सांगली महापालिका निवडणुकीसाठी दोन हजारावर पोलिस बंदोबस्तास

बलराज पवार
मंगळवार, 31 जुलै 2018

सांगली - महापालिका निवडणुकीसाठी उद्या (बुधवारी) मतदान होत आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी सुमारे दोन हजारावर पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहेत

सांगली - महापालिका निवडणुकीसाठी उद्या (बुधवारी) मतदान होत आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी सुमारे दोन हजारावर पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहेत. आज सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी कुमक पाठवण्यात आली. मतदान काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

शेजारच्या कोल्हापूरमधूनही पोलिस फौज मागवण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीसाठी आज सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरात मतदान होत आहे. त्यासाठी दोन हजारावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार
आहे. यात 600 होमगार्ड, 1072 पोलिस कर्मचाऱ्यांसह सहा उपाधीक्षक, 13 पोलिस निरीक्षक, 52 सहायक निरीक्षक /उपनिरीक्षकांचा समावेश आहे. त्याचबरोबर एसआरपीएफची, दंगल नियंत्रण पथकही सज्ज आहे. पोलिस अधीक्षक
सुहेल शर्मा आणि अपर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान काळात बंदोबस्त राहणार आहे.

महापालिका क्षेत्रातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी पाठवण्यात येणाऱ्या पोलिस पथकाची आज हजेरी घेऊन त्यांना बंदोबस्ताच्या सुचना देण्यात आल्या. प्रत्येक मतदान केंद्रासह त्याच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

104 जण हद्दपार
निवडणुकीनिमित्ताने महापालिका क्षेत्रातून 104 जणांना हद्दपार करण्यात आले आहे. तर कलम 55 अन्वये 48 जणांना तडीपार केले. निवडणुकीच्या निमित्ताने महापालिका क्षेत्रातील 377 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

176 आस्थापनांचे परवाने निलंबनाचे प्रस्ताव
आचार संहिता काळात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्स, वाईन शॉप, दारूची दुकाने, पानटपऱ्या अशा 176 आस्थापनांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांचे अन्न औषध विभागाचे परवाने तसेच उत्पादन शुल्कचे परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहेत. नाकाबंदीत दारू
पिऊन वाहन चालवणाऱ्या 735जणांवर कारवाई करण्यात आली.

Web Title: Sangli News Sangli Corporation Election