संभाजी भिडेंची बदनामी थांबवा अन्यथा आम्ही समर्थ - सन्मान मोर्चाचा सरकारला इशारा

जयसिंग कुंभार
बुधवार, 28 मार्च 2018

सांगली - कोरेगाव भीमा दंगलप्रकरणाचे राजकीय भांडवल करीत महाराष्ट्रभर जातीय विद्वेष पेरणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, यापुढे संभाजी भिडे यांची बदनामी थांबवा अन्यथा शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्यांचा समाचार घ्यायला समर्थ आहेत, असा इशारा आज येथे देण्यात आला.

सांगली - कोरेगाव भीमा दंगलप्रकरणाचे राजकीय भांडवल करीत महाराष्ट्रभर जातीय विद्वेष पेरणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, यापुढे संभाजी भिडे यांची बदनामी थांबवा अन्यथा शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्यांचा समाचार घ्यायला समर्थ आहेत, असा इशारा आज येथे देण्यात आला.

शिवप्रतिष्ठानच्यावतीने आज येथे आयोजित केलल्या सन्मान मोर्चाची सांगता स्टेशन चौकात झाली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, कार्यवाह नितिन चौगुले यांची भाषणे झाली. शासनाला दिलेल्या निवेदनाचे जाहीर वाचन झाले. 
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी आज सांगलीसह राज्यभरात  मोर्चे आयोजित करण्यात आले होते. सांगलीतील मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागले होते. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करताना भिडे यांचा दंगलीत सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत असा खुलासा केला होता. या पार्श्‍वभूमीवर आज हा मोर्चा झाला.

येथील कर्मवीर चौकापासून सकाळी साडेअकराला मोर्चाला प्रारंभ झाला. भगवे ध्वज घेतलेले आणि शिवरायांचा जयघोष करीत हजारो गांधी टोपी परिधान केलेले कार्यकर्ते स्टेशन चौकाच्या दिशेने शिस्तबध्दरित्या जात होते. रणरणत्या उन्हात महिला, तरुण कार्यकर्ते स्टेशन चौकात दाखल झाले. चौकात एसएफसी मॉलच्या इमारतीला उभ्या केलेल्या संभाजी भिडे यांच्या सुमारे पन्नास फुटी डिजिटलच्या साक्षीने जाहीर सभा झाली. या सभेत गेल्या तीन महिन्यात भिडे यांच्या बदनामीसाठी कारस्थान रचून झालेल्या आजवरच्या कारवायांचा आढावाच प्रतिष्ठानचे कार्यवाह नितिन चौगुले यांनी घेतला. 

ते म्हणाले,"" आम्ही गेली तीन महिने ऋषीतुल्य संभाजी भिडे यांच्या बदनामीला संयमाने सामोरे जात आहे. शिवप्रतिष्ठानची डिजिटल फाडण्यात आली. मात्र आम्ही याकडे दुर्लक्ष केले. पहिल्या दिवशीपासून गुरुजींनी हिच भूमिका घेतली आहे की पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि त्यात दोषी आढळलो तर म्हणाल ती शिक्षा द्या. मात्र आमच्या संयमाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सतत बदनामीची मोहिम राबवली. यामागचे कारस्थानच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या निवेदनातून स्पष्ट झाले आहे. आता ज्या महिलेने फिर्याद दिली तिनेच माघार घेतली आहे. आता तिच्यावरही गुन्हा दाखल करावा. फेसबुकच्या माध्यमातून संभाजी भिडे यांची बदनामी करणाऱ्यांना माझे आव्हान आहे की हिंमत असेल तर मैदानात या. या सर्वांचाच सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही त्यांचा समाचार घ्यायला समर्थ आहोत.'' 

क्षणचित्रे 
0 भगवे झेंडे आणि गांधी टोप्यांसह आलेल्या कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन 
0 साडेसातशेंवर पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात 
0 कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील जातीने सांगलीत दाखल 
0 सांगली, कोल्हापूर, कर्नाटक परिसरातील विविध धार्मिक मठ-संस्थांच्या संत-महंत प्रतिनिधींचा मोर्चात सहभाग 
0 जिल्हाभरातून प्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांचे जथ्थे पहाटेपासूनच सांगलीत दाखल. 
0 स्टेशन चौकात भिडे यांचे पन्नास फुटी डिजिटल जमावाचे लक्ष वेधणारे होते. 
0 शहरात हजारोंच्या संख्येने डिजिटल उभी करून मोर्चाचे वातावरण तयार करण्यात आले होते. 
0 मोर्चाच्या अग्रभागी भगवा ध्वजासह तलवारी घेतलेले कार्यकर्त्यांचे पथक होते. 

मॉल, स्मारकावरून वॉच 
एसएफसी मेगा मॉल आणि वसंतदादा स्मारकाच्या उंच इमारतीवर पोलिसांचा पहारा होता. बंदुकधारी पोलिसांचे एक पथक तेथून टेहळणी करत होते. 

वाहतूक सुरळीत 
सांगली शहरातील आजवरच्या मोठ्या मोर्चांवेळी वाहतूकीची वाताहत होत आली आहे. या मोर्चावेळी मात्र पोलिस दलाने वाहतूकीला फार त्रास होणार नाही, अशी व्यवस्था केली होती. अगदी पुष्पराज चौकातूनही वाहतूक सुरु होती. प्रत्यक्ष मोर्चा सुरु झाल्यानंतर पुष्पराज चौक, राम मंदीर, कॉंग्रेस भवन इथपर्यंत एकेरी मार्गाने वाहसूक सुरु राहिली. मोर्चानंतरही वाहतूक सुरळीत झाली. 

हॉटेल, नाष्टा सेंटर फुल्ल 
मोर्चा सुरु व्हायला नियोजित वेळेपेक्षा सुमारे दोन तास उशीर झाला. त्यामुळे मोर्चा संपताच कार्यकर्त्यांना "पोटोबा'साठी धाव घेतला. हॉटेल, नाष्टा सेंटर, शीतपेयाची दुकाने फुल्ल झाली. उन्हाचा तडाखा असल्याने लिंबू सरबत प्यायला गर्दी होती. 

घोषणा..फलक- 
सन्मान मोर्चात फलक घेऊन महिला, तरूणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तसेच कार्यकर्त्यांच्या हातातही फलक होते. "बघतोस काय रागानी मोर्चा काढलाय वाघांनी', "भिडे गुरूजींना न्याय मिळालाच पाहिजे', "गुरूजींच्या अटकेची मागणी करणाऱ्यांचा निषेध असो', "खोटे आरोप करणाऱ्यांना अटक झालीच पाहिजे', "नही चलेगी, नही चलेगी दडपशाही नही चलेगी' असे फलक झळकत होते. 

मठाधिपती..स्वामीजींची उपस्थिती- 
मोर्चात महाराष्ट्र आणि कर्नाटक परिसरातील मठाधिपती, स्वामीजी सहभागी झाले होते. विजयपूरचे तेजोमयानंद महाराज, बोलवाड तपोवनचे शिवदेवस्वामीजी, गुरूदेव आश्रम चडचणचे योगानंद महास्वामीजी, गुरूदेव आश्रम कागवाडचे यतेश्‍वरआनंद स्वामीजी, हिरेमठवाडा मिरजचे शिवयोगी राचय्यास्वामी, सुरेश चौहानके, शिराळ्याचे गोरक्षनाथ, अनिकेत जोशी, प्रणवपूर्वजी, मेजर जनरल एस.पी. सिन्हा, कर्नल टी. पी. त्यागी आदींची उपस्थिती आकर्षण ठरली. 

गुरूंजींबरोबर 31 वर्षे- 
शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब सरदेसाई म्हणाले, भिडे यांच्यासोबत मी 31 वर्षे आहे. भिमा-कोरेगाव दंगलीत त्यांना नाहक गोवले गेले. भिडे हे हिंदुत्ववादी जरूर आहेत, परंतू ते जातीयवादी नाहीत. त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. अन्यथा अधिवेशनात मुंबईत महामोर्चा काढला जाईल. नुकत्याच झालेल्या गडकोट मोहिमेत भिमा कोरेगावचे कार्यकर्ते आले होते. त्यांनी मातीची आणि शिवबाची शपथ घेऊन सांगितले, की गुरूजी दंगलीच्यावेळी तिथे आले नव्हतेच. 

278 संघटनांचा पाठिंबा- 
कार्यवाह नितीन चौगुले म्हणाले,  सन्मान मोर्चास राज्यभरातून तब्बल 278 संघटनांनी पाठींबा दिला. सर्वांचे आधारस्तंभ छत्रपती उदयनराजे महाराज पाठीशी ठामपणे उभे राहिले. बंडातात्या कराडकर, श्री. वास्कर महाराज, नरेंद्र महाराज आदींनी पाठिंबा दिला. पाठींबा देणाऱ्या संस्थामध्ये 24 संघटना मागासवर्गीय आहेत. नक्षलवाद्यांना ही चांगलीच चपराक आहे. 

जिल्हाधिकारी यांना निवेदन- 
शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब सरदेसाई, बाळासाहेब बेडगे, प्रदीप बाफना, शशिकांत हजारे, शशिकांत नागे, राजू बावडेकर, धनंजय मद्वाण्णा यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांना निवेदन दिले. श्री. काळम यांनी निवेदन वाचल्यानंतर तुमच्या भावना तत्काळ फॅक्‍सद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवतो असे आश्‍वासन दिले. 
सन्मान मोर्चासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्ते आज सकाळीच सांगलीत दाखल झाले होते. त्याचबरोबर कर्नाटक सीमाभाग, शिरोळ, हातकणंगलेसह कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्‍यातून कार्यकर्ते मोर्चासाठी उपस्थित होते. 

साडेसातशे पोलिसांचा बंदोबस्त 
मोर्चासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील हे जातीने हजर होते. अधीक्षक सुहैल शर्मा आणि अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या नेतृत्वाखाली पाच पोलिस उपाधीक्षक, 19 पोलिस निरीक्षक, 57 सहायक पोलिस निरीक्षक, 433 पोलिस कर्मचारी,128 पोलिस महिला कर्मचारी, 22 व्हीडीओ ग्राफर, 76 वाहतूक कर्मचारी असा 740 पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा मोर्चा दरम्यान तैनात करण्यात आला आहे. 

सोशल साइटवर भगवे वादळ 
फेसबुक, वॉटस्‌अप, ट्विटर सारख्या सोशल मिडीयावर गेल्या आठवड्यापासून मोर्चासंदर्भात अपटेड शेअर केले जात आहे. मोर्चाचा मार्ग, व्यवस्था याविषयीही सुचना दिल्या जात होत्या. आज प्रत्यक्ष मोर्चावेळी क्षणाक्षणाचे अपटेड शेअर केले जात होते. काहींनी फेसबुक लाईव्ह करत सन्मान व्यक्त केला. 

"सकाळ'चे फेसबुक लाइव्ह 
ई-सकाळच्या फेसबुक पेजवरुनही मोर्चाचे लाइव्ह कव्हरेज करण्यात आले. हजारो नेटीझन्स्‌नी हा मोर्चा लाइव्ह पाहिला. 

 

Web Title: Sangli News Sambhaji Bhide Guruji Sanman Morcha