उदयनराजेंना अटक केल्यास हिंदुत्ववादी गप्प बसणार नाहीत: संभाजी भिडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

उदयनराजेंना अटक करण्याचे पोलिसांचे प्रयत्न संतापजनक आणि अयोग्य आहेत. ते त्वरित थांबवावेत. "छत्रपती' ही व्यक्ती नाही. तो हिंदू राष्ट्र, देशभक्तीने ओथंबलेला अत्यंत पवित्र असा शब्द आहे. त्यांची अटक उभ्या महाराष्ट्राला संताप, चीड आणण्यासाठी प्रेरणा देणारी गोष्ट आहे.

सांगली - "साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावरील खंडणीचे आरोप धादांत खोटे आहेत. राजकीय हेतूने हे केले गेले आहेत. ते संतापजनक आहेत. शिवप्रतिष्ठान हे खपवून घेणार नाही. उदयनराजेंना अटक केल्यास राज्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत, हे लक्षात ठेवा,'' असा इशारा आज शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी दिला. 

खासदार उदयनराजे भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक होण्याची शक्‍यता आहे. त्यावर श्री. भिडे यांनी प्रतिक्रिया देताना उदयनराजे असे वागणार नाहीत, असे सांगत शासनाला इशारा दिला. 

ते म्हणाले, "उदयनराजेंना अटक करण्याचे पोलिसांचे प्रयत्न संतापजनक आणि अयोग्य आहेत. ते त्वरित थांबवावेत. "छत्रपती' ही व्यक्ती नाही. तो हिंदू राष्ट्र, देशभक्तीने ओथंबलेला अत्यंत पवित्र असा शब्द आहे. त्यांची अटक उभ्या महाराष्ट्राला संताप, चीड आणण्यासाठी प्रेरणा देणारी गोष्ट आहे. श्री शिवप्रतिष्ठान हे कधीही खपवून घेणार नाही. महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून प्रतिवाद करू.'' 

ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब लक्ष घालावे. उदयनराजेंवर राजकीयदृष्ट्या हे आरोप झालेत. ते असे काही वागतील यावर परमेश्‍वरही विश्‍वास ठेवणार नाही. जर शासनाने अटक केलीच तर ते महापाप ठरेल, ते करू नये; अन्यथा कार्यकर्ते, धारकरी रस्त्यावर उतरतील.'' 

Web Title: sangli news Sambhaji Bhide talked about Udayanraje Bhosale