीचा पदार्थ : लाख डाळ, मेटॅनील यलो रंग. 
भेसळ ओळखण्यासाठी :
लाखेची डाळ दिसण्यास चपटी व अनियमित आकाराची असते. डाळीच्या चार-पाच दाण्यांवर पाणी आणि तीव्र हायड्रोक्‍लोरीक ॲसिड टाकल्यानंतर गुलाबी रंग आल्यास त्यात मेटॅनील यलो रंग असल्याचे सिद्ध होते.

रवा, मैदा, आटा
भेसळीचा पदार्थ : लोहकण. 
भेसळ ओळखण्यासाठी :
या वस्तुंमध्ये चुंबक फिरवल्यास लोहकण चिकटून बाजूला येतात.

बेसन
भेसळीचा पदार्थ : लाख डाळीचे पीठ. 
भेसळ ओळखण्यासाठी :
हायड्रोक्‍लोरिक ॲसिड मिसळलेले पीठ पंधरा मिनिटे उकळत्या पाण्यावर ठेवल्यानंतर त्याला गुलाबी रंग आल्यास लाखी डाळीच्या पीठाची भेसळ असल्याचे सिद्ध होते. 

कुटलेले मसाले
भेसळ ओळखण्यासाठी :
मसाल्यांवर आयोडीनचे काही थेंब टाकल्यानंतर भेसळ असल्यास निळा रंग येतो.

हळद पावडर
भेसळीचा पदार्थ ः रंगीत लाकडी भुसा. 
भेसळ ओळखण्यासाठी :
चमचाभर हळद पावडरीमध्ये तीव्र हायड्रोक्‍लोरीक ॲसीड टाकल्यास तत्काळ गुलाबी रंग येतो. या मिश्रणावर पाणी टाकल्यानंतर रंग नाहीसा झाला तर हळद शुद्ध असल्याचे मानावे. रंग गेला नाही तर कृत्रिम रंग आणि भेसळ असल्याचे स्पष्ट होते. 

मिरची पावडर
भेसळीचा पदार्थ : विटांची भुकटी, मीठ, तोंडाला लावण्याची पावडर. 
भेसळ ओळखण्यासाठी :
चमचाभर मिरची पावडर काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात टाकल्यानंतर तळाला चिकट थर राहिल्यास ती विटेची भुकटी असते. साबणासारखा बुळबुळीत लागल्यास तोंडाला लावण्याची पावडर असल्याचे मानावे.

भेसळीचे शारीरिक दुष्परिणाम
भेसळयुक्त खाद्यतेलामुळे अपंगत्व येऊ शकते, ड्रॉप्सी हा आजार संभवतो. धुण्याच्या सोड्याच्या भेसळीमुळे आतड्याला जखमा होऊ शकतात. मेटॅनील यलो रंगाच्या वापराने कर्करोग होऊ शकतो. खाण्याच्या रंगांच्या अति वापराने त्वचा रोग बळावतात. सर्वसाधारणतः चायनीज पदार्थांमध्ये वापरले जाणारे मोनो सोडीयम ग्लुटामेट अर्थात अजिनोमोटो हे सहा महिन्यांपेक्षा लहान मुलासाठी प्रतिबंधित आहे. अतिसेवनाने रक्तदाब बळावू शकतो. दुधातील सोडा, युरियामुळे आतड्यांचे विकार होतात.

काय काळजी घ्याल ?

शक्‍यतो आयएसआय, एफपीओ आणि ॲगमार्क असलेल्या वस्तुंच्या खरेदीला प्राधान्य द्यावे. हवाबंद पदार्थ घेताना पॅकिंग फुटेलेले नाही, बुरशी आलेली नाही, एक्‍सपायरी तारीख पुढे गेलेली नाही याची खातरजमा करावी. उकळलेल्या दुधाचाच वापर करावा व ते झाकून ठेवावे. दुधापासून बनवलेली मिठाई ताजी नसेल  आणि ती थंड ठिकाणी साठवलेली नसेल, तर वापर टाळावा. सीलबंद पदार्थावर त्याचे नाव, उत्पादकाचे नाव व पत्ता, बॅच क्रमांक, पॅकिंग केल्याची तारीख, मुदत संपण्याची तारीख, शाकाहारी असल्यास हिरवा ठिपका, मांसाहारी असल्यास लाल ठिपका, अन्न पदार्थाचे वजन व किंमत आणि घटक पदार्थ असा तपशील पहावा. तो नसल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या नजीकच्या कार्यालयाकडे तक्रार करावी. खरेदीनंतर शक्‍यतो पक्की पावती घ्यावी. विनंतीनुसार तक्रारकर्त्याचे नाव गुप्त ठेवले जाते.    

कोठे तक्रार कराल ?
सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, 
१०९, पहिला मजला, मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय, 
विजयनगर, सांगली
दूरध्वनी क्रमांक - (०२३३) २६०२२०१ आणि २६०२२०२ .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com