दरोडेखोरांची टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

मिरज - सांगली- मिरजेत दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या कर्नाटकातील चार दरोडेखोरांना आज पोलिसांनी अटक केली. वाहतूक नियंत्रण शाखेकडील पोलिसांच्या दक्षतेमुळे ही टोळी हाती लागली. टोळीतील दोघे पळून गेले. टोळीकडून दोन गावठी रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसे आणि मोटार जप्त केली आहे. 

मिरज - सांगली- मिरजेत दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या कर्नाटकातील चार दरोडेखोरांना आज पोलिसांनी अटक केली. वाहतूक नियंत्रण शाखेकडील पोलिसांच्या दक्षतेमुळे ही टोळी हाती लागली. टोळीतील दोघे पळून गेले. टोळीकडून दोन गावठी रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसे आणि मोटार जप्त केली आहे. 

शशी रामचंद्र मुढेवाड (वय ३४), साईनाथ लालाप्पा बनसोडे (वय ३०), रमेश बहिराप्पा बनसोडे (वय ३०) आणि संजीव चण्याप्पा चौधरी (वय २८, सर्व रा. चडचण, ता. इंडी, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, दोघे पळून गेलेल्या दोघांनाही वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्यांना पकडले. महात्मा गांधी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे तपास करीत आहेत. दरम्यान, ही कामगिरी करणाऱ्या वाहतूक शाखेच्या या पथकाला  जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिली.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या आदेशानुसार सकाळी अकरापासून पोलिसांनी ‘ड्रंक अँड 
ड्राईव्ह’ ची कारवाई करण्यास तपासणी सुरू केली. मोटारींवर पोलिसांचे विशेष लक्ष होते. पोलिस कसून चौकशी करीत होते. त्यावेळी 
मोटार (के ए ०९ एम ए ७६१४) कोल्हापूरकडून आली. गाडीतील सर्वांनी तोंडाला रुमाल बांधल्याने पोलिसांनी गाडी थांबवली. तपासणीसाठी गाडीची डिकी उघडण्यास सांगितले. डिकीत रिव्हॉल्व्हर असल्याने गाडीतील सहाही जणांनी उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शशी रामचंद्र मुढेवाड आणि संजु चण्याप्पा चौधरी या दोघांना पाठलाग करून पकडले. उर्वरित चौघे एस. टी. डेपोतील संरक्षण भिंतीवरून उड्या टाकून पसार झाले. त्यापैकी साईनाथ लालाप्पा बनसोडे आणि रमेश बहिराप्पा बनसोडे यांनाही पुन्हा म्हैसाळमध्ये नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी काही तासांत पकडले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यांनी दाद दिली नाही. टोळीतील अन्य दोघे अजून पसार असले तरी त्यांनाही काही तासांत जेरबंद करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक पिंगळे यांनी सांगितले.

चौघेही कर्नाटकातील अट्टल गुन्हेगार 
चौघांकडे केलेल्या प्राथमिक तपासात टोळीतील एकाविरुद्ध कर्नाटकात खुनाचा गुन्हा नोंद आहे. अन्य तिघेही विविध गुन्ह्यात सहभागी आहेत. त्यांचा सांगली-मिरजेत एखादा मोठा गुन्हा करण्याचा कट होता; पण वाहतूक पोलिसांच्या दक्षतेमुळे गुन्हा टळला.
 

जय्यत तयारी
गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, तोंडाला लावायचे मास्क असे साहित्य टोळीकडील मोटारीत आढळले. या टोळीचे कर्नाटकातील कारनामे थक्क करणारे आहेत. या टोळीने महाराष्ट्रातही बरेच गुन्हे केल्याचा पोलिसांना अंदाज आहे. त्याची माहिती मिळताच कोल्हापूर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे जिल्ह्यातील पोलिसांनीही टोळीच्या गुन्ह्याच्या पद्धतीविषयी चौकशी करणारे अनेक दूरध्वनी सांगली  पोलिसांना केले.

वाहतूक पोलिसांची कामगिरी; बक्षीस जाहीर
ही कारवाई करणारे वाहतूक शाखेकडील हवालदार ए. जी. कुंभार, हवालदार एस. एस. नांगरे, हवालदार एस. जी. शेख, पोलिस नाईक जे. आर. माने यांच्या पथकाला जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी १५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.

Web Title: sangli news robber gang arrested