दोन महिन्यांत घरफोड्यांचे अर्धशतक

बलराज पवार
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

सांगली - गेल्या दोन महिन्यांत शहर आणि जिल्ह्यात घरफोड्यांमध्ये वाढ झाली आहे. रात्री होणाऱ्या घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहेच; मात्र भरदिवसाही हे प्रकार घडू लागले आहेत. पण, घरफोड्या उघडकीस आणण्यात मात्र पोलिसांना म्हणावे तसे  यश येत नाही. त्यामुळे पोलिस यंत्रणा अपुरी आहे की कूचकामी? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

सांगली - गेल्या दोन महिन्यांत शहर आणि जिल्ह्यात घरफोड्यांमध्ये वाढ झाली आहे. रात्री होणाऱ्या घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहेच; मात्र भरदिवसाही हे प्रकार घडू लागले आहेत. पण, घरफोड्या उघडकीस आणण्यात मात्र पोलिसांना म्हणावे तसे  यश येत नाही. त्यामुळे पोलिस यंत्रणा अपुरी आहे की कूचकामी? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

नुकताच गणेशोत्सव पार पडला. विघ्नहर्त्याचा उत्सव कोणत्याही विघ्नाविना पार पडला. यामध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली. शेवटच्या काही दिवसांत सोशल मीडियावरून मिरज दंगलीच्या जुन्या क्‍लिप व्हायरल करून सांगली, मिरजेत पुन्हा धार्मिक, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला; मात्र पोलिसांनी शिताफीने तो हाणून पाडला. तातडीने या क्‍लीप व्हायरल करणारे आणि ग्रुप ॲडमिन यांना अटक करून कारवाई करण्यात आली. याबद्दल पोलिसांचे अभिनंदन करावे लागेल. पण जिल्ह्यात विशेषकरून शहरात वाढलेल्या घरफोड्या आणि चेन स्नॅचिंगच्या घटना पोलिसांची डोकेदुखी आणि नागरिकांची चिंता वाढवणाऱ्या आहेत.

दिवसा चोऱ्यांमध्ये वाढ वाढलेल्या घरफोड्यांमध्ये रात्री होणाऱ्या घटनांबरोबरच दिवसा होणाऱ्या चोऱ्याही आहेत. सकाळी अकरा वाजल्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे प्रकार घडले आहेत. घरमालक सायंकाळी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस येतो आणि मग चोरी झाल्याची घटना अपार्टमेंटमध्ये, परिसरात समजते. तोपर्यंत चोरटे पसार झालेले असतात. विश्रामबाग, शंभरफुटी, हरिपूररोडवरील कॉलनी, कुपवाडरोड अशा विविध ठिकाणच्या उपनगरांमध्ये हे प्रकार अलीकडे घडले आहेत. बहुतेक ठिकाणी अपार्टमेंटमध्ये चौकोनी किंवा त्रिकोणी कुटुंबे असतात. मुले शाळेत आणि पती, पत्नी कामानिमित्त बाहेर असतात. त्यामुळे साधारणपणे अकरा वाजल्यानंतर फ्लॅटला कुलूपच लागलेले दिसते. अगदी निर्मनुष्य अपार्टमेंट अनेक ठिकाणे दिसतात. अशी  ठिकाणे चोरट्यांसाठी पर्वणी असते. कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला की चोरीचा मार्ग खुला होतो. रोकड, दागिने लुटून चोरटे दरवाजा लावून निघून जातात. 

दरम्यानच्या काळात कुणी आलेच तर फ्लॅट आता कसा उघडा? याची शंकाही घेत नाहीत. यामुळे चोरट्यांचे फावले आहे.

सीसी टीव्ही कॅमेरे कुचकामी
अनेक ठिकाणी सुरक्षेसाठी सीसी टीव्ही कॅमेरे  बसवल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात या कॅमेऱ्यांचा दर्जा खराब असतो. त्यामुळे कॅमेऱ्यात जरी चोरटे दिसत असले तरी ते स्पष्टपणे ओळखू येत नाही. त्यामुळे कॅमरे बसवणे हा काही सुरक्षेचा मार्ग होत नाही. कॅमेऱ्यात दिसलेले चोरटे पोलिसांनी पकडल्याचे आजपर्यंत तरी समोर आलेले नाही.

जुलैमध्ये १८, ऑगस्टमध्ये ३३
जुलै महिन्यात १८, तर ऑगस्टमध्ये त्याच्या जवळपास दुप्पट म्हणजे तब्बल ३३ घरफोड्यांची नोंद झाली आहे. चोरट्यांचे एवढे धाडस वाढले कसे? चोरी उघडकीस येण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. केवळ दहा घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. चोरीस गेलेला मुद्देमाल रोकडसह सुमारे ४१ लाख रुपये होता. तर जप्त केलेला मुद्देमाल साडेतीन लाखांचा आहे.

चेन स्नॅचिंगच्या १५ घटना
याच दोन महिन्यांत चेन स्नॅचिंगच्या १५ घटना घडल्या आहेत. त्यातील दोन उघडकीस आल्या आहेत.  यामध्येही सुमारे साडेसहा लाखांचे दागिने चोरीस गेले आहेत. तर केवळ सव्वा लाखाचे दागिने जप्त करण्यात यश  आले आहे. चेन स्नॅचिंगची ठिकाणे आणि वेळा बहुतेक सारख्याच आहेत. तरीही तेथे चोरटे पोलिसांना सापडू नयेत हे दुर्दैवी आहे. 

घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे हे खरं आहे. आम्ही बीट मार्शल वाढवले आहेत. नागरिकांनीही दक्ष रहावे. विशेषकरून अपार्टमेंटमध्ये हे प्रकार वाढल्याचे दिसते. तेथे शेजाऱ्यांनीही बंद फ्लॅटवर लक्ष ठेवले पाहिजे. संशयित हालचाली दिसताच पोलिसांना कळवले पाहिजे. त्याशिवाय सुरक्षेसाठी चांगल्या दर्जाचे डे नाईट चालणारे थ्रीडी कॅमेरे बसवावेत. भाडेकरूंची माहिती पोलिसांना कळवावी. सुरक्षेसाठी वॉचमनची नेमणूक करावी. त्याने येणाऱ्या सर्वांची नोंद ठेवावी. यामुळे चोऱ्यांना आळा बसेल. 
- राजन माने, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण

बीटमार्शल काय करतात?
चोरी होणाऱ्या भागात पोलिसांनी गस्त वाढवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यासाठी बीट मार्शल नियुक्त केले आहेत. त्यांनी चोऱ्या होणाऱ्या परिसरात दिवसाही गस्त घालण्याचे आहे. बीट मार्शल नावाचे  काही पोलिस गस्तीसाठी नियुक्त आहेत; पण ते कशी आणि कधी गस्त घालतात हे समजलेले नाही. त्यामुळे बीट मार्शल गस्त घालण्यास उत्साही नसावेत असे दिसते. एका उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने हे बीट मार्शलवाले काय करतात? गस्त घालतात की नाही?  असा सवाल उपस्‍थित केला.

Web Title: sangli news robbery crime