तासगावला रॉयल्टीच्या चारपट खडीची निर्मिती

रवींद्र माने
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

तासगाव - शासनाला दररोज चार ते पाच ब्रास दगडाची रॉयल्टी भरून वीस ब्रासहून अधिक खडी तयार करण्याचा उद्योग तासगाव तालुक्‍यात बळावला आहे. स्टोन क्रशरवर ही लूट सुरू आहे. पर्यावरणाची हानी होतेच आहे. सोबत कोट्यवधीचा महसूल बुडतोय. तालुक्‍यातील या ‘दगड घोटाळ्या’कडे महसूल विभागाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.  

दीड ब्रास दगडापासून १ ब्रास खडी तयार होते. छोटा स्टोन क्रशर चालविण्यासाठी दररोज किमान २० ब्रास खडी तयार करावी लागते. त्यासाठी २५ ब्रास दगड लागतो, तरच ते परवडते. तालुक्‍यात दरमहा केवळ १०० ब्रास दगडाची रॉयल्टी भरली जात असल्याचे आकडे आहेत. तरीही दिवस-रात्र क्रशर चालतो, ही जादू कशी होते. तालुक्‍यात तीन दगड खाणी अधिकृत आहेत. खाण पट्टा नसलेले ६ अधिकृत स्टोन क्रशर आहेत. त्यांना दगड कोठून येतो? दरमहा हजारो ब्रास खडी कशी 
तयार होते? 

स्टोन क्रशरचालक मान्यता असलेल्या खाण पट्ट्यातून दगड घेत असल्याचे लेखी देतात. कालवा, विहिरीवरून दगड घेत असल्याचे सांगतात. दरमहा हजारो ब्रास खडी तयार होते. एवढ्या विहिरी, खोल कालवे कुठे आहेत? उत्तर सरळ आहे, सारे डोंगराच्या पोटात दडले आहे. वर्षानुवर्षे डोंगर फोडला जातोय. पर्यावरण हानी, महसुलावर डल्ला मारून माफिया गब्बर झालेत. तहसीलदार सुधाकर भोसले यांनी त्याची चौकशी सुरू केल्याचे सांगितले. क्रशरचालकांनी अधिकृत खाण पट्ट्यातूनच दगड घ्यावा, अशी नोटीस बजावली आहे. तालुक्‍यात ९ स्टोन क्रशर आणि ३ खाण पट्टे आहेत. 

तासगाव तालुक्‍यात एक स्टोन क्रशर वर्षानुवर्षे जागा अकृषक (एनए) नसताना सुरू होता. काही महिन्यांपूर्वी ती जागा एनए करण्यात आली. मणेराजुरी येथे तर गायरान जमिनीत खाण पट्टा होता. त्याला मान्यता कशी मिळाली, हेच नवल होते. तो अलीकडेच बंद करण्यात आला आहे.

Web Title: Sangli news royalty of stone crushing