कुख्यात घरफोड्याकडून 12 लाखांचा मुद्देमाल जप्त 

कुख्यात घरफोड्याकडून 12 लाखांचा मुद्देमाल जप्त 

सांगली - कऱ्हाडहून ऍक्‍टिव्हा दुचाकीवरून येऊन दिवसाढवळ्या विश्रामबाग, संजयनगर परिसरात घरफोड्या करणाऱ्या मयूर सोपान भुंडे (वय 31, रा. आगाशिवनगर, डी मार्ट मागे, कऱ्हाड, मूळ - बावधन, पुणे) याला सांगली पोलिसांनी गजाआड केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून पेठनाका येथे कारवाई केली. त्याच्याकडून सहा घरफोड्या उघडकीस आल्या असून, 38 तोळे सोन्यासह 11 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा महिन्यांत त्याने एकट्याने सहा घरफोड्या केल्याची कबुली दिली. तो कऱ्हाडहून दुचाकीवरून निघायचा. बायपासजवळ येऊन एका दुकानात दारू प्यायचा. तेथून पुढे बंद फ्लॅट शोधायचा. गाडीच्या डिगीत ठेवलेल्या कटावणी, हातोड्याने कुलूप तोडायचा. सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पसार व्हायचा. विशेष म्हणजे त्याने साऱ्या घरफोड्या दिवशाढवळ्या केल्या आहेत. पुणे, सातारा, वाई, रोहा, बारामती, हवेली येथे तब्बल 28 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तो सराईत घरफोड्या आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना त्याच्यावर संशय बळावला होता. त्याच्यावर पाळत ठेवल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्‍या दाखवला. त्यानंतर त्याने घरफोड्यांची कबुली दिली. 

त्याने 25 मार्चला सुधाकर जगन्नाथ जगदाळे (रा. श्रीराम पुष्प अपार्टमेंट, स्टेट बॅंक कॉलनी) यांच्या घरी, 13 फेब्रुवारीला अनिल नारायण दायमा (रा. बालाजी कॉर्नर अपार्टमेंट, कुपवाड रोड) यांच्या घरी, 1 जूनला पराग विजय हवालदार (रा. साईकृपा अपार्टमेंट, विश्रामबाग) यांच्या घरी, 9 जूनला वसंत तुकाराम चौगुले (रा. मयूरेश रेसिडेन्सी, मंगळवार बाजार, सांगली) यांच्या घरी, तर आशिष गोविंद राठी (स्वाती गॅसजवळ, वसंतनगर, सांगली) यांच्या घरी घरफोडी केली होती. त्याच्याकडून मंगळसूत्र, नेकलेस, गंठण, कर्णफुले असा 11 लाख 40 हजारांचा मुद्देमाल व 40 हजारांची दुचाकी जप्त करण्यात आली. 

पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके, अभिजित देशमुख, सुनील भिसे, लक्ष्मण मोरे, श्रीपती देशपांडे, महेश आवळे, शंकर पाटील, मेघराज रुपनर, सागर लवटे, योगेश खराडे, प्रफुल्ल सुर्वे, वैभव पाटील, मोतीराम खोत, उदय माळी, संतोष गळवे, संकेत कानडे, आर्यन देशिंगकर, विमल नंदगावे, सुप्रिया साळुंखे यांच्या पथकाने कारवाई केली. पथकाला 10 हजारांचे बक्षीस जाहीर केल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. 

गुन्हेगारांची उपजीविका कशावर? 
जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले, ""गुन्हेगारांची उपजीविका कशावर सुरू आहे, याचा तपास घेऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. घरफोड्यांसह अन्य गुन्ह्यांचे प्रकार रोखण्यासह तपास गतिमान केला आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com