भिडेंच्या सुरक्षेत कुचराई; पाच पोलिस निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

सांगली - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांना आज निलंबित करण्यात आले. श्री. भिडे यांच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

सांगली - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांना आज निलंबित करण्यात आले. श्री. भिडे यांच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. निलंबित केलेल्यांमध्ये  ए. के. कोळेकर (सांगली), टी. बी. कुंभार (विश्रामबाग), एस. ए. पाटील (एलसीबी), व्ही. एस. पाटणकर (मुख्यालय), ए. एस. शेट्टी (मुख्यालय) यांचा समावेश आहे.

भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीनंतर सांगलीत झालेल्या बंद वेळी तणावग्रस्त परिस्थितीमुळे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सुरक्षेसाठी पाच कर्मचारी देण्यात आले होते. सांगली शहर, विश्रामबाग, स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि पोलिस मुख्यालयाकडील कर्मचारी चोवीस तास त्यांच्यासोबत असत. काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे पुण्याला गेले होते.

त्यावेळी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याची माहितीच नव्हती. त्यामुळे भिडेंसोबत सुरक्षेसाठी कुणीही कर्मचारी गेला नव्हता. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना माहिती मिळाली. त्यांनी भिडेंच्या सुरक्षेत कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पाचहीजणांना आज तडकाफडकी निलंबित केले. निलंबित केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी पोलिस निरीक्षक राजन माने यांनी दिली.

Web Title: Sangli News Sambhaji Bhide protection, 5 Police Suspended