‘ट्रॅक्‍टर’ आणखी किती बळी घेणार..?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

काही संस्था, संघटना ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वी चार-दोन ट्रॅक्‍टरला रिफ्लेक्‍टर लावण्याची नौटंकी करतात. त्यानंतर अपघातांची मालिका सुरू होते. हे वाहन शेतीकामाला अतिशय उपयुक्त आहे. मात्र, ते मुख्य रस्त्यांवर वाहतुकीसाठी धोकाच ठरत आलेय. त्यावर काटेकोर निर्बंध आणले पाहिजेत. अन्यथा, असे बळी जातच राहतील.

ट्रॅक्‍टर-ट्रॉलीची रहदारीच्या रस्त्यांवरून वाहतूक धोकादायक, जीवघेणी असल्याचे सांगण्यासाठी पुन्हा एकदा सहा लोकांना जीव गमवावा लागला आहे. त्यात पाच होतकरू, उमद्या मल्लांचा समावेश आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने नेहमीच या वाहतुकीकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली आहे. काही संस्था, संघटना ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वी चार-दोन ट्रॅक्‍टरला रिफ्लेक्‍टर लावण्याची नौटंकी करतात. त्यानंतर अपघातांची मालिका सुरू होते. हे वाहन शेतीकामाला अतिशय उपयुक्त आहे. मात्र, ते मुख्य रस्त्यांवर वाहतुकीसाठी धोकाच ठरत आलेय. त्यावर काटेकोर निर्बंध आणले पाहिजेत. अन्यथा, असे बळी जातच राहतील.

ट्रॅक्‍टरशी वाहनाची धडक होऊन एवढे बळी, तेवढे जखमी... या बातम्या अनेकदा येत असतात. त्यात बहुतांश प्रकरणांत ट्रॅक्‍टर दिसलाच नाही, असे कारण असते. रस्त्यावर माणसं किड्यामुंगीसारखी मारली जाताहेत. त्यात आता पाच मल्लांना जीव गमवावा लागलाय. एकेक मल्ल घडवायला काय कष्ट लागतात, हे त्या कुळात जन्माला आल्याशिवाय कळत नाही. आयुष्य मातीत पेरावं लागतं, तेव्हा मल्ल उगवतो. हाता-तोंडाला आलेले, बलदंड, मजबूत मल्ल अशा अपघातात जाणे, हे संवेदनशील माणसाचे काळीज चिरणारे आहे. या अपघाताची मुळे आधी छाटली पाहिजेत, त्यात ट्रॅक्‍टरची मुख्य रस्त्यांवरील वाहतूक हेही एक मूळ आहे.

एक दिव्याची मस्ती
ट्रॅक्‍टरच्या इंजिनला बोलीभाषेत ‘मुंडके’ म्हणतात. त्याच्या समोरच्या बाजूला दोन दिवे (हेडलाईट) असतात. इतर वाहनांप्रमाणेच ते काम करतात, मात्र ट्रॅक्‍टरचालकांना त्या दोनपैकी एक दिवा बंद करण्यात कोण जाणे काय मजा येते. बहुतांश ट्रॅक्‍टरचा एक दिवा बंदच असतो. गंभीर बाब अशी, की डाव्या बाजूने धावताना उजव्या बाजूचाच दिवा बंद केला जातो. समोरून येणाऱ्याला हे ट्रॅक्‍टर नसून एखादे दुचाकी वाहन असल्याचा भास होतो. त्या वेळी हमखास धडक होण्याची भीती असते. ज्या कुणाला असे एक दिव्याचे ट्रॅक्‍टर दिसतील, ते तेथेच अडविणे आणि त्याला जाब विचारणे, अशी मोहीम काही ठिकाणी सुरू झाली होती. ती सर्वत्र झाली तर कदाचित सुधारणा होईल.

ओढत नाही, सोड तेथेच
ट्रॅक्‍टरला दोन ट्रॉली जोडून ऊस वाहतूक करण्यात येते. रस्ता सपाट असेल किंवा उतार असेल तर अडचण येत नाही. जेथे चढाचा किंवा अधिक खड्ड्यांचा रस्ता येतो, तेथे ही ‘ट्रॅक्‍टर ट्रेन’ अडकते. त्या ठिकाणीच रस्त्यावर मागची ट्रॉली थांबवून एक ट्रॉली घेऊन ट्रॅक्‍टर रवाना होतात. ही रस्त्याकडेला थांबलेली ट्रॉली कित्येकांचा बळी घेऊन गेली आहे. 

रिफ्लेक्‍टरच नाहीत
ट्रॅक्‍टरच्या बहुतांश ट्रॉलीला रिफ्लेक्‍टर नाहीत. परवाना नूतनीकरण करताना अतिशय स्वस्त दरातील रिफ्लेक्‍टर लावले जातात, जे चार-दोन दिवसांत निघून पडतात. अनेक ट्रॉली जुनाट झालेल्या असल्याने त्यांचा रंगही गेलेला असतो. अंधारात त्या दिसत नाहीत. सांगली-कोल्हापूर या वेगवान रस्त्यावरही अशा ट्रॉली लावलेल्या दिसतात. त्यात कित्येक होतकरू लोकांचे बळी गेले आहेत. 

ओव्हरलोड
ट्रॅक्‍टर वाहतूक ही साखर कारखान्यांसाठीच होत असल्याने उपप्रादेशिक परिवहन खाते त्याकडे फारसे लक्ष देत नाही. बहुतांश कारखाने नेत्यांचे आहेत.  कुणी पंगा घ्यायचा..? त्यामुळे ट्रॉलीतून क्षमतेपेक्षा अनेक पट जास्त वजनाचा ऊस घातला जातो. परिणामी, कित्येकदा ट्रॉली पलटी झाल्या आहेत. त्याखाली सापडून काही लोकांनी जीवही गमावला आहे.

रेल्वेचे डबे अन्‌ तालेवारी
ट्रॅक्‍टरला रेल्वेसारखे दोन-दोन डबे जोडले जातात. त्याची एकूण लांबी सुमारे ३० ते ४० फुटांच्या घरात होते. हे ट्रॅक्‍टर रिकामे धावताना नाग- सापासारखे वळवळत असतात. त्याची भीती वाटावी, इतकी वाईट स्थिती असते. त्यावर कहर म्हणजे तालेवार ट्रॅक्‍टरचालक अतिशय मोठ्या आवाजात गाणी लावून वाहन हाकत असतात. त्यांना मागून कोण येतोय, पुढून कोण येतोय, याची फिकीरच नसते. 

शहरातून वाहतूक कशी?
उसाने भरलेल्या ट्रॅक्‍टरची वाहतूक शहरातील मुख्य रस्त्यांवरून करण्यास बंदीच घातली पाहिजे, अशी जुनी मागणी आहे. मिरज पश्‍चिम भागातील ऊस तोडून तो पूर्व भागातील कारखान्याकडे नेला जातो. तो सांगलीतील मुख्य रस्त्यांवरून जातो. पश्‍चिम भागात कारखाने नाहीत का? कर्नाटकमध्ये ऊस वाहतूक करण्यासाठी प्रमुख मार्गांवरून ही वाहतूक सुरू असते. अतिशय वेगवान झालेल्या रस्त्यांवर अशा ‘ट्रॅक्‍टर रेल्वे’ जीवघेण्या आणि अपघाताला हात दाखवून निमंत्रण देणाऱ्या आहेत.

पर्याय आहेत, वापरा
कारखान्याच्या जवळचा ऊस बैलगाडीनेच ओढला पाहिजे, याबाबत कुणाचे दुमत असता कामा नये. लांबची ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रक हाच पर्याय आहे. तो अधिक सुरक्षित आहे. गरज असेल तर ऊस वाहतुकीसाठी साखर कारखान्यांनी खास ट्रक बनवून घ्यायला काय हरकत आहे? भविष्यात ऊस तोडणी ही यंत्रणाद्वारेच होईल. त्यावेळी ट्रॅक्‍टरपेक्षा बंदिस्त ट्रक उपयुक्त ठरणार आहेत. त्याची तातडीने सुरवात केली तर ट्रॅक्‍टरचे बळी कमी होतील.

Web Title: Sangli News Road accident Sugarcane Tractor Trolly